सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १६ जुलै – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

वासू बेंद्रे

वासुदेव सीताराम बेंद्रे (13 फेब्रुवारी 1894 – 16 जुलै 1986) हे थोर इतिहाससंशोधक होते.

त्याकाळी 16 वर्षांचे झाल्याशिवाय मॅट्रिकची परीक्षा देता येत नसे. बेंद्रेंचा अभ्यास तर 14 व्या वर्षीच पूर्ण झाला होता. ती दोन वर्षे त्यांनी रेल्वे ऑडिटमध्ये विनावेतन काम केले. तीन महिन्यांतच ते शॉर्टहँड व स्टेनोग्राफीत प्रवीण झाले. त्याबद्दल त्यांना सुवर्णपदक मिळाले. त्यांची कामाची तडफ, निष्ठा,निर्णयक्षमता बघून त्यांच्या वरिष्ठानी त्यांना दुसऱ्या लेव्हलचे गॅझेटेड ऑफिसर होण्याचा सल्ला दिला. एज्युकेशन डायरेक्टर जे. जी. कॉन्व्हर्टन यांनी त्यांची क्षमता बघून त्यांना मराठ्यांच्या इतिहासाचं संशोधन करण्यासाठी प्रवृत्त केलं.

त्यांनी पुण्याच्या इतिहास संशोधक मंडळ येथे संशोधन करून लिहिलेला ‘साधन-चिकित्सा’ हा त्यांचा पहिला ग्रंथ होता. हा ग्रंथ तेव्हाच्या इतिहासाकारांनी तर वाखाणलाच, शिवाय त्या क्षेत्रात संशोधन करणाऱ्यांनाही तो मार्गदर्शक ठरला.

बेंद्रे शिष्यवृत्ती मिळवून इंग्लंड व युरोपला गेले. तेथे त्यांनी अनेक ऐतिहासिक दस्तावेजांचा कसून अभ्यास केला. पुरावा असल्याशिवाय ते कोणतीही गोष्ट खरी मानत नसत.
त्यापूर्वी शिवाजी महाराजांचं म्हटलं जाणारं चित्र हे दुसऱ्याच व्यक्तीचं होतं.संभाजी महाराजांवर संशोधन करत असताना बेंद्रेनी प्रयत्नपूर्वक शिवाजी महाराजांचं चित्र शोधून काढून ते लोकांसमोर आणलं. तेच चित्र आपल्याला खरे शिवाजी महाराज कसे दिसत, ते दाखवतं.

बेंद्रेनी शिवाजी महाराजांवर दोन खंड लिहिले.

इंग्लंडमधील दस्तावेजांचा अभ्यास करून बेंद्रेनी संभाजी महाराजांचे चरित्र लिहिले. त्यामुळे तोपर्यंत संभाजी महाराजांची असणारी मलीन प्रतिमा खोटी ठरून लोकांसमोर त्यांची उमदे, शूर, विद्वान,प्रतिभाशाली साहित्यिक ही ओळख निर्माण झाली.

बेंद्रेनी संभाजी महाराजांची समाधी शोधून काढून तिचा जीर्णोद्धारही केला.

पेशवे दफ्तराचे डायरेक्टर ऑफ रिसर्च या पदावर काम करताना त्यांनी मोडीत लिहिलेली 4कोटी ऐतिहासिक कागदपत्रे तपासून त्यांची विषयवार व कालानुक्रमे सूची बनवली. सूची बनवण्याच्या पद्धतीवर त्यांनी पुस्तकेही लिहिली. ती अजूनही वापरली जातात.

यानंतर त्यांनी तंजावर दफ्तराचीही सूची तयार केली.

बेंद्रे मुंबई इतिहास मंडळाचे डायरेक्टर व महाराष्ट्र ऐतिहासिक परिषदेचे सी.ई.ओ.होते. या काळात त्यांनी 3 परिषदा भरवल्या,19 त्रेमासिक जर्नलं व 14पुस्तकांचे प्रकाशन केले.

बेंद्रेनी ऐतिहासिक संशोधन व लेखन कसं करावं याविषयी प्राध्यापकांना प्रशिक्षण दिलं.

बेंद्रेनी अनेक विद्यापीठात मराठ्यांच्या इतिहासावर परिषदा घेतल्या.

इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स कमिशन व ऑल इंडिया हिस्टरी काँग्रेसचे ते सल्लागार होते.

इतिहासात हुंडापद्धत अस्तित्वात नव्हती, हे लोकांना पटवून हुंडाविरोधी चळवळीत त्यांनी सक्रिय योगदान दिले. ब्रदरहूड स्काऊट चळवळ व विद्यार्थी संघटनेतही त्यांचा सहभाग होता.

त्यांनी मराठी व इंग्रजीत 60हून अधिक पुस्तके लिहिली. त्यापैकी संत तुकारामांवर 8-9 पुस्तके होती.

मालोजी- शहाजी, संभाजी, शिवाजी, राजाराम यांच्या चरित्रांसाठी त्यांना पुरस्कार मिळाले.

☆☆☆☆☆

नीला सत्यनारायण

नीला सत्यनारायण (5 फेब्रुवारी 1948 – 16 जुलै 2020)या लेखिका व मुलकी अधिकारी होत्या. त्या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त होत्या.

त्या पूर्वाश्रमीच्या नीला वासुदेव मांडके.

त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या गृहखाते, वनविभाग, समाजकल्याण अशा वेगवेगळ्या खात्यांत काम केले. त्या डायरेक्टर जनरल ऑफ इन्फॉरमेशन अँड पब्लिक रिलेशन्स होत्या.1995-99 या काळात त्या प्रिन्सिपल सेक्रेटरी होत्या.

ऍडिशनल चीफ सेक्रेटरी (रेव्हिन्यू) या पदावरून त्या निवृत्त झाल्या.

निवृत्तीनंतर त्यांची नियुक्ती राज्य निवडणूक आयुक्त या पदावर झाली.

निवृत्तीनंतर त्या एम. आय. टी. सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये शासकीय व्यवस्थेवर व्याख्याने देत असत.

त्यांनी मुख्यत्वे मराठीत लिहिले. त्यात 7 कादंबऱ्या, 10 कवितासंग्रह व 2 आत्मचरित्रात्मक पुस्तके वगैरेंचा समावेश होतो.

‘एक पूर्ण अपूर्ण’ यात आपलं करिअर सांभाळून त्यांनी आपल्या डाउन सिंड्रोम असलेल्या मुलाला कसे वाढवले, याचं अनुभवकथन आहे.

‘जाळरेषा’त त्यांच्या करिअरमधील चार दशकांतील अनुभव वाचायला मिळतात. याच्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न त्यांनी नाना पाटेकरांच्या, शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या एन.जी.ओ.ला दिले.

याव्यतिरिक्त त्यांनी ‘पुनर्भेट’, ‘सत्यकथा’, ‘एक दिवस जीवनातला’, ‘पालकांच्या मार्गदर्शनासाठी केसस्टडी’ वगैरे अनेक पुस्तके लिहिली.

नियतकालिकांत प्रकाशित झालेल्या त्यांच्या लेखांचे ‘आयुष्य जगताना’ व ‘डेल्टा 15’ हे संग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

त्यांनी अनुवादही केला आहे.

त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘बाबांची शाळा’ या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते.

16 जुलै 2020ला करोनामुळे त्यांचे निधन झाले .

आज वासू बेंद्रे व नीला सत्यनारायण यांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांना सादर अभिवादन.🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments