श्री सुहास रघुनाथ पंडित
१३ नोव्हेंबर – संपादकीय
गोविंद बल्लाळ देवल
कर हा करी धरिला शुभांगी, मृगनयना रसिक मोहिनी,
सुकांत चंद्रानना पातली, माडीवरी चला ग सये,
म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान,
तेचि पुरूष दैवाचे,चिन्मया सकल ह्रदया….
अशी कितीक नाट्यपदे अगदी कालपरवाची वाटावीत अशी.या पदांचे रचनाकार आणि नाट्य लेखक व नाट्य दिग्दर्शकही गोविंद बल्लाळ देवल यांचा 13 नोव्हेंबर हा जन्मदिन! 13/11/1855 मध्ये जन्मलेल्या देवलांचे बालपण व शिक्षणाची सुरूवात सांगलीतून झाली. नंतरचे शालेय शिक्षण बेळगावात झाले. तेथे त्यांचा नाट्य लेखक व निर्माते अण्णासाहेब किर्लोस्कर यांचेशी संबंध आला. देवलांनी त्यांच्या नाटकात काही भूमिका केल्या. तसेच सहदिग्दर्शनाची भूमिकाही पार पाडली. पुढे ते पुण्यात शेतकी शाळेत शिक्षकाची नोकरी करू लागले. पण नाट्य विश्वाची त्यांचा संबंध सुटला नव्हता. त्यांनी पुण्यात आर्योद्धारक नाटक मंडळी ही स्वतःची संस्था स्थापन केली. 1913 मध्ये त्यांनी गंधर्व नाटक मंडळीत प्रवेश केला. परंतू 1916 मध्ये त्यांच्या निधनामुळे अखेरचा पडदा पडला.
देवलांनी एकंदर सात नाटके लिहिली. त्यातील तीन इंग्रजी नाटकांवरून, तीन संस्कृत नाटकांवरून व एक स्वतंत्रपणे लिहिले. त्यांची नाटके ही प्रयोगक्षम असल्यामुळे व्यावसायिक दृष्ट्याही यशस्वी ठरली. देवलांनी मराठी सामाजिक रंगभूमीचा पाया घातला असे म्हणणे उचित ठरेल. कारण त्यांच्या शारदा या नाटकाचा विषय जरठ तरूणी बालविवाह हा पूर्णपणे सामाजिक होता. हे नाटक इतके प्रभावी ठरले की जरठ विवाह बंदीसाठी त्या वेळच्या सरकारने जो कायदा केला तो ‘शारदा ॲक्ट’ या नावाने ओळखला जाऊ लागला. साहित्यिकाची लेखणी काय करू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे.
मृच्छकटिक, विक्रमोर्वशिय, झुंजारराव, शापसंभ्रम, शारदा आणि संशयकल्लोळ ही त्यांची नाटके आजही लोकप्रिय आहेत.
सांगली जवळील हरिपूर येथे कृष्णा वारणेच्या संगमाकाठी ज्या ठिकाणी बसून ते नाट्यलेखन करीत असत ती जागा नाट्यरसिकांना आजही पाहता येते.
नाटपंढरीच्या या ज्येष्ठ वारक-याला त्याच्या जन्मदिनी सादर वंदन!
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
साभार: विकीपीडिया, मराठी विश्वकोश
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈