सौ. ज्योत्स्ना तानवडे
पुस्तकावर बोलू काही
☆ “प्रेम रंगे, ऋतूसंगे” – कवी – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ परिचय – सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆
प्रेम रंगे, ऋतू संगे
कवी: सुहास रघुनाथ पंडित
प्रकाशक: अक्षरदीप प्रकाशन आणि वितरण
प्रथम आवृत्ती:१ मे २०२३
श्री सुहास रघुनाथ पंडित
‘हिरवाईच्या प्रेमात पडताना…!’
नुकताच प्रेम रंगे, ऋतूसंगे हा कवी. श्री सुहास रघुनाथ पंडित यांचा एक अतिशय सुंदर असा काव्यसंग्रह वाचण्यात आला. निसर्गाच्या प्रेरणेन, निसर्गाच्या सानिध्यात नव्याने प्रेमात पडणाऱ्या, प्रेमात पडलेल्यांच्या प्रेम भावनेच्या विविध रंगी छटांच्या हळुवार कवितांचा समृद्ध खजिनाच हाती आल्यासारखे झाले.
या काव्यसंग्रहाचे प्रेम रंगे ऋतुसंगे हे शीर्षक अतिशय समर्पक आहे. बहरणारे प्रेम आणि बहरणारे ऋतू यांचे अतूट नाते असते. आपण ते नित्य अनुभवत असतो. या कवितांमधून त्याचा पुन:प्रत्यय येतो.
सुरुवातीलाच या पुस्तकाच्या मुखपृष्ठाने लक्ष वेधून घेतले. निळे आकाश आणि हिरव्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुंदर बहरलेला लाल गुलमोहर उठून दिसतो. मन वेधून घेतो. त्याच्या शेजारी एक मानवी हात आहे. त्यातली तर्जनी एका फांदीच्या टोकाला आणि अंगठा खोडाला अगदी अलगद टेकले असताना हृदयाचा आकार तयार होतो. म्हणजेच आपल्या भावना, मन निसर्गाशी सहज जोडले जाऊन तादात्म्य पावते आणि एक अतूट बंध निर्माण होतो. माणसाचे आणि निसर्गाचे हे गहिरे नाते दाखवणारे हे मुखपृष्ठ काव्यसंग्रहाचे सार अचूकपणे सांगणारे आहे. अतिशय सुंदर, कलात्मक, अर्थपूर्ण असे हे मुखपृष्ठ आहे.
कवीने आपल्या मनोगतामधे प्रेम, निसर्ग आणि माणूस यांच्या नात्याविषयी, विविध भावनांविषयी आणि त्यातून सूचलेल्या कवितांविषयी सुंदर शब्दांत लिहिले आहे. निसर्ग आणि प्रेम ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. कवी निसर्गवेडा आहे. त्यांनी निसर्गाची अनेक लोभस रूपे तितक्याच सुंदर, शब्दमधुर, लय-तालात शब्दबद्ध केली आहेत. त्यामुळे निसर्गाच्या विविध छटा या कवितांमधून साकार होतात. प्रेम आणि निसर्ग यांची एवढी घट्ट सांगड असते की दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण असतात. कवी म्हणतो, ” प्रेमाचे शिंपण आणि निसर्गाचे संवर्धन यातच आपले कल्याण आहे. “
या काव्यसंग्रहाला डॉ. विष्णू वामन वासमकर सरांची प्रस्तावना लाभलेली आहे. काव्यलेखना संदर्भात अतिशय माहितीपूर्ण आणि मार्गदर्शक अशी ही प्रस्तावना आहे. काव्यलेखन वाङ्मयाचे अगदी सखोल विश्लेषण त्यांनी केले आहे. काव्यशास्त्र, काव्याचे लक्षण, काव्यशरीर हे महत्त्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजावून दिले आहेत. अलंकार, रस, वृत्त, छंद, प्रतिभा आणि अभ्यास यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सुरुवातीला ही विस्तृत मीमांसा वाचल्यामुळे पुढे कवितांचा आस्वाद घेणे जास्त आनंददायी होते.
या संग्रहात एकूण ६६ कविता आहेत. प्रेम आणि निसर्ग हातात हात घालून वाटचाल करतात. ऋतुसंगे बदलणाऱ्या निसर्गाच्या विविध छटांबरोबर आपली प्रेम भावना पण विविध आकर्षक असे रंग धारण करते. निसर्गाला मध्यवर्ती ठेवत प्रेमाचे वेगवेगळे अविष्कार कवीने शब्दबद्ध केले आहेत. या सर्वच कवितांमधून कवीची उत्तुंग प्रतिभा, अभ्यास आणि निसर्गाशी असणारे घट्ट नाते प्रत्ययाला येते.
सर्वच कविता अतिशय दर्जेदार, अलंकार, रस, वृत्त, छंद यांनी परिपूर्ण असल्याने पुन्हा पुन्हा वाचनाचा आनंद कसा घ्यावा याचा प्रत्यय येतो. समृद्ध शब्दकळा, ताल लयींची उत्तम जाण यामुळे कवितेची प्रतिभासंपन्नता जाणवते आणि आपणही या प्रेम कवितांच्या प्रेमात पडतो. काही कविता तत्त्वज्ञान, काही नात्यांचे महत्त्व, काही निसर्गाचे व्यवस्थापन कसे करावे सांगतात.
‘प्रेम रंगे ऋतूसंगे ‘ ही कविता प्रेमाचे निसर्गाशी अद्वैत वर्णन करणारी कविता आहे.
प्रेमभाव दान मोठे, निसर्गाने दिलेले।
अंकुरते हृदयांतरी ऋतूंतुनी मोहरले।
निसर्ग, मानव आणि प्रेम द्वैत ना होणे कधी।
प्रेम लाभावे निसर्गास मानवा येवो बुद्धी।
‘एक झाड गुलमोहराचं’ मधे घरची गृहिणी, स्त्री, आई, पत्नी जी असेल ती एक गुलमोहराचे झाड असते ही कल्पनाच खूप सुंदर. कवी म्हणतो,
सारं कसं निसर्गाच्या नियमानुसार चाललेलं
मी नाही पाहिलं कधी गुलमोहराला वठलेलं ||
‘व्रत’ मधील पत्नी एखाद्या व्रताप्रमाणे घर संसार चालविणारी असते.
‘शहाणपण ‘मधे मुलीचं लग्न झालं, ती आई झाली की सगळं अल्लडपण विसरून जाते आणि अंगभर पदरासारखं शहाणपण लपेटून घेते. खूप सुंदर कविता.
‘सूर्यास्ताची वेळ ‘ मधे कवी सांगतोय, आयुष्याच्या संध्याकाळी सर्व भलेबुरे सोडू या आणि
” हिरवेपण जे उरले आहे तेच जपू चल या समयाला।”
‘वसा’ या कवितेत उत्प्रेक्षा अलंकाराची रेलचेल आहे. ‘वनराणी ‘ कवितेत उपमा, रूपक, उत्प्रेक्षा अलंकारांचा सुंदर वापर केला आहे. शेवटी कवीची प्रिया निसर्गातील विविध घटकांचे साज लेऊन जणू एखादी वनराणी अशी शोभून दिसते हे वर्णन खूप सुंदर आहे.
‘ चांदण्याचे नुपूर, केशराचे मळे ‘ ( रात्र काळी संपली ), ‘डोंगरमाथ्यावरचे कुरळे कुरळे मेघ, इंद्र दरबारातील नृत्यांगना सौदामिनी ‘( चैतन्याच्या लाख खुणा ) , ‘वणव्या सम हा टाकीत जाई उष्णरश्मीचे सडे’ (वैशाख) या उपमा अप्रतिम आहेत.
एखाद्या गोष्टीचे सर्वांगसुंदर वर्णन करायचे असेल तर कसे करावे याचे अप्रतिम उदाहरण म्हणजे ‘ सर्वांसाठी फुलत राहते….’ ही कविता.
किती मुरडावे, किती लचकावे, वळणे घ्यावी किती
सहजपणाने चढून जाते वेल ही भिंतीवरती॥
किंचित लवते,कधी थरथरते,शहारते कधी वाऱ्यानी
सांजसकाळी कातरवेळी बहरून येते कलिकांनी॥
‘ हिरवाई ‘ निसर्गाच्या हिरवाईचे वर्णन करणारी अतिशय सुंदर कविता. प्रत्येक ओळीत हिरव्या शब्दाचा अनुप्रास असल्याने छान लय आली आहे. कविता वाचताना हिरवा निसर्ग आपल्याही मनात उतरतो आणि या हिरवाईचे हिरवे गोंदण मनावर कोरले जाते. याच कवितेने कविता संग्रहाचा समारोप केलेला आहे. इथे हे हिरवे गारुड अक्षरशः भारून टाकते.
कवीने प्रेमाच्या विविध छटांच्या सुगंधित फुलांची ही ताजी ओंजळ रसिकांसाठी सादर केलेली आहे. तिचा दरवळ निश्चित रसिकांना आवडेल ही खात्री वाटते. अशाच सुंदर सुंदर कवितांचा रसिकांना लाभ घडावा यासाठी श्री सुहास पंडितांना पुढील लेखन प्रवासासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
परिचय : सौ. ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈