सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १० जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
कमलाबाई टिळक
कमलाबाई विष्णू टिळक(26 जून 1905 – 10 जून 1989) या लेखिका होत्या.
त्या पूर्वाश्रमीच्या कमला अनंत उकिडवे. मॅट्रिकला मुलीत पहिल्या आल्या. त्यांना संस्कृतसाठी जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती, चॅटफिल्ड, यमुनाबाई दळवी पारितोषिक मिळाले.
इंग्रजी साहित्य घेऊन त्या प्रथम वर्गात एम.ए. उत्तीर्ण झाल्या.
हुजूरपागेच्या मुलींच्या महाविद्यालयाच्या त्या प्राचार्या होत्या. नंतर बनारस येथील मुलींच्या महाविद्यालयात त्या इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या. पुढे त्या तिथे प्राचार्या झाल्या.
निवृत्तीनंतर फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या सल्लागार समितीवर त्यांनी आठ वर्षे काम केले.
त्यांच्या अनेक कथा ‘रत्नाकर’, ‘मनोहर’, ‘यशवंत’, ‘स्त्री’ वगैरे मासिकांतून प्रसिद्ध झाल्या.
‘हृदयशारदा’, ‘आकाशगंगा’, ‘अश्विनी’, ‘सोन्याची नगरी’ हे कथासंग्रह, ‘शुभमंगल सावधान’ ही कादंबरी, ‘स्त्री-जीवन विषयक काही प्रश्न’, ‘स्त्री-जीवनाची नवीन क्षितिजे’, ‘युधिष्ठिर’ इत्यादी वैचारिक लेखन, तसेच बालवाङ्मय आणि एकांकिका असे बरेच लेखन कमलाबाईंनी केले.
प्रसंगांचा चटकदारपणा, चरित्र- चित्रणाचा मार्मिकपणा,
चिंतनशीलता, सूक्ष्म विश्लेषण, तंत्रावरील प्रभुत्व व भाषेचे सहजसौंदर्य ही त्यांची खास वैशिष्ट्ये होती. स्त्रीला जाणवलेली भिन्नभिन्न स्त्री-रूपे, त्यातील वेगवेगळ्या छटा, गुंतागुंत ही त्यांनी अकृत्रिमपणे व तटस्थपणे उलगडून दाखवली.
त्यांची व बालगंधर्वांची जन्मतारीख एकच. त्या विनोदाने म्हणत, “त्या तारखेचे रूपसौंदर्य बालगंधर्वांनी घेतले. माझ्या वाटणीला काही उरलेच नाही.”
त्यांची ही विनोदी वृत्ती, शिक्षणाने मिळालेली समृद्धी, वैचारिकता, सहृदयतेने स्त्रियांच्या मानसिकतेकडे पाहण्याची व प्रश्नांच्या सर्व पैलूंना स्पर्श करण्याची परिपक्वता, अंतर्मनाच्या गाभ्याला भिडण्याची क्षमता वगैरे गोष्टी कमलाबाईंच्या लेखनातून जाणवतात.
कमलाबाई टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विवेक :महाराष्ट्र नायक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈