सुश्री प्रतिभा शिंदे
पुस्तकावर बोलू काही
☆ “सो कूल” – लेखिका : सुश्री सोनाली कुलकर्णी☆ परिचय – सुश्री प्रतिभा शिंदे ☆
सो कूल
लेखिका : सोनाली कुलकर्णी
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
किंमत : 309
परिचय : प्रतिभा शिंदे
हे पुस्तक लिहिलं आहे माझी आवडती मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने (गुलाबजाम, सिंघम सिनेमातील सीनियर सोनाली कुलकर्णी).
2005 ते 07 या दोन वर्षाच्या काळात तिने दैनिक लोकसत्ता मध्ये स्तंभ लेखन केले होते. त्याचेच एकत्रीकरण करून राजहंस प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
एक- दोन पानाचे 102 लेख यामध्ये आहेत. दैनंदिन आयुष्य जगताना, बालपणीचे अनुभव, कॉलेजमधले, प्रवासातले, अभिनय क्षेत्राच्या पदार्पणातले व यशस्वी झाल्यानंतरचे असे आयुष्यातल्या प्रत्येक वळणावरचे विविधरंगी अनुभव तिने या पुस्तकांमध्ये अतिशय सुंदर आणि समर्पक शब्दात शब्दबद्ध केलेले आहेत.
एक व्यक्ती म्हणून तिच्यात असणारी संवेदनशीलता प्रत्येक लेखातून जाणवते.
‘आजीचा बटवा, ” बुगडी माझी’ या लेखातून तिचे मजेशीर बालपण तिच्या असणाऱ्या विविध आवडी कळतात. या लेखांमध्ये अनेक मजेदार किस्से ही सांगितले आहेत.. जे वाचताना तिच्यातील बालिशपणा अजूनही आहे हे जाणवते.
“रात्रीच्या गर्भात”, “स्त्रीलिंगी असणं”, “पिकलं पान “अशा लेखांमधून तिच्यात असणारी प्रचंड संवेदनशीलता जाणवते. “सावळाच रंग तुझा” या लेखातून अभिनयाच्या पदार्पणाच्या वेळी तिच्या सावळ्या रंगावरून तिच्यावरती मारलेले शेरे व तिने त्यांना दिलेली ठाम उत्तरे खूपच कौतुकास्पद वाटतात.
शूटिंगच्या वेळी आलेले अनुभव, रस्त्यावर सिग्नल वरती फुगे विकणाऱ्या बायका, त्यांची मुलं, यांच्या विषयी वाटणारी कमालीची सहानुभूती तिच्यातील मनाचा मोठेपणा व माणुसकीचे दर्शन घडवते.
मुंबई -पुण्यासारखी महानगरे, देश विदेशातील अनुभव, तिथली संस्कृती, गमतीजमती वाचताना गंमत वाटते. तर उच्चभ्रू समाजातील आतल्या गोष्टी, नातेसंबंध, वाढणारा व्यभिचार, मुलांची परवड, हे वाचताना मन नक्कीच विषण्ण होते.
दोन बहिणी, सासू सून, मैत्रिणी, कलाक्षेत्रात काम करणाऱ्या दोन अभिनेत्री, त्यांच्यातील जेलसी, स्पर्धा, यावरती तिने केलेलं भाष्य आपल्याला नक्कीच विचार करायला लावणार आहे.
“जळलं मरो ते बायकी राजकारण का नाही आपण एकमेकींचा आदर करायचा” हे तिच्याच लेखणीतील वाक्य निश्चितच आपणाला विचार करायला लावतं..
तिचा स्पष्टवक्तेपणा, परखडपणा व प्रेमळ पणा सगळ्यात लेखांतून जाणवतो.. 235 पानांचे हे पुस्तक दोनच दिवसात वाचून पूर्ण झालं. अगदी सहजतेने तिच्यासमोर बसून गप्पा मारत आहोत असेच वाटलं..
इतकी यशस्वी अभिनेत्री असून सुद्धा आज ही तिचे पाय जमिनीवरच आहेत. तिच्यात प्रचंड माणुसकी व संवेदनशीलता आहे याचं खूप कौतुक वाटलं. व तिच्या विषयी मनात असणारी आवड आणि आदर निश्चितच दुणावला..
परिचय : सुश्री प्रतिभा शिंदे
मो. ९८५९७१७१७७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈