सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १४ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी)
मराठी लेखक आणि चरित्रकार श्री नारायण कृष्ण गद्रे यांचा आज स्मृतिदिन. ( ७/३/१८७० – १४/७/१९३३ )
श्री गद्रे यांचे प्राथमिक शिक्षण त्या काळाच्या परंपरेनुसार पंतोजींच्या शाळेत झाले. १८८१ सालापासून त्यांच्या इंग्रजी शिक्षणास प्रारंभ झाला. काही वर्षे पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असतांना त्यांना लोकमान्य टिळक आणि मा. आगरकर हे दोघेही शिक्षक म्हणून लाभले होते . नंतर सन १८९० ते १९२३ एवढा प्रदीर्घ काळ त्यांनी मुंबईमध्ये हवामान खात्यात नोकरी केली.
लो. टिळकांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात तेव्हा विविध मेळे भरत असत. गद्रे यांनीही १८९५ साली एक मेळा सुरु केला, आणि १९१४ सालापर्यंत तो चालवला. त्यासाठी त्यांनी राष्ट्रभक्तीपर आणि इतर विविध विषयांवर गीते लिहायला सुरुवात केली. इथूनच साहित्यक्षेत्रातली त्यांची वाटचाल सुरु झाली असे म्हणता येते.
पुढे त्यांनी नाटक, कविता, कादंबरी, चरित्र-लेखन, इतिहास-लेखन, अशा विविध साहित्यप्रकारात लेखन केले. काही लेखन त्यांनी ‘दिनकर‘ या त्यांच्या जन्मनावाने, तसेच ‘कृष्णात्मज दिनकर‘ या नावानेही केलेले आहे.
‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय‘ या संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक महत्वाचे सदस्य – ही त्यांची आणखी एक विशेष ओळख. १९२३ सालापर्यंत या संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाचेही ते सभासद होते. स्वतःकडची अनेक पुस्तके त्यांनी या संग्रहालयाला देणगी म्हणून दिली होती.
१९०१ सालापासून पुण्यात प्रकाशित होणाऱ्या ‘सरस्वतीमंदिर‘ या नियतकालिकाच्या प्रकाशनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. ‘महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग‘ हा त्यांचा तेव्हा गाजलेला लेख याच नियतकालिकात प्रकाशित झाला होता.
त्यांचे इतर साहित्य पुढीलप्रमाणे —
१) कादंबरी — ‘प्याद्याचा फर्जी‘ – अर्थात ‘भोसले घराण्याचा अभ्युदय‘. हिंदुवा सूरज ‘— बाप्पा रावळ चक्रवर्ती. ‘मनूच फिरला ‘ ( कृष्ण तनय )
२) कविता — श्रीमत प्रतापसिंह : पहिला खंड
३) नाटक — अक्षविपाक अथवा संगीत द्युतविनोद. हे नाटक आणि ‘ महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग ‘ हा प्रदीर्घ लेख पुढे १९७१ साली महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाने मुंबई येथे प्रकाशित केला आहे.
४) चरित्रे — कै. प्रो. श्री. ग. जिनसीवाले यांचे चरित्र, कै. पं. विष्णुपंत छत्रे यांचे चरित्र.
५) संपादन — कवीश्वर भास्करकृत शिशुपाल- वध कथा.
श्री. नारायण कृष्ण गद्रे यांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी मनःपूर्वक श्रद्धांजली.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈