श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “स्पाय स्टोरीज (पुस्तक संच)” – लेखक : श्री अमर भूषण – अनुवाद : श्री प्रणव सखदेव ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
भारताच्या इंटेलिजन्स एजन्सीसाठी विशेषतः ‘रॉ’ साठी काम केलेल्या अमर भूषण यांनी स्वानुभवातून आणि सत्य घटनांवर आधारित लिहिलेल्या स्पाय स्टोरीजचा चार पुस्तकांचा संच …
१)एस्केप टू नोव्हेअर
२)मिशन नेपाळ
३) टेरर इन इस्लामाबाद
४) द झीरो- कॉस्ट मिशन
संच मूल्य: १०४०₹
☆☆☆☆
पुस्तक क्रमांक १
एस्केप टू नोव्हेअर
पृष्ठे: १८४ मूल्य: ३४०₹
भारताच्या ‘एक्सटर्नल इंटेलिजन्स सर्विहस’ अर्थात ‘एजन्सी’च्या सुरक्षा विभागाचा प्रमुख जीवनाथनकडे एकदा एक नवखा, पण हुशार अधिकारी आपला संशय व्यक्त करतो. त्याच्या मते, एजन्सीमधला एक वरिष्ठ अधिकारी परदेशी हेर म्हणून काम करतो आहे. त्यानंतर तातडीने तपास, चौकशी याचं सत्र सुरू होतं आणि संशयित अर्थात, रवी मोहनच्याभोवती सव्हॅलन्सचा जागता पहारा ठेवला जातो… या तपासातून रवी संवेदनशील माहिती चोरत आहे, याला पुष्टी देणारे अनेक तगडे पुरावे समोर येतात. तपास आणि सव्हॅलन्स पुढे चालू राहतो… आणि मग घडते अनपेक्षित अशी घटना, जिचा विचार कुणी कधी केलेला नसतो !
२००४ साली एक वरिष्ठ इंटेलिजन्स अधिकारी अचानक गायब झाला. तो काही दशकांपासून हेर म्हणून काम करतो, असा संशय होता. या सत्यघटनेवर आधारलेली ही कादंबरी, देशाची सुरक्षा, कर्मचाऱ्यांची नीतिमत्ता, ऑपरेशन चालवताना येणाऱ्या मर्यादा यांसारख्या अपरिचित विषयांबद्दल सामान्य माणसाला अंतर्दृष्टी देते.
पुस्तक क्रमांक २
मिशन नेपाल
पृष्ठे: १५९ मूल्य: २५०₹
थरारक आणि स्वानुभवातून उतरलेल्या इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणाऱ्या दोन कथा… द झिरो कॉस्ट मिशन आणि द वायली एजन्ट !
भारताच्या एक्स्टर्नल इंटेलिजन्स एजन्सीच्या ईस्टर्न सर्व्हिस ब्युरोचे प्रमुख जीवनाथन यांच्यावर एजन्सी हेडक्वार्टर्सने हा ब्युरो बंद करण्याचं काम सोपवलंय. प्रामुख्याने नेपाळ, आणि भारताच्या पूर्वेच्या अन्य शेजारी देशांच्या संदर्भात इंटेलिजन्स गोळा करणं, ऑपरेशन्स चालवणं असं या ब्युरोचं काम, परंतु बराच काळ त्यांच्याकडून फारशी उपयुक्त माहिती हाती आली नसल्याने या ब्युरोवर अधिक खर्च करत राहणं हेडक्वार्टर्सला मान्य नव्हतं. या परिस्थितीकडे जीवनाथन ब्युरोचं पुनरुज्जीवन करण्याची एक संधी म्हणून पाहतो आणि एकापाठोपाठ एक बेधडक ऑपरेशन्स आखतो… ही ऑपरेशन्स त्याचा ब्युरो वाचवू शकेल? नेपाळ आणि भारत यांचे संबंध सुधारतील?
थरारक आणि स्वानुभवातून उतरलेल्या इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणाऱ्या दोन कथा…
मिशन नेपाळ आणि द वॉक इन !
पुस्तक क्रमांक ३
टेरर इन इस्लामाबाद
पृष्ठे: १३५ मूल्य: २००₹
पाकिस्तानातल्या भारतीय दूतावासात सांस्कृतिक अधिकारी म्हणून काम करताना वीरसिंग भारताचा गुप्तचर एजन्ट म्हणूनही काम करत असतो. वीरसिंग एजंटकडे गुप्तचर विभागाने सीक्रेट मिशन सोपवलेलं असतं. तो ते फार सावधपणे पार पाडत असतो…
आता त्याची भारतात परत जाण्याची वेळ जवळ येऊन ठेपलेली असतानाच… अचानक एका रात्री त्याला पकडण्यात येतं… पाकिस्तानच्या इंटेलिजन्स अधिकाऱ्यांकडून ही कारवाई झाली असते ! तिथून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रश्नच नसतो, प्रश्न असतो तो दुश्मनांच्या त्या प्रदेशात वीर आपली गुपितं, माहिती आणि सोर्सेस यांचं संरक्षण कसं करणार ? तो त्यात यशस्वी होणार का ?
थरारक आणि स्वानुभवातून उतरलेली इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणारी कथा… टेरर इन इस्लामाबाद !
पुस्तक क्रमांक ४
द झीरो – कॉस्ट मिशन
पृष्ठे: १६७ मूल्य: २५०₹
जमात – ए – इस्लामीच्या कारवायांमुळे भारत – बांगलादेश संबंध बिघडतात. कारण असतं जमातच्या छावण्यांमधून केली जाणारी पाकिस्तानच्या आय. एस. आय. ला मदत. या छावण्यांत प्रशिक्षित एजंट्स भारतात पाठवून दहशतवादी कारवाया करतात. भारताच्या एक्सटर्नल इंटेलिजन्स एजन्सीच्या बांगलादेश ऑपरेशन्सचे प्रमुख विजय शुक्ला एक धाडसी प्लॅन आखतात. त्यासाठी आवश्यक असतो अंगी कौशल्यं असलेला, आव्हानांना भिडण्याची वृत्ती असलेला आणि गरज पडली तर वरिष्ठांबद्दल काहीशी बेफिकिरी दाखवू शकणारा माणूस. असे गुणधर्म अंगी असतील असा ‘ऑपरेटिव्ह’ एजन्सीला मिळेल? मुख्य म्हणजे त्यांची योजना यशस्वी होईल ?
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈