सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ११ डिसेंबर –  संपादकीय  ?

आज ११ डिसेंबर : –

संस्कृत आणि भारतीय संस्कृती या विषयांचे गाढे अभ्यासक, आणि त्यासंदर्भात विपुल लेखन करणारे प्रसिद्ध लेखक श्री. रामचंद्र नारायण तथा रा.ना. दांडेकर यांचा आज स्मृतिदिन. ( १७/०३/१९०९ – ११/१२/२००१ ) 

१९३६ साली जर्मनीतून पीएच.डी. ही पदवी प्राप्त केल्यानंतर, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून त्यांची कारकीर्द सुरु झाली. नंतर पुणे विद्यापीठात संस्कृत व प्राकृत भाषाविभाग प्रमुख, कला विभाग प्रमुख, पुढे संस्कृत प्रगत अध्ययन केंद्राचे संचालक, भांडारकर प्राच्यविद्या मंदिराचे मानद सचिव आणि नंतर उपाध्यक्ष, अशी अनेक महत्वाची पदे त्यांनी सांभाळली होती. आपल्या उपखंडातील विविध भाषांसंदर्भात संशोधन आणि इतर संलग्न कामे करणाऱ्या अनेक भारतीय, तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांच्या कामात त्यांचा सतत सक्रीय सहभाग असायचा. “ युनेस्को “ चे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले होते. 

त्यांनी बरेचसे साहित्य इंग्लिशमध्ये लिहिले होते– वैदिक सूची– ६ खंड, इनसाईट इनटू हिंदुइझम, हडप्पन बिब्लिओग्राफी, रिसेन्ट ट्रेंड्स इन इंडॉलॉजी, संस्कृत स्टडीज आउटसाइड इंडिया, वैष्णविझम अँड शैविझम,- अशासारखी त्यांची अतिशय सखोल अभ्यासपूर्ण पुस्तके म्हणजे अभ्यासकांसाठी महत्वाचे मार्गदर्शक ठरलेले आहेत. हिंदुधर्म–इतिहास आणि आशय, तसेच, वैदिक देवतांचे अभिनव दर्शन, ही त्यांची मराठी पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. 

१९६२ साली भारत सरकारने “ पद्मभूषण “ हा सन्मान देऊन त्यांना गौरविलेले होते. आणि २००० साली त्यांना साहित्य अकादमीची फेलोशिप देण्यात आली होती. 

पद्मभूषण श्री रा.ना.दांडेकर यांना आजच्या स्मृतिदिनी विनम्र आदरांजली. 

☆☆☆☆☆

आज र. गो. ( रघुनाथ गोविंद ) सरदेसाई यांचाही स्मृतिदिन. ( ७/९/१९०५ – ११/१२/१९९१ ) 

लेखक, पत्रकार, संपादक, कथाकार, नाट्य-चित्र समीक्षक, आणि क्रीडाविषयक पुस्तकांचे लेखक,  अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणारा  कर्तृत्ववान माणूस अशीच श्री. सरदेसाई यांची ओळख सांगायला हवी. 

चित्रमय जगत, आणि स्फूर्ती या मासिकांचे ते अनु. सहसंपादक व संपादक होते. मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या चित्रा, तारका, नवयुग, विविधवृत्त, विहार, या साप्ताहिकांमध्ये, मराठा या दैनिकामध्ये, आणि यशवंत या मासिकासाठी त्यांनी अनेक वर्षे संपादकीय काम केले होते. नवाकाळ या प्रसिद्ध दैनिकाचे सहसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. क्रीडा व नाट्य या विषयांवर त्यांनी वृत्तपत्रातून विपुल लेखन केले होते. त्यांचे क्रीडाविषयक लिखाण ‘ हरिविवेक ‘ या टोपणनावाने ते करत असत.  

याव्यतिरिक्त, त्यांची पुढील पुस्तकेही प्रसिद्ध झाली होती —-’ आमचा संसार ‘ हा विनोदी लेखसंग्रह, ‘ कागदी विमाने ’ , ‘ चलती नाणी ‘, हे लघुनिबंध संग्रह, ‘ खेळ किती दाविती गमती ‘ 

या नावाने विविध खेळांच्या कथा, ‘ खेळाचा राजा ‘ हा लॉन टेनिसचा संपूर्ण इतिहास सांगणारा ग्रंथ, 

‘ क्रीडा ‘ हे खेळ आणि खेळाडू यांच्याबद्दलचे चुटके सांगणारे पुस्तक, ऑलिम्पिक सामन्यांविषयी माहिती देणारे ‘ खेळांच्या जन्मकथा ‘ हे २ भागातले पुस्तक.

 त्यांनी लिहिलेले ‘ हिंदी क्रिकेट ‘ या नावाचे पुस्तक हे मराठीतले क्रिकेटसंबंधीचे पहिले पुस्तक म्हणून ओळखले जाते. 

चित्रा, स्वाती, महाश्वेता, असे त्यांचे कथासंग्रह, बहुत दिन नच भेटती या नावाने ललित लेख, माझ्या पत्र-जीवनातील शैली हा व्यक्तिचित्रणांचा संग्रह, सुरसुरी हा विनोदी लेखसंग्रह, असे त्यांचे इतर वैविध्यपूर्ण साहित्यही  प्रसिद्ध झालेले होते. 

श्री र.गो.सरदेसाई यांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी सादर अभिवादन.  

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

माहितीस्रोत :- इंटरनेट

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Prabha Sonawane

सुंदर लेख ⚘

विनम्र अभिवादन ?? स्व. दांडेकर आणि सरदेसाई यांना !