सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? १७ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

आज १७ नोव्हेंबर :–

फक्त ’ साहित्यिक ‘ एवढीच उपाधी ज्यांच्यातल्या जन्मजात चतुरस्त्र लेखकासाठी खरोखरच अपुरी वाटते, अशा श्री. रत्नाकर मतकरी यांचा आज जन्मदिन. 

( १७/११/१९३८ — १८/५/२०२० ) 

नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य, अशा साहित्य-विश्वातल्या अनेक महत्वाच्या प्रांतांमध्ये, आश्चर्य वाटावे इतकी भारावून टाकणारी मुशाफिरी करता-करता, त्यांनी स्वतःतला साहित्यिक तर कायम उत्तम तऱ्हेने जोपासलाच, पण त्याचबरोबर, स्वतःमधला एक सृजनशील दिग्दर्शक, निर्माता, रंगकर्मी, आणि उत्तम चित्रकारही सतत कार्यरत राहील, आणि स्वतःच्या साहित्याइतकाच रसिकांना कमालीचा आनंद देत राहील, याची रसिकांना खात्री पटवून दिली. 

मालिका-चित्रपट यासाठी लेखन आणि दिग्दर्शन, वृत्तपत्रांमध्ये वैविध्यपूर्ण सदरलेखन, कथाकथन,  असे सगळे करत असतांनाच, ‘ माध्यमांतर ‘ हा एक अवघड लेखन- प्रकारही श्री मतकरी यांनी अगदी लीलया पेललेला आहे. या प्रकाराबद्दल थोडक्यात असे सांगता येईल की, एखादी साहित्यकृती रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरलेले माध्यम बदलून, दुसऱ्या वेगळ्या माध्यमातून ती सादर करणे — जसे की एखाद्या कथेचे नाटकाच्या माध्यमातून , किंवा एखाद्या नाटकाचे चित्रपटाच्या माध्यमातून मूळ माध्यमाइतक्याच सशक्तपणे सादरीकरण करणे. या कामांमधूनही  त्यांचे लेखन-कौशल्य दिमाखदारपणे रसिकांसमोर आलेले आहे. दर्जेदार गूढकथा-लेखक ही त्यांची ओळख वाचकांना वेगळेपणाने करून देण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. 

त्यांनी केलेले अतिशय महत्वाचे आणि आवश्यक काम हे, की त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. स्वतः उत्तम बालनाट्ये लिहिली. आणि नुसते लिहून न थांबता, स्वतः खर्च करून त्या नाटकांची निर्मितीही केली. हा सगळा उद्योग त्यांनी जवळजवळ तीस वर्षे अगदी मनापासून पेलला. त्यासाठी ‘ बालनाट्य ‘ ही स्वतःची नाट्यसंस्था त्यांनी स्थापन केली होती. “ झोपडपट्टीतील मुलांना त्यांच्यामुळे ‘ नाटक ‘ हा आनंददायक प्रकार फक्त कळलाच नाही, तर स्वतःला तो शिकताही आला, “ असेच अगदी सार्थपणे म्हणता येईल. 

‘ बालनाट्य ‘, आणि ‘ सूत्रधार ‘, या नाट्यसंस्थांचे लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार, निर्माते, या सगळ्या भूमिका तर त्यांनी समर्थपणे सांभाळल्याचं, आणि बरेचदा त्या नाटकांमध्ये नट म्हणूनही काम केले. दूरदर्शनवरील ‘ शरदाचे चांदणे ‘, ‘ गजरा  ‘ अशा कार्यक्रमांचे सादरकर्ते,  म्हणूनही त्यांची रसिकांना ओळख होती. दूरदर्शनवर लोकप्रिय ठरलेल्या ‘ गहिरे पाणी ‘, अश्वमेध ‘, ‘बेरीज वजाबाकी ‘, या मालिकांचे लेखन श्री. मतकरी यांनीच केलेले होते. 

उत्तम चित्रकार, प्रभावी वक्ते, याबरोबरच श्री. मतकरी यांची आवर्जून सांगायलाच हवी अशी एक ओळख म्हणजे, ‘ नर्मदा बचाओ आंदोलन ‘, ‘ निर्भय बनो आंदोलन ‘ अशामधला त्यांचा सक्रिय सहभाग. 

त्यांचे असे वेगवेगळ्या प्रकारचे काम पाहता, “ श्री रत्नाकर मतकरी म्हणजे चौफेर कर्तृत्व “ असेच म्हणायला हवे. 

बावीस नाटके, अनेक एकांकिका, तेवीस कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेखसंग्रह , आणि या विपुल लेखनाबरोबरच, आपल्या रंगभूमीवरच्या कामाचा सखोल विचार करणारा “ माझे रंगप्रयोग “ हा आत्मचरित्रात्मक ग्रंथही त्यांनी लिहिलेला आहे.

रत्नाकर मतकरी यांचे एक माणूस म्हणून, एक कलावंत म्हणून असलेले व्यक्तिमत्व, त्यांचे एकूण लेखन, या विषयांवरच्या त्यांच्या मुलाखती, हा पहिला भाग;; त्यांच्या कथा, नाटके, कादंबऱ्या, एकांकिका, लेख, कविता, पत्रे अशा साहित्यप्रकारांचा समावेश असणारा दुसरा भाग,; इतर मान्यवरांना मतकरी कसे वाटतात हे सांगणारा तिसरा भाग; आणि त्यांच्या संग्रहित आणि असंग्रहित अशा संपूर्ण साहित्याचा आणि नाट्यप्रयोगांचा तपशील देणाऱ्या दीर्घ सूचीचा चौथा भाग; अशा चार भागात त्यांचा  “ रत्नाक्षरं “ हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. त्यांची सगळीच पुस्तके इतकी लोकप्रिय झालेली आहेत, की त्यातल्या कोणत्या मोजक्या पुस्तकांचा इथे उल्लेख करावा हा मोठाच प्रश्न मला पडला आहे. 

श्री मतकरी यांना कितीतरी पुरस्कार देऊन अनेकदा गौरवले गेलेले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या ज्योत्स्ना भोळे पुरस्कार, २१ पुस्तकांना साहित्य पुरस्कार, ‘ माझं घर माझा संसार ‘ या चित्रपटाच्या उत्कृष्ट पटकथेसाठी  दादासाहेब फाळके पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, महाराष्ट्र फौंडेशन अमेरिका याचा विशेष साहित्य-गौरव पुरस्कार, साहित्य अकादमी बाल -साहित्य पुरस्कार, उद्योग भूषण पुरस्कार, केंद्रशासनाची ‘ सामाजिक जाणिवेचा ज्येष्ठ रंगकर्मी ‘ म्हणून २ वर्षांची शिष्यवृत्ती, हे त्यापैकी काही पुरस्कार. २००१ साली पुण्यात झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. 

मराठी साहित्य-शारदेला इतक्या विविध आणि सुंदर अलंकारांचा साज चढवणाऱ्या श्री रत्नाकर मतकरी यांना आजच्या जन्मदिनी अतिशय आदरपूर्वक विनम्र प्रणाम ?

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments