श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ १५ सप्टेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
गंगाधर गोपाळ गाडगीळ
गंगाधर गाडगीळ हे मराठीतील ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ, समीक्षक, कादंबरीकार व प्रामुख्याने कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. मराठी कथेला नवे रूप देण्यात, तिची नव्याने मांडणी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. म्हणूनच त्यांना मराठी नवकथेचे अध्वर्यु म्हटले जाते.
त्यांचे शालेय शिक्षण गिरगाव, मुंबई येथे झाले. विल्सन महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व इतिहास या विषयात एम्. ए. केले. सुरूवातीला त्यांनी किकाभाई प्रेमचंद महाविद्यालय, सुरत येथे अध्यापनाचे काम सुरू केले. नंतर मुंबईतील पोद्दार, सिडनेहॅम व रूपारेल या महाविद्यालयांत प्राध्यापक म्हणून काम केले. नरसी मोनाजी काॅमर्स इकाॅ. महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते. त्यानंतर त्यानी आपटे उद्योग समूह व वालचंद उद्योग समूह येथे आर्थिक सल्लागार म्हणून काम केले.
एकीकडे अर्थशास्त्राशी संबंधित अशी विविध पदे भूषवत असताना त्यांची साहित्य सेवाही चालू होती. ‘प्रिया आणि मांजर’ ही त्यांची पहिली कथा. ती 1941 साली वाड्मयशोभा मासिकातून छापून आली. याच मासिकातून 1944 साली ‘बाई शाळा सोडून जातात’ ही दुसरी कथा प्रसिद्ध झाली व ती खूप गाजली. पुढे 1946 मध्ये त्यांचा ‘मानसचित्रे’ हा पहिला कथा संग्रह प्रकाशित झाला.
त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत त्यांनी अनेक पदे भूषवली. 1955 साली पंढरपूरच्या साहित्य संमेलनात कथा शाखेचे ते अध्यक्ष होते. 1981 साली रायपूर(म. प्र. ) येथे झालेल्या अ. भा. साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1983 साली च्या मुंबईत भरलेल्या मराठी विनोद साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते . मुंबई मराठी साहित्य संघ, मराठी साहित्य महामंडळ या संस्थांचे ते अध्यक्ष होते. तसेच साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाचे ते सदस्य होते.
मुंबईच्या ग्राहक पंचायतीत ते सक्रीय सहभागी होतेच, पण या संस्थेचे ते 25 वर्षे अध्यक्षही होते. याशिवाय1957 मध्ये राॅकफेलर फाउंडेशनची त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली होती. त्यानिमित्ताने हार्वर्ड व स्टॅनफोर्ड विद्यापिठात एक वर्ष वास्तव्य केले होते.
गंगाधर गाडगीळ यांचे साहित्य विपुल प्रमाणात आहे.
त्यातील काही निवडक साहित्य:
कथासंग्रह
अमृत, आठवण, ऊन्ह आणि पाऊस, ओले ऊन्ह, कडू आणि गोड, मानसचित्रे, काजवा, गुणाकार, तलावातले चांदणे, पाळणा, भिरभिरे इत्यादी.
कादंबरी
गंधर्वयुग, दुर्दम्य, प्रारंभ, लिलीचे फूल इत्यादी
प्रवासवर्णन
गोपुरांच्या प्रदेशात, नायगाराचा नादब्रह्म, सातासमुद्रापलीकडे, हिममय अलास्का, इ.
नाटके
आम्ही आपले थोर पुरूष होणार(बालनाट्य), ज्योत्स्ना आणि ज्योती, रहस्य आणि तरूणी, वेड्यांचा चौकोन इ.
समीक्षा ग्रंथ
आजकालचे साहित्यिक खडक आणि पाणी, पाण्यावरची अक्षरे, साहित्याचे मानदंड इ.
ललित
अशा चतुर बायका, आम्ही आपले ढढ्ढोपंत, गरूडाचा उतरला गर्व, निवडक फिरक्या, बंडूचं गुपचूप इ.
आत्मचरित्र
आठवणी च्या गंधरेखा, एका मुंगीचे महाभारत.
प्राप्त पुरस्कार:
एका मुंगीचे महाभारत ला 1996 चा साहित्य अकादमी पुरस्कार.
जनस्थान पुरस्कार.
श्री. बाळकृष्ण कवठेकर यांनी गंगाधर गाडगीळ यांच्या साहित्य कारकिर्दीचे नेमके वर्णन केले आहे. ते म्हणतात- “गाडगीळांनी विविध प्रकारची विपुल साहित्य निर्मिती केली असली तरी ते प्रामुख्याने ओळखले जातात ते मराठी नवकथेच्या निर्मात्यांपैकी एक म्हणून!मराठी नवकवितेच्या संदर्भात मर्ढेकरांचे जे स्थान आहे, तेच नवकथेच्या संदर्भात गाडगीळांचे आहे. म्हणूनच मराठी नवकथा घडवली ती मुख्यतः गाडगीळानीच. इतरांनी त्याना हातभार लावला असे म्हणणेच वस्तुस्थितीला धरून होईल. किंबहुना असेही म्हणता येईल की नवकथाकारांमधील नवता टिकून राहिली ती बहुतांश गाडगीळांमुळेच !”
अशा या चतुरस्त्र साहित्यिकाचे 15सप्टेंबर2008 मध्ये वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: विकिपीडिया, दै. लोकसत्ता.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈