श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ १५ जुलै -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

गजानन विश्वनाथ केतकर  ( १० ऑगस्ट १८९८ – १५ जुलै १९८०)

ग.वि. केतकर हे सावरकरवादी, विज्ञाननिष्ठ मराठी पत्रकार होते. लो. टिळकांचे हे नातजावई. लो. टिळकांची मुलगी त्यांची आई.त्यांचे बालपण आणि तरुणपणीची काही वर्षे टिळकांच्या देखरेखीखाली गेली. कायद्याची परीक्षा देऊन ते केसरीत दाखल झाले. १९४७ ते १९५० ते केसरीचे संपादक होते. पुढे त्यांनी पराधर्मीय मुलीशी प्रेमविवाह केला. त्यामुळे त्यांना ‘केसरी’ सोडावा लागला.

२० जानेवारी १९५७ पासून तरुण भारत पुणे आवृत्तीचे ते संपादक झाले. १९६४ पर्यन्त ते तरुण भारतचे संपादक होते.

केतकरांनी अनेक वृत्तपत्रातून भगवद्गीतेविषयक लेखन करून गीताधर्म मंडळाच्या स्वीकृत कार्याचा उदंड प्रचार केला. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा दिवस गीताजयंती म्हणून साजरा व्हावा, यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. आता हे सर्वमान्य झाले आहे.

ग.वि. केतकरांचे लेखन –

१. ख्रिस्ती ड्रामा, २. गीताबीज, ३. गीतार्थ चर्चा , ४. मर्मभेद , ५. रणझुंजार (डॉ. खानखोजे यांचे चरित्र), ६. लोकमान्यांची भाषाशैली, ७.हिंदुत्वाची राष्ट्रीय मीमांसा ,

विश्वकोशासाठी लेखन –  जैन, ज्यू, चीन व जपान येथील अंत्यविधी व अंत्यसंस्कार

ग.वि. केतकरांविषयीची पुस्तके

१. पत्रकार महर्षी ग.वि. केतकर- संपादन, संकलन – अरविंद केतकर

२. . पत्रकार महर्षी ग.वि. केतकर- वीणा हरदास

☆ ☆ ☆ ☆ ☆

जयवंत दत्तात्रेय जोगळेकर – (७ऑक्टोबर१९२१ – १५ जुलै २०१६ )

ज.द. जोगळेकर हिंदुत्वाचे खंदे पुरस्कर्ते व भाष्यकार होते. ‘एका हिंदुत्वनिष्ठाची आत्मकथा हे त्यांचे पुस्तक वयाच्या ९२व्या वर्षी प्रकाशित झाले.

ज.द. जोगळेकर सावरकप्रेमी पत्रकार होते. ते कायद्याचे पदवीधर होते. ते मूळचे बडोद्याचे पण पुढे त्यांनी मुंबई आपलीशी केली.

द बॉंम्बे क्रॉंनिकल या वृत्तपत्राचे उपसंपादक होते.

ज. द. जोगळेकर यांची काही प्रकाशित पुस्तके –

१.अफगाणिस्तानात तालिबानचा पराभव, २. अमेरिकन क्रांती, ३. इंग्रजी दृष्टीकोणातून १८५७ चा प्रस्फोट, ४ . चिनी राज्यक्रांती, ५. जगाटेल इस्लामी समाजाची हालचाल,     ६. दोन युद्धे, ७. निधर्मी राष्ट्रवादाचे शिल्पकार, ८. भारतातील युद्धशास्त्राची उपेक्षा,      ९. रशियन राज्यक्रांती, १०. समीक्षा संचित  (निवडक ६३ ग्रंथ परीक्षणांचा संग्रह) इये. अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांची बहुतेक पुस्तके राजकारण क्षेत्राशी संबंधित आहेत.

त्यांना सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीने पुरस्कार दिला होता.

☆ ☆ ☆ ☆ ☆

प्रकाश नारायण संत (१६ जून १९३७ – १५ जुलै २००३ ) 

प्रकाश संत हे मराठीतील नामांकित कथाकार. त्यांनी ‘लंपन या लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून लिहीलेल्या अर्ध आत्मचरित्रात्मक कथा मराठी कथाविश्वात विशेष गाजल्या. सुप्रसिद्धा ललित लेखक नारायण संत आणि सुप्रसिद्ध कवयत्री इंदिरा संत यांचे ते चिरंजीव. त्यांच्या बहुतेक सगळ्या पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत.

भूरचनाशास्त्रात त्यांनी एम.एस. सी., पीएच.डी. केली. नंतर कर्हाड येथे ‘यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्समध्ये १९६१ साली सहयोगी प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तिथून ते ९७ साली निवृत्त झाले.१५ जुलै २००३ला त्यांचं अपघाती निधन झाले.

१७व्या वर्षापासून त्यांनी ललित लेखनास सुरुवात केली. २० व्या वर्षापासून ते कथा लिहू आगळे. ‘सत्यकथे’सारख्या दर्जेदार मासिकातून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा ‘झुंबर’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. ते उत्तम चित्रकारही होते. पाहिया ३ पुस्तकांसाठी त्यांनी त्यांनी स्वत: रेखाटने केली आहेत.   

प्रकाश संत यांचे प्रकाशित साहित्य व पुरस्कार –

१. चांदण्याचा रास्ता ( ललित लेख )

२. झुंबर (कथा)

३. पंखा ( कथा)  इचलकरंजी संमेलन स्मृती ट्रस्ट पुरस्कार

४. वनवास – श्री. दा. पानवलकर पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, ग्रंथोत्तेजक पुरस्कार- इचलकरंजी, महाराष्ट्र  फाउंडेशन –मुंबई

५. शारदा संगीत – महाराष्ट्र राज्य पुरस्कार

६. शारदा संगीत या कथेस नवी दिल्ली येथील कथा पुरस्कार तर आडाम या कथेस शांताराम पुरस्कार

७. सुप्रिया दीक्षित या प्रकाश संत यांच्या पत्नी. ‘अमलताश’ या पुस्तकात त्यांनी पतीच्या सहवासातील ६० वर्षांच्या काळाचा लेखा-जोखा मांडलेला आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतिक मंडळाचा आत्मचरित्रासाठी दिला जाणारा ‘लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार २०१४ साली मिळाला.

☆ ☆ ☆ ☆ ☆

वसुंधरा पेंडसे नाईक (२७ जून १९४६ – १५ जुलै २०१६ )

वसुंधरा पेंडसे नाईक या मराठी लेखिका व पत्रकार होत्या. सुप्रसिद्ध पत्रकार आप्पा पेंडसे हे त्यांचे वडील. भारतीय क्रिकेट संघातले आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळणारे सुधीर नाईक हे त्यांचे पती.

वसुंधरा पेंडसे नाईक यांना शालांत परीक्षेत जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यांनी मराठी, संस्कृत दोन्ही विषयात एम. ए. ची पदवी घेतली. १९६८मध्ये विल्सन  कॉलेजात त्या प्राध्यापिका होत्या. नंतर त्या ‘लोकसत्ता’मध्ये उपसंपादक म्हणून रुजू झाल्या. त्यांची साहित्याची आवड आणि कामाचा वकूब बघून १९८० मध्ये ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. काही काळातच ‘लोकप्रभा’ साप्ताहिक मराठी परिवारात लोकप्रिय बनले. ‘लोकप्रभेतील त्यांचे सादर ‘शेवटचे पान’हे त्यांचे ‘लोकप्रभे’तील संपादकीय आवर्जून वाचले जायचे. विविध घटनांवर आधारलेले ‘लोकप्रभेचे विशेषांकही त्याकाळी खूप गाजले. त्यांनी काही काळ महाराष्ट्र टाईम्समध्ये ‘सगुण-निर्गुण’ या लोकप्रिय स्तंभासाठी लेखन केले. ‘दै. नवशक्तीच्या पुरवणीच्या संयोजनाची जबाबदारीही काही काळ त्यांनी स्वीकारली होती. १९९१मधे त्या नवशक्तीच्या संपादिका झाल्या. एखाद्या मराठी दैनिकाची संपादिका होणार्यान त्या पाहिल्याच मराठी पत्रकार होत्या. १९९४ ते १९९६ काळात त्यांनी ‘लोकसत्ता’मधे ‘कुटुंबकथा हे सर्वसाधारण कुटुंबात नेहमी उद्भवणार्यात समस्यांवर चर्चा करणारे त्यांचे सदरही वाचकप्रिय झाले.

मुंबई दूरदर्शनवरील संस्कृत भाषेचे सौंदर्य उलगडून दाखवणारा त्यांचा ‘अमृत मंथन’ हा कार्यक्रमही विशेष लोकप्रिय होता. इ. स. १९७९ते १९९२ असा १३ वर्षे चालू होता. या कार्यक्रमात महाकवी, नाट्य याबरोबरच इंजिनियरिंग, अर्थशास्त्र, विज्ञान या विषयांवरचाही अभ्यासपूर्ण आढावा त्यांनी घेतला होता.

वसुंधरा पेंडसे नाईक यांनी भूषविलेली पदे, पुरस्कार, सन्मान 

१.    अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष

२.    मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष

३.    महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेच्या आणि मराठी भाषा अभ्यास केंद्राच्या संचालक

४.    भारत निर्माण या संस्थेच्या ९९ सालच्या टॅलेंटेड लेडीज अवॉर्डच्या मानकरी

५.    कोकण मराठी साहित्य परिषदेच्या चेंबूर येथे झालेल्या ५ जून २०१०च्या मुंबई जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष

वसुंधरा पेंडसे नाईक यांची पुस्तके –

१.    कुटुंब कथा – भाग १ व२

२.    कौटिल्य आर्थशास्त्र परिचय

३.    मूल्याधार  (मूल्यशिक्षणावरील लेख ) 

☆ ☆ ☆ ☆ ☆

माधवी देसाई – (२१ जुलै  १९३३ – १५ जुलै २०१३)

मराठीतील सुप्रसिद्ध लेखिका माधवी देसाई या भालजी पेंढारकर आणि लीलाताई यांच्या कन्या व सुप्रसिद्ध साहित्यिक रणजीत देसाई यांच्या पत्नी होत्या. आपल्या पतीबरोबरच्या नातेसंबंधांवर आधारलेले त्यांचे आत्माचरित्र ‘नाच ग घुमा’ खूप गाजले. याच्या मराठीत अनेक आवृत्या निघाल्या. याचे हिन्दी आणि कन्नडमध्ये अनुवाद झाले.

‘घे भरारी’ या त्यांच्या कादंबरीवर चित्रपट निघाला. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद लेखन त्यांचेच होते. त्यांच्या १५ कादंबर्याघ, एक आत्मचरित्र, काही कथासंग्रह, व्यक्तिचित्रे,  आणि अनुवाद मिळून ३५ पुस्तके आहेत.

माधवी देसाई यांची निवडक पुस्तके –

१. कथा एका राजाची – कादंबरी, २. कस्तुरी गंध –  कादंबरी, ३. किनारा – कथा ४. कांचनगंगा – कथा, ५. नर्मदेच्या तीरावर – व्यक्तिचित्र, ६.. विश्वरंग – चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे व्यक्तिचित्रण ७. अंजनीबाई मालपेकर – चरित्र, ८. अमृता प्रीतम यांच्या हिन्दी पुस्तकाचा अनुवाद, ९. फिरत्या चाकावरती – हावठण या कोकणी कादंबरीचा अनुवाद १०. महाबळेश्वर शैल यांच्या कोकणी पुस्तकांचे अनुवाद   

माधवी देसाई यांना मिळालेले पुरस्कार

सोलापूरयेथील भैरू दामाणी पुरस्कार

सीमावर्ती भागातील ( बेळगाव, कारवार, गोवा ) साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार

बेळगावजवळ कडोली येथे प्रा. तुकाराम पाटील  यांच्या सहकार्याने माधवी देसाई यांनी साहित्य संमेलन सुरू केले. त्यानंतर सीमा भागात साहित्य संमेलने सुरू झाली.

आज ग. वि. केतकर, जयवंत द. जोगळेकर , प्रकाश संत, वसुंधरा पेंडसे नाईक , माधवी देसाई यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments