सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सुश्री दीप्ती कुलकर्णी
☆ 💐 अभिनंदन 💐 सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी – आणि त्यांची एक कविता. ☆
दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील “कवी-कट्टा” साठी आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री सुश्री दीप्ती कुलकर्णी यांच्या कवितेची निवड झाली असून, २२ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी या ‘ कवि-कट्टा ‘ मध्ये कविता-सादरीकरणासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
“माझी माय मराठी“ ही त्यांची कविता त्यासाठी निवडली गेली आहे. विशेष सांगायचे म्हणजे कविता – सादरीकरणाच्या या खास कार्यक्रमासाठी एकूण १३४६ कविता प्राप्त झाल्या होत्या व त्यापैकी फक्त ३०० कवितांची निवड करण्यात आली आहे, आणि त्यात दीप्तीताईंची ही कविता आहे. ही त्यांच्यासाठी आणि आपल्या समूहासाठीही अतिशय आनंदाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे.
— आपल्या सर्वांतर्फे दीप्तीताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि या विशेष सादरीकरणासाठी असंख्य शुभेच्छा. आणखी एक विशेष बाब म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविता सादर करण्याची अशी संधी त्यांना तिसऱ्यांदा मिळते आहे… या ‘हॅटट्रिक’ साठीही त्यांचे खूप अभिनंदन.
आजच्या अंकात वाचू या त्यांची ही विशेष कविता…
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ माझी माय मराठी ☆
☆
माझी माय मराठी
अभिमाने येते ओठी ||धृ ||
*
कवितेसह हर्षे येते
भारुड,गवळण गाते
पोवाड्यांतुनी ही रमते
ओव्यामधुनी ती सजते ||१||
*
विश्वात कथेच्या फुलते
शब्दालंकारे खुलते
तेजोन्मेषे नि पांडित्ये
मोहिनी जणू घालिते ||२||
*
कधी कादंबरी ही बनते
अन शब्दांसह डोलते
भेदक ,वेधक ती ठरते
सकलांना काबिज करते ||३||
*
लालित्ये ही मांडते
संवादानी उलगडते
नाट्यातुनी ही प्रगटते
नवरसातुनी दर्शविते ||४||
*
सारस्वतांसी जी स्फुरते
विश्वाला स्पर्शही करते ||
☆
कवयित्री : दीप्ती कोदंड कुलकर्णी, हैदराबाद.
Mobile No-9552448461.
💐 ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे सुश्री दीप्ती कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 💐
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈