हेमन्त बावनकर
– संपादकीय –
🙏🌹💐 “पद्मविभूषण” – कै. रतन टाटा जी” – विनम्र आदरंजली 💐🌹🙏
भारताच्या सर्वांगीण विकासामध्ये सातत्याने अत्यंत महत्वाचे आणि मोलाचे योगदान देणारे भारताचे सुपुत्र “पद्मविभूषण” माननीय कै. रतन टाटा यांचे काल दु:खद निधन झाले हे आपण सर्वजण जाणताच. राष्ट्रीयत्वावर खऱ्या अर्थाने श्रद्धा असणारे कै. रतन टाटा हे भारतीय उद्यम विश्वातले, कमालीची दूरदृष्टी असणारे अग्रणी होते. भारतातील कितीतरी महत्वाच्या उद्योगांचे ते जनक होते हे तर निर्विवाद सत्य आहे. त्यांनी देशाला औद्योगिक प्रगतीची फक्त दिशाच दाखवली असे नाही, तर त्या क्षेत्रात अधिकाधिक प्राविण्य मिळावे, देशाने विविध उद्योगांच्या क्षेत्रात बाकीच्या जगाबरोबर राहण्याच्या उद्दिष्टाने आधुनिकीकरणाचा ध्यास घ्यावा यासाठी ते सदैव प्रयत्नशील होते. भारतीय उद्योग क्षेत्राला जागतिक पातळीवर एक महत्वपूर्ण स्थान प्राप्त व्हावे हे त्यांचे स्वप्न होते आणि ते पूर्ण व्हावे यासाठी ते स्वतः सातत्याने .. अगदी अखेरपर्यंत प्रयत्नशील होते. मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीच्या उत्पादनापासून ते देशाच्या व जनतेच्या महत्वाच्या गरजेच्या असलेल्या अनेक वस्तूंच्या उत्पादनापर्यंत आणि इतकेच नाही तर आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास सेवेपर्यंत त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे. उत्तम प्रतीच्या दर्जेदार अशा अनेक उत्पादनांचे उत्पादक अशी त्यांच्या ‘ टाटा उद्योग समूहा ‘ ची ख्याती जगभर पसरलेली आहे हे तर आपण जाणतोच.
कै. रतन टाटा हे फक्त उद्योजकच नव्हते, तर समाजातील इतरांची दु:खे दूर करण्यासाठी सातत्याने झटणारे एक खरे समाजसेवक होते यात दुमत नक्कीच नसणार, आणि त्यांचे वेगवेगळ्या स्वरूपातले व्यापक समाजकार्य हे त्याचेच द्योतक आहे.
“HE WAS A MAN WITH A HEART OF GOLD” असे त्यांच्याविषयी सार्थपणे म्हटले जाते.
आज ते ऐहिक दृष्ट्या हे जग सोडून गेले हे जरी सत्य असले, तरी ते फक्त भारतातील अखिल उद्योग विश्वावरच …आपणा सर्व भारतीयांवरच नाही, तर संपूर्ण जगावर चिरकालासाठी आपला अमीट ठसा उमटवून गेले आहेत हेही तितकेच सत्य आहे.
आज प्रत्येक भारतीय मन त्यांच्या निधनामुळे हळहळत आहे याची खात्री आहे.
पद्मविभूषण कै. रतन नवल टाटा या सर्वार्थाने महान आणि वंदनीय असणाऱ्या भारतीय उद्योजकांना आपल्या ई-अभिव्यक्ती समूहातर्फे मनःपूर्वक आदरांजली. 💐🌹🙏
आजचा हा अंक त्यांच्या पवित्र स्मृतींना अर्पण करत आहोत.
– हेमन्त बावनकर
संपादक मंडळ – ई–अभिव्यक्ती (मराठी विभाग)
☆☆☆☆
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈