श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा  ?

☆ शब्द शब्द जपून बोल ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

आम्ही आठ-दहा मैत्रिणी महिन्यातून एकदा एकी-एकीकडे जमतो. गप्पा-गोष्टी, काही नवीन पाहिलेलं-ऐकलेलं एकमेकींना सांगतो. अधूनमधून सामाजकारण, राजकारण, साहित्य. संस्कृती, पर्यावरण आदी क्षेत्रांचाही फेरफटका होतो. दोन-तीन तास मजेत जातात.

आम्ही आशा तर्हेैने एकत्र येऊन गप्पाटप्पा करतो, त्याला आमची`मीटिंग’ म्हणतो. आमचे नवरे आमचं `इटिंग’ म्हणतात. `तुमचा इटिंग डे’ कधी आहे?’ अशी घरात विचारणा होते. त्यांचंही खोटं नसतं. आमची मीटिंग, म्हणजे  आमचं एकत्र येणं, कुठल्याही कामाबाबत गंभीर चर्चा, नियोजन, निर्णय घेणं, या गोष्टी काही त्यात नसतात. `इटिंग’ मात्र नक्कीच असतं. त्या निमित्ताने एकेकीला आपण किती सुगरण आहोत, हे दाखवण्याची संधी मिळते. बाकीच्यांनी केलेल्या कौतुकाने ती खूशअसते. छान छान पदार्थ आयते खायला मिळाल्याने बाकीच्याही खूश असतात. मुख्य म्हणजे नंतरची आवरा-आवरी, भांड्यांची विसळा-विसळी हे काही नसतं. त्यामुळे निवांतपणे आणि मन:पूर्वक आस्वाद घेतला जातो पदार्थांचा. तेव्हा नावार्यांकचं `इटिंग डे’ म्हणणं अगदीच काही चुकीचं नसतं.

सख्यांनो, आपण सगळ्याच जणी कुठल्या ना कुठल्या व्यापात सतत गुंतलेल्या असतो. महिन्यातून असा एखादा दिवस आनंदात, मजेत घालवला की रोजच्या चाकोरीतून चालायला नवा जोम येतो. पाडगावकरांनी एका कवितेत लिहिलय, `कसंजगायचं? हसत खेळत की रडत कुढत… ते ज्याचं त्यानं ठरवायचं.’ आम्ही ठरवलय, हसत खेळत, मजेत- आनंदात जगायचं.

सख्यांनो, कधी कधी मात्र असं होतं, या आनंदाच्या डोहात, एखाद दुसरा मातीचा खडा पडतो आणि आनंद तरंग डहुळतात. पाणी गढूळ होतं. कुणाचं वागणं-बोलणं, त्या मजेला  खार लावून जातं. हे सारं मुद्दाम कुणी करतं, असंही नाही. अभावितपणे ते घडतं. कुणाला दु:ख द्यावं, हिरमुसलं करावं,  असा हेतू नसतो. अजाणतेपणे केलेल्या टीका-टिप्पणीने दुसरा दुखावून जातो.

मागच्याच आठवड्यातील गोष्ट. आमची मीटिंग होती सुजाताकडे. तिथे येताना रेखा एक नवी पर्स घेऊन आली. `ऐय्या… कित्ती छान!’ झालं आणि बोलणं किमतीवर घसरलं.` दोनशे रुपये’ रेखा म्हणाली. `मस्तचाय ग! आणि अगदी रिझनेबल! कुठे सांगलीत घेतलीस?’

`नाही ग! गेल्या महिन्यात बंगलोरला गेले होते ना, तिथे घेतली.’

`तरीचइतकी स्वस्थ आणि मस्त… सांगलीत काही तीनशेच्या खाली मिळाली नसती.’

नीलाला आता अगदी रहावलं नाही. `अशा पर्सेस दिल्लीला शंभर शंभर रुपयाला मिळतात. गेल्या वर्षी आम्ही गेलो होतो, तर चार-पाच पर्सेस आणल्या. दोनशेलाच म्हणत होता आधी. खूप बारगॅनिंग करावं लागलं, तेव्हा कबूल झाला. शंभर रुपयाला द्यायला. शिवाय रेक्झीनही इतकं चांगलंआहे. नीला आपला मुद्दा सोडायला तयार नव्हती. नाही म्हंटलं तरी रेखाचा मूड गेलाच. तशी अर्चना म्हणाली, `लंकेत सोन्याच्या विटा … उपयोग काय? आपल्याकडे असेल ते खरं!’

सुनीता जरा जास्तच फटकळ. म्हणाली, `एवढ्या स्वस्त होत्या पर्सेस, तर आमच्या सगळ्यांसाठी नाही का आणायच्यास? आम्ही दिले असते शंभर शंभर रुपये.’ नीलानं नाक उडवलं, पण रेखाला थोडं बरं वाटलं.

सुनीताला हे चांगलंजमतं. केव्हा, कुठे, काय कसं बोलावं, वातावरणातला ताण कमी कसा करावा, हे तिच्याकडून शिकावं.

कुणीम्हणालं, अडीचशेला साडी घेतली’, तर ती म्हणेल, `तुला बरी बाई अशी खरेदी जमते. मला साडे तीनशेला पडली अशी साडी. यापुढे खरेदीला जाताना तुलाच घेऊन जाईन.’ सांगणारी खूश आपल्या व्यवहार चातुर्यावर.  सुनीता हे सांगताना पुष्कळदा खरेदीच्या किंमतीबद्दल खोटंही बोलते. मला ते माहीत असतं, पण त्या छोट्या छोट्या खोट्यातून काही आनंदाचे क्षण ती दुसर्याआच्या ओंजळीत टाकते. दैनंदिन जीवनात अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी, आपल्याला छोटी-मोठीसुखं… आनंद मिळवून देत असतात, किंवा मग दु:ख देतात, उदासीन करतात. वैषम्य वाढवतात. म्हणूनच आपण आपल्याकडून, आपल्या वागण्या –बोलण्यातून दुसर्यां ना आनंद देता येईल ना हे पाहिले पाहिजे. त्यासाठी अट्टाहासाने वेगळं काही करायची गरज नाही. दुसर्यां च्या आनंदात सहभागी होता आलं, चार-दोन शब्दांनी तो व्यक्त करता आला, तरी पुरे, पण मुकाट न बसता तो व्यक्त मात्र करायला हवा. व्यक्ती-व्यक्तीच्या माध्यमातून तो द्विगुणित, त्रिगुणित, शतगुणित व्हायला हवा.

एकदा सांगलीतील शांतिनिकेतनच्या मैदानावर आम्ही काही मैत्रिणी फिरायला गेलो होतो. मैदानाच्याकडेला असलेली गुलमोहराची दहा-बारा झाडे लाल-केशरी फुलांनी ओसंडून गेली होती. मी उत्स्फूर्तपणेम्हंटल`बघा, ‘गुलमोहराची झाडे कशी मशाली पेटवल्यासारखी दिसताहेत. ‘

निशा म्हणाली, ‘हे कायबघतेस? मधुबनी पार्कमध्ये गेटपासून कारंजापर्यंत दुतर्फा असे गुलमोहर उभे आहेत. आपण त्यांच्या कमानीतूनच चालतो, असं वाटतं!’ आता मधुबनी पार्कमधल्या गुलमोहराच्या फांद्यांनी केलेल्या फूलवंती कमानीतूनही जाता आलं नाही, तर काय समोर फुललेल्या या गुलमोहराचा आनंद घेऊ नये? पण आमच्या निशाला अशी सवयच आहे, काही दाखवा, ऐकवा, सांगा, तिची त्यावर प्रतिक्रिया अशी, `अग, हे काय पाहतेस, किंवा ऐकतेस, किंवा हे काय वाचतेस….’ तिने कधी तरी, कुठे तरी, पाहिलेलं दृश्य अगदी खास असं असतं, ऐकलेलं गाणं किंवा व्याख्यान अलौकिक असतं. वाचलेलं पुस्तक…. ‘आहाहा… काय सांगू त्याच्याबद्दल?’ असंअसतं. एखाद्या गोष्टीचा आनंद त्या त्या क्षणी तिला आपल्या चर्मचक्षूंनी घेताच येत नाही. त्या प्रत्येक वेळी, ती आपल्या मन:चक्षूंनी आपल्या स्मृतिकोशातला आनंदच कुरवाळत असते.

एखादं दृश्य पाहताना, एखादा अनुभव घेताना, पूर्वी तशा प्रकारचा घेतलेला अनुभव आठवणं स्वाभाविक असतं. त्यामुळे फारसं कही बिघडत नाही, पण आपणच काय त्या व्यवहार चतूर… अचूक निर्णय घेणार्या,, आपण पाहिलं, ते अद्वितीय, आपणवाचलं ते अलौकिक… आपली अभिरुची खास अशी.,. वेगळी… इतर पाहतात, ऐकतात, वाचतात, ते सामान्य, असे अहंतेचे पदर उलगडू  लागले, की त्यांचं बोलणं, वातावरणात कटुतेचं धुकं निर्माण करतं. आनंदाचा डोह ढवळून टाकतं.

या दुखर्यां जागा लक्षात ठेऊन, आपल्या शब्दांनी कुणाला दुखापत होणार नाही ना, याची आपल्याला काळजी घेता येईल ना?

© श्रीमती उज्ज्वला केळकर

मो. 9403310170,   e-id – [email protected]  

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments