सौ. उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ १२ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

महामोहपाध्याय बाळशास्त्री हरदास हे महाराष्ट्रातील व्युत्पन्न व्यक्तिमत्व. प्रकांड पंडित. त्यांचे हे जन्मशताबदीचे वर्ष. त्यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणातून ‘वेदातील राष्ट्रदर्शन समाजाला घडवले. त्यांची वाणी ओघवती, अस्खल्लीत आणि रसाळ होती. बापूजी अणे म्हणायचे, ‘बाळशास्त्री केवळ साहित्याचार्य नव्हते, तर चालते बोलते विद्यापीठ होते.

देवता ‘श्रीदक्षिणामूर्ती’ त्यांचे उपास्य दैवत. दक्षिणा म्हणजे ज्ञान. अर्थातच बाळशास्त्री ज्ञानाचे उपासक होते. वयाच्या आठव्या वर्षी ते प्राच्य विद्येकडे वळले. अठरा वर्षाचे असताना त्यांनी, ‘काव्यातीर्थ, ‘वेदांततीर्थ’, आणि ‘साहित्याचार्य’ या तीनही परीक्षा दिल्या व त्यात ते उत्तम श्रेणीत पास झाले. त्यानंतर त्यांनी संस्कृत पंचमहाकाव्ये आणि वेदशास्त्राचा अभ्यास केला. त्यांचा अव्याहत व्यासंग पाहून गोवर्धन पीठाच्या शंकराचार्यांनी त्यांना ‘  महामोहपाध्याय’ ही पदवी दिली. ऋग्वेद, अथर्ववेद, उपनिषदे, पुराणे, रामायण, महाभारत यावर त्यांनी खूप लेखन केले, तसेच व्याख्यानेही दिली. याशिवाय, वेदातील राष्ट्रदर्शन, भारतीय स्वातंत्र्य समर, आर्य चाणाक्य, शिवाजी, स्व. सावरकर, डॉ. हेडगेवार यावरही त्यांनी व्याख्याने दिली.

महाराष्ट्र या वृत्तपत्रातून ते दर रविवारी ‘साहित्य समालोचन’ हे सदर लिहीत. त्यांनी जवळ जवळ २००० साहित्य समीक्षणे लिहिली आहेत. बाळशास्त्रींची व्याख्याने ऐकणे ही मोठी आनंददायी गोष्ट असे. ओघवती भाषा, रसाळ वाणी, भारदस्त शब्दांचा वापर, पल्लेदार वाक्यांची फेक आणि विषयाच्या मांडणीतून दिसून येणारी विद्वत्ता ही सारी त्यांच्या व्याख्यानांची वैशिष्ट्ये होती.  भारतीय स्वातंत्र्य समर, आर्य चाणाक्य, शिवाजी, स्व. सावरकर, डॉ. हेडगेवार इ. विषयांवरील त्यांची व्याख्याने ऐकताना श्रोते भारावून जायचे. त्यांच्या व्याख्याने, खंडश: ग्रंथरूपाने, पुण्याच्या दाते यांच्या काळ प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत.

बाळशास्त्रींनी ‘महाराष्ट्र ‘ मधून अनेक ग्रंथांची परीक्षणे लिहिली. त्यात, अहिताग्नी राजवाडे, पं.सातवळेकर, प्रा. ग.वा.कवीश्वर, डॉ. दा.र. रानडे इ. अनेक विद्वानांचे ग्रंथ होते.

बाळशास्त्री केवळ विद्वान साहित्यिक होते, असे नाही. ते सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य करणारे कार्यकर्तेही होते.

आज त्यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्त त्यांच्या विद्वत्तेला शतश: वंदन. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

सौ. उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments