सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १८ एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
प्रकाश खरात
प्रकाश नथू खरात (25 जानेवारी 1952 – 18 एप्रिल 2021) हे मराठी कवी व लेखक होते.
त्यांचा जन्म जुन्नर येथे झाला. राज्यशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी एम ए केलं.
सेंट्रल बँकेत असिस्टंट मॅनेजर असताना 2001 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात एम. ए. च्या विद्यार्थ्यांना अध्यापन करत असत.
‘निर्मितीचा प्रदेश’, ‘पार्थिव – अपार्थिव’, ‘जन्ममरण वर्दळीवर येताना’ हे कवितासंग्रह, ‘अनिकेत’ हा कथासंग्रह, ‘अस्तित्वाचे धागे’ ही आत्मपर कादंबरी इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली.
सौंदर्यवेधी कल्पना, अर्थपूर्ण प्रतिमा, व्यामिश्र वास्तवाचा शोध, चिंतनशील काव्यात्मकता या वैशिष्ट्यांमुळे खरातांची कविता रूढ दलित काव्याची चौकट ओलांडून गेली.
‘आरंभ’ या अनियतकालिकाचे ते संपादक होते.
बेळगाव, नाशिक, नागपूर येथे झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कविसंमेलनात त्यांचा सहभाग होता.
खरातांच्या कवितांचे इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती या भाषांत अनुवाद झाले आहेत.
त्यांच्या ‘अनिकेत’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.
‘अस्तित्वाचे धागे’ या आत्मपर कादंबरीस ‘साद’ पुरस्कार मिळाला.
दलित साहित्य संसद, दिल्ली या संस्थेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप.
इंदूरचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न’ पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
18 एप्रिल 2021 ला करोनामुळे त्यांचा देहांत झाला.
खरातांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, ‘जन्म – मरण वर्दळीवर येताना ‘:परिचय व प्रस्तावना.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈