श्री सुहास रघुनाथ पंडित
१४ जानेवारी – संपादकीय
मालती माधव दांडेकर :
“बालमनाला स्पर्श करणारी व त्यांच्या जीवनावर सुसंस्कार करणारी स्फूर्तीदायक रचना म्हणजे बालवाड्मय “
बाल साहित्याची अशी व्यापक व्याख्या करणा-या मालती माधव दांडेकर म्हणजेच मालतीबाई दांडेकर यांचा आज स्मृतीदिन.त्यांनी बालसाहित्य तर लिहिलेच पण विपुल प्रमाणात कथा, कादंबरी, निबंध, एकांकिका,नाटक असे विविध प्रकारचे लेखनही केले आहे.त्यांचे शालेय शिक्षण फक्त इंग्रजी चौथीपर्यंत झाले होते.पण तरूण वयातच त्यानी लेखनाला सुरुवात केली व पुढील सुमारे पन्नास वर्षे चौफेर लेखन केले.त्यांच्या सुरूवातीच्या कथांमध्ये
आदर्शवाद दिसून येतो.पण नंतर या कथांमध्ये विविधता येत गेली.कादंबरी लेखनातही प्रामुख्याने प्रेमकथानक असले तरी स्त्रियांचे विविध प्रश्नही मांडले गेले आहेत.ऐतिहासिक विषयांवरही त्यांनी कादंबरी लेखन केले आहे.
त्यांच्या विपुल ग्रंथसंपदेपैकी काही पुस्तके अशी :
कथा,लोककथा इ.:
अंधारातील तारे,अंधारातील देव,कथा मालती,कथा सुवर्ण,प्रतिमा,मधुमालती,लोककथा कल्पलता,विसाव्याचे क्षण इत्यादी
कादंबरी :
अमर प्रीती,काटेरी मार्ग,कृष्णरजनी,तपश्चर्या,तेजस्विनी,दुभंगलेले जग,भिंगरी,मातृमंदिर,शुभमंगल इत्यादी
निबंध :
अमोल आहेर,अष्टपैलू प्रमोद,ओघळलेले मणी,तरूणींचे प्रश्न इ.
प्रबंध :
अष्टनायिका,बालसाहित्याची रूपरेषा,लोकसाहित्याचे लेणे
पुरूष पात्र विरहीत नाटक :
संगीत ज्योति, संगीत पर्वकाल ये नवा,संगीत संस्कार
एकांकिका:
कृत्तिका,जावई
बालसाहित्य:
अतिपूर्वेच्या परीकथा नऊ भाग,किती झकास गोष्टी सहा भाग,देशविदेशिच्यि परीकथा दहा भाग,शततारका सात भाग,आसामच्या लोककथा,गुलाबकळी,चंद्रलेखा,मोहनमाळ इ.इ.
सहवास हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे.
त्यांच्या बालसाहित्यातील योगदानामुळेच 1978 साली जळगाव येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्याना मिळाले होते.
‘दगडातून देव’ या त्यांच्या पुस्तकाला राज्य व केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.
रूढ अर्थाने उच्च शिक्षित नसतानाही त्यांनी केलेली साहित्य निर्मिती पाहून त्यांच्या प्रतिभेसमोर नतमस्तक व्हावेसे वाटते.अभिवादन !
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: विकीपीडिया
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈