सुश्री मंजुषा सुनीत मुळे
१४ डिसेंबर – संपादकीय
स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’
जन्म – 1 ओक्टोबर 1919 मृत्यु – 14 डिसेंबर 1977 ☆
☆ कवितेचा उत्सव ☆ झटकून टाक जीवा.. ☆ महाकवी ग.दि. माडगूळकर ☆
आज १४ डिसेंबर : –
‘कवी, गीतकार, साहित्यिक, पटकथा व संवाद लेखक, आणि मोजक्याच भूमिका करूनही त्या सर्वच भूमिका संस्मरणीय करणारे चरित्र-अभिनेता, अशा अनेक पैलूंनी नटलेले अतिशय ख्यातनाम व्यक्तिमत्व ‘ म्हणून रसिकांना सुपरिचित असणारे, आणि आपल्या लेखन-कर्तृत्वाने, “ आधुनिक वाल्मिकी “ म्ह्णूनच अगदी उत्स्फूर्तपणे आणि उचितपणे गौरविले जाणारे श्री. ग.दि.माडगूळकर यांचा आज स्मृतिदिन. ( ०१/१०/१९१९–१४/१२/१९७७ )
‘ गदिमा ‘ हे त्यांचं सगळ्यांच्या तोंडी असणारं आवडतं नाव.
संत काव्य, पंडिती काव्य, शाहिरी काव्य, भावकाव्य, अशा वेगवेगळ्या काळातल्या वेगवेगळ्या काव्यशैलींचा अनुभव या एकाच कविवर्यांच्या असंख्य गीतांमधून रसिक घेऊ शकतात हे गदिमांचे खास वैशिष्ट्य. “ अतिशय अर्थपूर्ण असणाऱ्या कितीतरी सुरेख काव्यांचा चित्रदर्शी सुंदर गोफ “ असेच ज्याचे यथार्थ वर्णन करायला हवे, त्या त्यांच्या अजरामर झालेल्या ‘ गीतरामायण ‘ या काव्याचे, इतर भारतीय भाषांमध्येही अनुवाद झालेले आहेत. “ भूमिकन्या सीता “ या नाटकातली ”मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी“, “ मानसी राजहंस पोहतो “, यासारखी भावगीतांच्या धाटणीची असलेली त्यांची नाट्यगीतेही खूप गाजलेली आहेत. त्यांनी उत्तम बालगीते आणि समरगीतेही लिहिलेली आहेत.
सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. वि.स.खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम करत असतांना गदिमांनी त्यांच्याकडची खूप पुस्तके वाचली, आणि त्यांच्या गद्य लेखनाला जोमाने सुरुवात झाली. त्यांनीच लिहिलेली चित्रपट कथा, त्यांनीच लिहिलेले संवाद, आणि त्यांनीच लिहिलेली गीते, यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या “ लोकशाहीर रामजोशी “ या एका चित्रपटाचे उदाहरणही याबाबतीत पुरेसे आहे. कारण इथूनच “ मराठी चित्रसृष्टीचा भक्कम आधार “ अशी त्यांची ख्याती झाली. त्यांचे सोपे पण प्रभावी आणि मनाला सहजपणे भिडणारे संवादलेखन, हा अनेक वैविध्यपूर्ण आणि यशस्वी चित्रपटांचा कणा होता, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कथाकार आणि संवादलेखक म्हणून त्यांनी पंधरा हिंदी चित्रपटांसाठीही काम केले होते, हे विशेषत्वाने सांगायला हवे.
गदिमांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या अत्युत्कृष्ट आणि चौफेर कामगिरीबद्दल अगदी तपशीलवार लिहायचे झाले तर आपोआपच एक प्रदीर्घ प्रबंध तयार होईल. १ ऑक्टोबर रोजी त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपण “ गदिमा विशेषांक “ प्रकाशित केला होता, ज्यात आपल्या लेखक-लेखिकांनी त्यांच्या साहित्यासंदर्भात उत्तम लेख लिहिले होते. त्यामुळे आज पुनरावृत्ती करण्याचा मोह टाळत आहे.
पद्मश्री गदिमा यांना अतिशय भावपूर्ण आदरांजली.
☆☆☆☆☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
माहितीस्रोत :- इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈