श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “देहभान ” – लेखक – श्री निरंजन मेढेकर  ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : देहभान 

लेखक : निरंजन मेढेकर 

पृष्ठ: १६८ 

मूल्य: २५०₹

बेंगळुरूमध्ये २०२२ मध्ये घडलेली घटना समस्त पालकवर्गाची झोप उडवायला पुरेशी आहे. परवानगी नसतानाही बरीच मुलं सोबत मोबाईल आणतात, याची कुणकुण लागल्यानं तिथल्या काही खासगी शाळांनी आठवी ते दहावीच्या मुलामुलींची दप्तरं अचानक तपासली. त्यांच्या दप्तरांमध्ये मोबाईलसोबतच निरोध, गर्भनिरोधक गोळ्या, सिगारेट, व्हाईटनर अशा धक्कादायक गोष्टी सापडल्या. लैंगिकता शिक्षण आणि जबाबदार लैंगिक वर्तनाचे धडे हे किशोरावस्थेपासून देणं किती गरजेचं आहे, हे अशा घटनांमधून ठळक होत आहे. कारण पालकांनी आणि शिक्षकांनी ते दिलं नाही तर इंटरनेट, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर ते एका क्लिकवर आज सर्वच वयोगटातील मुलांना उपलब्ध आहे. तरुणाईचा विचार करता सोशल मीडियावरील वाढत्या अवलंबित्वामुळेही त्यांच्याही नकळत स्क्रीनच्या, पॉर्नच्या विळख्यात ते अडकत आहेत.

लैंगिक गुन्हेगारीचा विचार करता सायबर क्राईममध्ये सेक्सटॉर्शन आणि हनीट्रॅपच्या केस झपाट्यानं वाढताहेत. पुण्यात सप्टेंबर २०२२मध्ये काही दिवसांच्या अंतरानं सेक्सटॉर्शनच्या विळख्यात अडकलेल्या दोन तरुणांनी बदनामीच्या भीतीनं आत्महत्या केली. यांपैकी एक तरुण ३० वर्षांचा आयटीआय पासआऊट होता, तर दुसरा अवघा २२ वर्षांचा महाविद्यालयीन युवक होता. पण लैंगिक गुन्ह्यांच्या तसंच विकृतीच्या चक्रात होरपळणाऱ्या मुलांचं आणि मोठ्यांचं प्रमाणही झपाट्यानं वाढत असलं, तरी लैंगिक शिक्षणासाठी अजूनही ठोस म्हणावं असं कुठलंही शैक्षणिक अथवा सामाजिक धोरण नाही, ही समाज म्हणून आपली मोठीच शोकांतिका आहे. इंटरनेट, स्मार्टफोन आणि ओटीटीच्या क्रांतीमुळे मानवी वर्तनात आमूलाग्र असे बदल झालेत, अजूनही होताहेत. यात मनुष्याच्या आदिम भावना आणि गरजांचा विचार करता झोपेवर जसा थेट परिणाम झालाय, तसाच तो कामभावनेवरही झालाय. थोडक्यात काम आणि लैंगिकतेसंदर्भात समाज म्हणून बहुतेक आपण सगळेच जण आज भांबावलेल्या स्थितीत आहोत. माहितीच्या विस्फोटामुळे यातलं नक्की बरोबर काय आणि चूक काय, हा विचार करायलाही कुणाकडे फुरसत नाहीये.

आपल्या समाजात बालपणी लैंगिकता शिक्षणाचा असणारा संपूर्ण अभाव हा कसा मोठेपणी लैंगिक विकृतींना, व्याधींना जन्म देतो ही बाब वेळोवेळी अधोरेखित होते. किशोरावस्थेत हस्तमैथुनाबाबत योग्य शास्त्रीय माहिती न मिळाल्यानं त्याविषयीचा न्यूनगंड तर मुलांच्या मनात वाढतोच, पण त्याचंच पर्यवसान मोठेपणी शीघ्रपतनासारख्या व्याधींमध्ये होऊ शकतं (शीघ्रपतन इतर अनेक कारणांनीही होतं). कारण हस्तमैथुन करणं अगदी नैसर्गिक आहे, ते करण्यात पाप नाहीये आणि म्हणूनच ती घाईघाईत उरकण्याची गोष्ट नाहीये, याचं मार्गदर्शनच लहानपणी कधी मिळत नाही. दुसरीकडे स्त्रियाही हस्तमैथुन करतात, याबद्दल तर कमालीचं अज्ञान आणि गैरसमज आहेत. खुद्द स्त्रियांनाही आपल्या जननेंद्रियांविषयी, शिश्निकेसारख्या सुखसंवेदना निर्माण करणाऱ्या अवयवाची ओळख नसते. नकळत्या वयापासूनच स्वतःच्या शरीराबद्दल माहिती देताना जननेंद्रियांना केवळ संकोचामुळे वगळलं जातं. किंवा फारफार तर ते ‘गुड टच बॅड टच’पुरतं सीमित केलं जातं. पण ज्या अवयांबद्दल, ज्यांच्या कार्याबद्दल स्वतःलाही पुरेशी ओळख नाहीये, तिथे ध्यानीमनी नसताना तिहाइतानं केलेला स्पर्श हा बॅड टच असूनही सुखावह वाटू शकतो, याची माहिती किती मुलांना आणि मोठ्यांनाही असते ?

मानवी नात्यांमधला लैंगिकता हा मूलभूत पैलू…. .

आजची तरुणाई त्याकडे कशी बरं बघते ?

उत्तम सहजीवनासाठी नेमकं काय करायला हवं?

विवाहपूर्व लैंगिक समुपदेशन का हवं?

सुखी संसाराचं गुपित काय?

बदलत्या जीवनशैलीमुळे लैंगिकतेवर परिणाम झाले आहेत का? ते कोणते?

त्या समस्यांना कसं तोंड द्यायचं ?

ज्येष्ठांचं सहजीवन हा दुर्लक्षित राहिलेला विषय. त्याचं महत्त्व काय?

हे आणि असे अनेक प्रश्न. . .

सर्व वयोगटाला पडणारे. . . ते कोणाला विचारायचे ?

– – – या प्रश्नांची शास्त्रीय पद्धतीनं उत्तरं देणारं हे पुस्तक.

या विषयातले वैद्यकीय तज्ज्ञ, समुपदेशक, स्वयंसेवी संस्थांमधले कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून, संशोधनांचा अभ्यास करून लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे लैंगिकतेच्या व्यापक विषयाकडे बघण्याच्या संकुचित दृष्टिकोनाचा अडसर दूर करत मोकळेपणानं संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. हे पुस्तक वाचून तुम्हाला तुमच्या आप्तांसोबत असा मोकळा संवाद प्रस्थापित करता यावा, ही अपेक्षा.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments