श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १४ मे -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

पां. वा. काणे

भारतरत्न महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांचा जन्म १८८० साली कोकणातील चिपळूण तालुक्यातील पेढे परशुराम इथे झाला. त्यांचं घराणंच वेदशास्त्र पारंगत आणि विद्वत्तेची मोठी परंपरा असलेलं होतं. ते कायदे पंडीत होते, त्याचप्रमाणे धर्मशास्त्राचे मोठे अभ्यासक होते. त्यांचं शिक्षण एम. ए. एल.एल. एम. इतकं झालं. त्यांना मराठी, हिन्दी, इंग्रजी, सस्कृत, जर्मन, फ्रेंच इ. भाषा अवगत होत्या. १९४७ ते १९४९ ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. ब्रिटीशांनी आपली सत्ता इथे बळकट करताना, इथली संस्कृती, विद्या, प्रथा, समाज इ. ची कुचेष्टा सुरू केली. काणे यामुळे व्यथित झाले. त्यांनी १९२६ साली व्यवहारमयूख हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यावेळी केलेला अभ्यास, जमवलेली कागदपत्रे व अन्य साधने, आजवरचे धर्माचे आणि कायद्याचे ज्ञान आशा भक्कम तयारीनिशी त्यांनी ’ भारतीय धर्मशास्त्राचा इतिहास ‘ हा ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी हा इतिहास इंग्रजीत लिहिला. त्याचे ५ खंड आहेत. सुमारे ७००० पाने त्यांनी या संदर्भात लिहिली. हा इतिहास आजही जागतिक पातळीवर अचूक व प्रमाण मानला जातो. 

पां. वा. काणे यांची ग्रंथसंपदा –

प्राचीन संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास आणि सामाजिक अभिसरण या 2 अगदी वेगळ्या वाटणार्या् गोष्टींमधून  त्यांनी धर्मशास्त्राचा पंचखंडात्मक इतिहास’ या नावाचा ग्रंथ सिद्ध केला. १९४१ साली प्राच्यविद्येवर ग्रंथ लिहिला. ‘भारतरामायणकालीन समजस्थिती (१९११), धर्मशास्त्राचा विचार (१९३५), हिस्टरी ऑफ संस्कृत पोएटिक्स हेही त्यांचे महत्वाचे ग्रंथ. प्राचीन भाषा, वाङ्मय, कावी, महाकाव्य, अलंकारशास्त्र, यांचे प्रेम आणि कायदेविषयक जाण, तार्किक मांडणी, प्रथा आणि परंपरा यांची कालानुरूप अर्थ लावण्याची क्षमता या आणि आशा अनेक पैलूंचे विस्मयकारी मिश्रण त्यांच्या लेखनात झाले आहे. खगोल विद्या, सांख्य, योग,  तंत्र, पुराणे आणि मीमांसा यांचा सखोल अभ्यास करून त्यावर त्यांनी भाष्य लिहिले.

प्राचीन ज्योतिषशास्त्र,  खगोल विद्या, योगशास्त्र, पुराणे, टीका आणि मीमांसा, सांख्य तत्वज्ञान , महाराष्ट्राचा संस्कृतिक इतिहास, कौटिल्याचे अर्थशास्त्र, गणित, मराठी भाषेचा सर्वांगीण अभ्यास , नाट्यशास्त्र अशा असंख्य विषयांवर त्यांनी सुमारे ४० ग्रंथ, ११५ लेख , ४४ पुस्तक परिचय / परीक्षणे लिहिली यावरून त्यांच्या ज्ञानाचा आवाका केवढा विस्तारीत होता, हे लक्षात येते.

सन्मान आणि गौरव

१ पां. वा. काणे यांना १९४६ साली अलाहाबाद विद्यापीठाने , तर ६० साली पुणे विद्यापीठाने सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल केली होती.

२. धर्मशास्त्राचा इतिहास मराठीत लिहून काढला, त्याबद्दल १९५२ साली त्यांना नॅशनल प्रोफेसर हा पुरस्कार मिळाला.

३. राष्ट्रपतींनी त्यांना राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले.

४. १९६३साली त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला.

५. ‘हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र या ग्रंथाच्या ५ खंडांपैकी ४थ्या खंडाला साहित्य अॅहकॅडमीचा पुरस्कार  १९६५ मध्ये मिळाला.

६. त्यांच्यावर टपाल तिकीट काढले गेले. त्यांच्या ५०व्या स्मृतिदिनानिमित्त, राजभवन – महाराष्ट्र  इथे महाराष्ट्राचे राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्या टपाल तिकीटाचे प्रकाशन झाले.

☆ ☆ ☆ ☆ ☆

कवी अनिल

आत्माराम रावजी देशपांडे म्हणजेच कवी अनिल  यांचा जन्म ११सप्टेंबर १९०१ मध्ये मूर्तीजापूर इथे झाला. शालेय शिक्षण मूर्तीजापूर इथे झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये आले. तिथे त्यांचा कुसुम जयवंत यांच्याशी परिचय झाला. त्याचे रूपांतर प्रेमात आणि प्रेमाची परिणिती विवाहात झाली. ६ ऑक्टोबर १९२९ला त्यांचा विवाह झाला. कुसुमावती स्वत:ही चांगल्या साहित्यिक होत्या. समीक्षक म्हणून त्या पुढे प्रसिद्ध झाल्या. त्यांचा कॉलेजमध्ये असताना झालेला पत्रव्यवहार पुढे ‘कुसुमानिल’ नावाने, त्या मानाने अलीकडे प्रकाशित झालेला आहे. त्यात अनिलांनी सुरूवातीला केलेल्या अनेक कविता वाचायला मिळतात. 

पदवी मिळाल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी ते कलकत्त्याला गेले. तिथे अवनिंद्रनाथ व नंदलाल बसू यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. विधी शाखेची पदवी घेऊन त्यांनी ३५ साली वकिली सुरू केली. ४८ साली मध्य प्रदेश सरकारतर्फे, सामाजिक शिक्षण संस्थेचे उप मुख्याधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. ५६ साली दिल्लीच्या राष्ट्रीय मूलभूत शिक्षण केंद्राच्या मुख्याधिकारी पदावर व पुढे ६१ साली समाज शिक्षण मंडळाच्या सल्लागार पदावर त्याची नेमणूक झाली.

१९७९ साली त्यांना साहित्य अकॅडमीची फेलोशिप मिळाली.

कवी अनिल यांचे काव्यसंग्रह

१.  फुलवात – १९३२,  २. भग्नमूर्ती ( दीर्घ काव्य ) – १९३५, ३. निर्वासित चिनी मुलास      ( दीर्घ काव्य ) – १९४३  ४. पेर्ते व्हा – १९४७, ५. सांगाती – १९६१,  ६. दशपदी १९७६ ७. कवी अनिल यांची संपूर्ण कविता ( संपादक श्याम माधव धोंड). या पुस्तकाला विदर्भ साहित्य संघाचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे.

तसेच निर्वासित चिनी मुलास या संग्रहाचे कुसुमावतींनी इंग्रजीत भाषांतर केले आहे.

कवी अनिल यांची लोकप्रिय गाणी –

१. अजुनी रुसून आहे, २. आज अचानक गाठ पडे  ३. कुणी जाल का? संगाला का? ४ गगनी उगवला सायंतारा .

कवी अनिल आणि त्यांचे काव्य यावरील पुस्तके 

१.    कवी अनिल यांची संपूर्ण कविता (संपादक श्याम माधव धोंड).

२.    कवी अनिल यांची साहित्य दृष्टी (प्राचार्य पंडितराव पवार).  

१९५८साली मालवण येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

पां .वा. काणे या अलौकिक बुद्धिवंताचा आणि कवी अनिल या प्रतिभावंतांना विनम्र श्रद्धांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments