संपादकीय निवेदन
ई-अभिव्यक्ती विविधांगी व्हावा या दृष्टीने आपण अनेक सदरे सुरू केली आहेत. लेखन कलेला वाव मिळावा, परस्परांचे साहित्य वाचता यावे, विविध विचार, कल्पना, मांडणी, अनुभवता यावेत हा उद्देश सफल होत आहेच. त्याच वेळेला आपल्या स्वतःच्या लेखनासंबंधी विचार करता येतो. सकस साहित्य निर्मितीसाठी प्रयत्न करत राहणे हा यामागचा मुख्य हेतू आहे.
मराठी साहित्यात कविता हा थोडासा चेष्टेचा विषय झाला आहे की काय अशी शंका हल्ली येऊ लागली आहे. कविता हा सर्वांत सोपा साहित्य प्रकार आहे अशी समजूत करून घेतल्यामुळे कवितेचे पीक उदंड येते असे वाटू लागले आहे. पण ते सकस किती असते? कविता ही जशी कला आहे तसे कवितेचे एक शास्त्रही आहे. कविता उत्स्फूर्तपणे सुचणे हे कविच्या संवेदनशील मनाचे प्रतिक आहे यात शंकाच नाही. पण ती रसिक वाचकांसमोर सादर करण्यापूर्वी त्यातील त्रुटींचा अभ्यास करावा व ती शक्यतो दोषमुक्त असावी. त्यामुळे कवितेचा दर्जा उंचावेल व चांगली कविता वाचायला मिळेल.
कवितेची उत्स्फूर्तता
आणि कलात्मकता याबरोबरच तिचे शास्त्र समजून घेता यावे यासाठी आम्ही एक नवीन सदर सुरू करीत आहोत.
काव्यलेखन: कला आणि शास्त्र
यामध्ये कविता लेखनाचे विविध प्रकार, वृत्ते, छंद इ. विषयी सोदाहरण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. आपण सर्वांनी या सदरासाठी लेखन करून याविषयी चे आपले ज्ञान इतरांना उपलब्ध करून द्यावे ही विनंती.
तरी सदरासाठी लेखन करू इच्छिणा-यांनी कृपया कविता विभागाशी संपर्क साधावा.
या सदराचे नेमके स्वरूप, नियम याविषयी लवकरच कळविण्यात येईल.
संपर्कासाठी:
सुहास रघुनाथ पंडित
संपादक ई–अभिव्यक्ती (मराठी)
व्हाॅटस् ऍप नं. 9421225491
मेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈