सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १२ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
धनंजय कीर
अनंत विठ्ठल ऊर्फ धनंजय कीर (23 एप्रिल 1913 – 12 मे 1984) हे नामांकित चरित्रकार होते.
त्यांचा जन्म रत्नागिरीत झाला.
पुढे ते मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या एज्युकेशन कमिटीत नोकरी करून लागले.
ते ‘फ्री हिंदुस्थान’मध्ये लिहू लागले.
त्यांनी प्रथम सावरकर व नंतर आंबेडकरांचे चरित्र लिहिले. पुढे नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व महात्मा गांधी यांचीही चरित्रे लिहिली.
याशिवाय त्यांनी ‘लोकमान्य टिळक आणि राजश्री शाहू महाराज : एक मूल्यमापन’, ‘तीन महान सारस्वत’, ‘ ह्यांनी इतिहास घडविला’, ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ (आत्मचरित्र) वगैरे मराठी, तसेच ‘Dr. Ambedkar :Life and Mission’, ‘Lokmanya Tilak :Father of Indian Freedom Struggle’ वगैरे अनेक इंग्रजी पुस्तके लिहिली.
1971मध्ये त्यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाने 1980 साली त्यांना ऑनररी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला.
रत्नागिरीमधील मंदिराचे बांधकाम चालू असताना कीरांना सावरकरांबरोबर काम करण्याची संधी मिळाली.
☆☆☆☆☆
अशोक पाटोळे
अशोक पाटोळे (5जून 1948 – 12 मे 2015) हे नाटककार, कथाकार, पटकथाकार वगैरे होते.
‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ ही त्यांची पहिली एकांकिका. नंतर त्यांनी विनोदी व हृदयस्पर्शी अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांचे लेखन करून नाट्यक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
‘झोपा आता गुपचूप’ हे त्यांचे पहिले नाटक. यानंतर त्यांनी ‘आई रिटायर होते’, ‘एक चावट संध्याकाळ’, ‘जाऊबाई जोरात’, ‘देखणी बायको दुसऱ्याची’, ‘श्यामची मम्मी’, ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’, ‘बा रिटायर थाय छे'(गुजराती) वगैरे 24 नाटके लिहिली. ती सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यांची अनेक नाटके हिंदी, गुजरातीतही यशस्वी ठरली.
पाटोळेनी दूरचित्रवाणीसाठी लिहिलेल्या ‘अधांतर’, ‘अध्यात ना मध्यात’, ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘हद्दपार’, ‘ह्यांचा हसविण्याचा धंदा’ वगैरे मराठी मालिका, तसेच ‘चुनौती’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘ हसरते’ या हिंदी मालिका खूपच गाजल्या.
‘चौकट राजा’, ‘झपाटलेला’, ‘माझा पती करोडपती’, ‘शेजारी शेजारी’या गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथा आणि संवाद पाटोळेनीच लिहिले होते.
याव्यतिरिक्त त्यांनी ‘एक जन्म पुरला नाही'(आत्मचरित्र), ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी'( कथासंग्रह) व ‘पाटोळ्यांच्या पाचोळ्या'( कवितासंग्रह) ही पुस्तकेही लिहिली.
अनुपम खेर यांच्या ‘कुछ भी हो सकता है’ या आत्मकथनात्मक नाटकाचे लेखनही पाटोळेनीच केले होते.
याव्यतिरिक्त त्यांना चित्रकला, वक्तृत्व, गीतगायन व अभिनय यांचीही आवड होती.
त्यांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेनुसार,कोणतेही धार्मिक अंत्यसंस्कार न करता त्यांच्या पार्थिवाचे देहदान करण्यात आले.
☆☆☆☆☆
तारा वनारसे
डॉ. तारा वनारसे (13 मे 1930 – 12 मे 2010) या निष्णात स्त्रीरोगतज्ज्ञ, कथाकार, कवयित्री, कादंबरीकार होत्या.
लंडनच्या ‘रॉयल कॉलेज ऑफ ऑबस्टेट्रिक्स अँड गायनोकॉलॉजी’ची फेलोशिप त्यांना मिळाली होती.
डॉ. बेनेडिक्ट रिचर्ड्स यांच्याशी लग्न करून त्या इंग्लंडला स्थायिक झाल्या. तिथल्याही सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी योगदान दिलं होतं.
रामायणाच्या पार्श्वभूमीवरील व शूर्पणखेला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली त्यांची ‘श्यामिनी’ ही कादंबरी लक्षवेधी ठरली. शूर्पणखेच्या प्रेमकहाणीला एक उदात्त रूप देऊन आर्य-अनार्य संघर्षाला एक वेगळा अर्थ देण्याचा प्रयत्न त्यांनी त्यात केला आहे.
वनारसेंची ‘पश्चिमकडा’, ‘कक्षा’, ‘केवल कांचन’, ‘गुप्त वरदान’, ‘तिळा तिळा दार उघड’, ‘सूर'(कादंबरी), ‘नर्सेस क्वार्टर्स’ (एकांकिका) वगैरे पुस्तके प्रसिद्ध आहेत.
त्यांच्या ‘बारा वाऱ्यांवरचे घर’ या काव्यसंग्रहाला राज्यशासनाचा पुरस्कार मिळाला होता.
12 मे 2010ला हंपस्टीडमध्ये त्यांचे निधन झाले.
धनंजय कीर, अशोक पाटोळे तारा वनारसे यांना त्यांच्या स्मृतिदिनी आदरांजली.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, विवेक महाराष्ट्र नायक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈