सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १६ मार्च -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
गणेश दामोदर (बाबाराव) सावरकर
गणेश दामोदर ऊर्फ बाबाराव सावरकर (13 जून 1879 -16 मार्च 1945)हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे हे सर्वांत मोठे बंधू.
घरच्या परिस्थितीमुळे व कुटुंबाच्या जबाबदारीमुळे त्यांना मॅट्रिकपर्यंत जाता आले नाही. पण त्यांनी योगविद्या, वैद्यक, फलज्योतिष, शरीर सामुद्रिक, हस्त सामुद्रिक, मंत्रशास्त्र, वेदांत या शास्त्रांचा, त्याचप्रमाणे इतिहास, राजकारण, राज्यशासन, भाषा, सैन्यव्यवहार, धर्म, तत्त्वज्ञान, चरित्रे, संघटनशास्त्र,कला वगैरे अनेक विषयांचा सखोल अभ्यास केला.
‘राष्ट्रमीमांसा व हिंदुस्थानचे राष्ट्रस्वरूप’, ‘धर्म कशाला हवा?’, ‘हिंदुराष्ट्र -पूर्वी -आता – पुढे’, ‘ख्रिस्तपरिचय’ वगैरे अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. ‘वीर बैरागी’ हा मूळ हिंदी भाषेतील पुस्तकाचा त्यांनी केलेला मराठी अनुवाद आहे. याशिवाय त्यांनी वेळोवेळी विविध विषयांवर लिहिलेले लेखही वेगवेगळ्या नियतकालिकांत प्रसिद्ध झाले.
1946साली त्यांनी लिहिलेल्या ‘ख्रिस्त परिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व’या पुस्तकात त्यांनी ‘येशू ख्रिस्त हे तामिळी हिंदू – विश्वकर्मा ब्राह्मण होते. ख्रिश्चन धर्म हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे,’असे विचार मांडले होते.26.02.2016 रोजी हे पुस्तक पुनःप्रकाशित करण्यात आले.’ऑल इंडिया ट्रू ख्रिश्चन कौन्सिल’ या संस्थेने या पुस्तकाविरुद्ध मुंबई हायकोर्टात धाव घेऊन पुस्तकाची प्रत्येक प्रत जप्त करण्याची मागणी केली आहे.
स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या क्रांतिकार्यामुळे त्यांना अंदमान येथे काळ्या पाण्याची व सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.1911 ते 1921 या काळात त्यांना मरण यातना भोगाव्या लागल्या. 1921मध्ये त्यांची अंदमानहून सुटका होऊन त्यांना भारतातील विविध तुरुंगांत पाठवण्यात आले. त्यांची तब्येत खूपच बिघडल्याने 1922 साली त्यांची शिक्षा संपवण्यात आली. पण नंतरही क्रांतिकार्य सुरू असतानाच 16 मार्च 1945 रोजी सांगली येथे त्यांचे निधन झाले.
ज्ञानेश्वर महादेव कुलकर्णी
ऍडवोकेट ज्ञानेश्वर महादेव कुलकर्णी (13 जून 1930 -16 मार्च 2013) हे पुण्यातील एक नामवंत वकील, इतिहासाचे गाढे अभ्यासक असे विद्वान गृहस्थ होते.
‘A New Perspective To The Language Of Indus Script’,’रोमन आणि देवनागरी लिप्यांची जननी :सिंधू लिपी ‘, ‘सिंधू संस्कृती’, ‘हडप्पा संस्कृती? नव्हे, महाभारतकालीन हिंदू राज्येच!’ इत्यादी अनेक मराठी व इंग्रजी ऐतिहासिक पुस्तके, त्याचप्रमाणे ‘श्रीपाद श्रीवल्लभ ‘ हे दत्त संप्रदायावरील पुस्तक, तसेच ‘अजिंक्य’ हे 81 व्या वर्षीही असणाऱ्या स्वतःच्या सुदृढ प्रकृती चे रहस्य सांगणारे पुस्तक, तसंच ‘आकाशगंगा’ व ‘ ऋतुराज’ हे कालिदासाच्या ग्रंथांचे अनुवाद वगैरे विविध विषयांवरील विविध पुस्तके त्यांनी लिहिली.
16 मार्च 2013 रोजी त्यांचे निधन झाले. पण शेवटपर्यंत त्यांची वकिली चालू होती.
गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर आणि ज्ञानेश्वर महादेव कुलकर्णी यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरपूर्वक श्रद्धांजली.
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना कऱ्हाड, शताब्दी दैनंदिनी. विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈