१३ ऑक्टोबर – संपादकीय
- गिरीजाबाई केळकर
ज्या काळात स्त्रीयांचे लेखन समाजमान्य नव्हते, त्या काळापासून गिरीजाबाई केळकर या लेखन करत होत्या. म्हणजे स्त्री लेखिकांच्या पहिल्या पिढीतल्या त्या लेखिका. सुरूवातीला त्यांनी ज्ञानप्रकाशमध्ये लिहायला सुरुवात केली. हे लेखन त्यांनी निनावी केलं होतं. काकासाहेब खाडीलकर यांनी स्त्रीयांचे बंड’ असे नाटक लिहिले. त्याला उत्तर म्हणून की काय, त्यांनी ‘पुरूषांचे बंड‘ हे नाटक लिहिले. हे नाटकही त्यांनी निनावीच लिहिले होते. पुढे भारत नाटक कंपनीच्या य. ना. टीपणीस यांनी ते रंगभूमीवर आणले. त्या पहिल्या स्त्री नाटककार आहेत. त्यांनी पुढे आयेषा, मांदोदरी, राजकुवर, वरपरीक्षा, सावित्री इ. नाटके लिहिली.
ज्ञानप्रकाशमध्ये त्यांनी लिहिलेल्या लेखांची ’गृहिणीभूषण’ नावाची पुस्तके, दोन भागात प्रकाशित झाली. समाजचित्रे -2 भाग, संसार सोपान हे त्यांचे वैचारिक लेख आहेत. त्यांनी ‘स्त्रीयोनुं वर्ग या गुजराती पुस्तकाचा स्त्रीयांचा वर्ग हा अनुवादही केला आहे. न. चिं. केळकर यांच्या त्या वाहिनी. पुढे त्यांचे चिरंजीव मनोहर केळकर यांनी वङ्मयशोभा नावाचे साहित्यिक मासिक काढून अनेक वर्ष चालवले.
स्त्रीयांचे लेखन समाजमान्य नव्हते, त्या काळात गिरीजाबाई केळकर यांनी इतके समृद्ध साहित्य निर्माण केले आणि पुढील लेखिकांना लेखनाचा मार्ग प्रशस्त करून दिला, त्याबद्दल त्यांचा अभिमान मिश्रित आदर वाटतो. त्यांचा जन्म १८८६ सालचा तर त्यांचा स्मृतीदिन १९८०सालचा.
- इंदूमती शेवडे
इंदूमती शेवडे या लेखिका होत्या. पत्रकारही होत्या. त्यांनी नागपूर तरुण भारतमध्ये ‘महिलांचे मनोगत हे सदर अनेक वर्षे चालवले. नंतर त्या दिल्लीला गेल्या. तिथे त्यांनी नॅशनल बुक ट्रस्टने प्रसिद्ध केलेल्या अनेक पुस्तकांचे इंग्रजीत भाषांतर केले. त्यांचा जन्म १३ ऑक्टोबरचा दिल्लीत त्यांनी ‘मिर्झा गलीब’ची माहिती मिळवली. नागपूरला पुन्हा गेल्यावर त्यांनी ‘मिर्झा गालीब’चे चरित्र लिहिले. त्या उत्तम चित्रकारही होत्या. आपल्या पुस्तकातील चित्रे त्यांनी स्वत:च काढली आहेत.
त्यांचे ‘संत कवियत्री’ हे पुस्तक स्त्रीमुक्तीच्या चळवळीच्या अभ्यासातील पहिले पुस्तक मानले जाते. महदाईसा, मुकताबाई, जनाबाई, बहिणाबाई, वेणाबाई या ५ संत कवियात्रींच्या काव्याचा या पुस्तकात वेगळ्या दृष्टीने विचार आहे. या शिवाय, ‘इये साहेबाचीये नागरी’, पु.य. देशपांडे (चरित्र) इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
त्यांनी नागपूर आकाशवाणी वरून अनेक श्रुतीकाही सादर केल्या.
- लक्ष्मण लोंढे
लक्ष्मण लोंढे हे विज्ञान कथा लेखक म्हणून प्रसिद्धा होते. त्यांची ‘दुसरा आईन्स्टाईन’ ही कथा ‘सायन्स टूडे’ या मासिकात प्रकाशित झाली आणि पुढे या कथेला जागतिक सर्वोत्कृष्ट कथा म्हणून कॅन्सास विद्यापीठाचा पुरस्कार मिळाला. त्यांची एक कथा जेम्स गुण यांच्या ‘द रोड तू सायन्स’ या पुस्तकाच्या १९८९ च्या आवृत्तीत निवडली गेली आहे. अशा तर्हेने आंतरराष्ट्रीय बहुमान मिळवणारे ते भारतातील पहिले विज्ञान लेखक.त्याचा जन्म १३ ऑक्टोबर १९४५ साली झाला.
विज्ञान कथांशिवाय त्यांनी अन्य ललित लेखनही केले. सोबतमध्ये, ‘लक्ष्मण झूला’ या नावाने ते सादर चालवीत. ‘असं घडलंच नाही’ ही त्यांची कादंबरी, आणि वसंत पुन्हा बहरला हे त्यांनी लिहिलेले चरित्र. याशिवाय त्यांची थॅंक्यू इमस्टर फॅरॅडे, काऊंट डाउन, देवासि जीवे मरिले इ. पुस्तके विज्ञान पुस्तके म्हणून खूप गाजली.
त्यांच्या‘दुसरा आईन्स्टाईन’ या पुस्तकाला कॅन्सास विद्यापीठाचा, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारचाही पुरस्कार मिळाला.
- लीलाताई दीक्षित
लीलाताई दीक्षितांनी लग्नानंतर एम. ए. पीएच. डी. या पदव्या घेतल्या. नंतर पुण्याच्या एस.एन.डी. टी. कॉलेजमध्ये अध्यापनाचे काम केले. बालसाहित्याच्या लेखिका म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. गंमत गाव, गाणारे झाड, नाच रे मोरा, पंख नवे, पॉपतचा झाड फुलांना रंग मिळाले. इ. बालसाहित्याची पुस्तके लिहिली. बालसाहित्यातील त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना २००५ मध्ये पर्भणी येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले. त्यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९३५ मध्ये झाला.
विविध विषयांवरील त्यांनी ५० पुस्तके लिहिली. बालसाहित्याशिवाय त्यांनी ‘आनंदयोगिनी’(९ स्त्री संतांची चरित्रे) , अंतरीचे भावे (आठवणी), आजोबांचे घर, घर आमचा कोकणातलं, स्वामी अपरांताचा ( कादंबरी) इ. पुस्तके लिहिली. लिहिली. ‘प्राचीन मराठी साहित्यातील स्त्री दर्शन’ या त्यांच्या पुस्तकाला ‘महाराष्ट्र राज्य सरकारचा’ पुरस्कार मिळाला.
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग.
संदर्भ : कर्हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी , गुगल गुरुजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈