सौ. उज्ज्वला केळकर
ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ १६ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी)
नारायण सुर्वे (१५ ऑक्टोबर १९२६- १६ ऑगस्ट २०१०)
नारायण गंगाराम सुर्वे हे मराठीतले एक नामवंत आणि लौकिकसंपन्न कवी. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना १९९८ साली पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा पगडा होता. त्यांनी समाज परिवर्तनाचा ध्यास घेतला होता आणि हाच आशय त्यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केला आहे.
१९२६- २७ मधे गंगाराम सुर्वे यांना कापड गिरणीसमोर एक लहान बाळ सापडले. निपुत्रिक असलेल्या गंगाराम आणि काशीबाईंनी हे बाळ आपल्या मुलाप्रमाणे वाढवले. त्याला नारायण हे नाव दिले. हे बाळ म्हणजेच पुढच्या काळात सुप्रसिद्ध झालेले कवी नारायण सुर्वे. त्यांनी नारायणला शाळेत घातले. चौथीपर्यंतचे शिक्षण दिले. पुढे ते निवृत्त झाले आणि कोकणातल्या आपल्या गावी निघून गेले. नारायण मुंबईतच राहिला. पुढील शिक्षण त्यांनी स्वत:च्या हिमतीवर केले.
पुढच्या काळात जीवनाशी संघर्ष करताना त्यांनी घरगडी, होटेलमधला पोर्या:, कुणाचं कुत्रं, कुणाचं मूल सांभाळणं, हरकाम्या, दूध टाकणार्याग पोर्याध, पत्रे उचलणे, हमाली अशी अनेक कामे केली. हा त्यांचा जीवन प्रवास अतिशय खडतर असा होता.
१९५८मधे ‘नवयुग’ मासिकात त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. ‘डोंगरी शेत माझं…’ हे त्यांचं गीत अतिशय गाजलं. १९६२साली त्यांचा पाहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. ‘ऐसा गा मी ब्रम्ह’ त्याला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर एका पाठोपाठ एक त्यांचे कविता संग्रह येत राहिले. ‘माझे विद्यापीठ’, ‘जाहीरनामा’, ‘पुन्हा एकदा कविता’, ‘सनद’ हे त्यांचे कविता संग्रह वाचकप्रिय झाले. सुर्वे यांचे पहिले वहिले काव्यवाचन झाले, ते कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली गोव्यातील मडगावच्या साहित्य संमेलनात. त्यानंतर ते प्रत्येक काव्यमैफलीत आपल्या खडया सुराने रंग भरत राहिले. ‘मास्तर तुमचं नाव लिवा’, ‘असं पत्रात लिवा’, ‘मनीऑर्डर’, मुंबईची लावणी’, ‘गिरणीची लावणी’ या त्यांच्या कविता विशेष रसिकप्रिय झाल्या.
नारायण सुर्वे यांच्या कविता त्यांनी अनुभवलेल्या कठोर वास्तवाचे , त्यांच्या जीवन संघर्षाचे दर्शन घडवणार्यास आहेत. कामगार, हातावर पोट असलेल्यांचे जग त्यांनी शब्दबद्ध केले आहे. मराठी कवितेला त्यांनी सामाजिक बांधीलकीचा विशाल आशय प्राप्त करून दिला.
नारायण सुर्वे यांच्यावरील पुस्तके
१. नारायण सुर्वे यांच्या पत्नीने ‘मास्तराची सावली’ या आत्मकथनात त्यांच्या आठवणी दिलेल्या आहेत.
२. सुर्वे यांच्या काव्याची इहवादी समीक्षा ( डॉ. श्रीपाल सबनीस)
आज नारायण सुर्वे यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्त या थोर कर्मयोग्याला आणि त्याच्या प्रतिभेला शतश: वंदन.
☆ ☆ ☆ ☆ ☆
सौ. उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈