सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १८ जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
श्रीपाद रामकृष्ण काळे
श्रीपाद रामकृष्ण काळे (8जुलै 1928 – 18 जून 1991) हे एक दशग्रंथी ब्राह्मण, कथालेखक, कादंबरीकार, निबंधकार होते.
देवगडमधील वाडा या लहानशा खेड्यात त्यांचा जन्म झाला. लिहिणं- वाचणं व भिक्षुकीचं शिक्षण त्यांना घरीच वडिलांकडून मिळालं. तर उच्चशिक्षित समीक्षकापेक्षाही अधिक संवेदनशील ; पण अक्षरओळख नसलेली आई त्यांना लाभली होती. या दोघांचे संस्कार तीव्र बुद्धिमत्ता, प्रचंड निरीक्षणक्षमता व उत्तम आकलनशक्ती असलेल्या श्रीपादवर होऊन ते शब्दप्रभू झाले.
ते भिक्षुकी करत असत. त्यासाठी अनेक गावांची पायी यात्रा करत असताना त्यांची प्रतिभा कोकणातील लोभस निसर्गलेणे टिपत असे.
विविध वृत्तपत्रे, नियतकालिके, दिवाळी अंक यांतून त्यांनी उत्तमोत्तम लेखन केलं.’पिसाट वारा’, ‘ संचित’, ‘समर्पण’, ‘चकवा’, ‘दाणे आणि खडे’, ‘नवी घडी नवे जीवन’ इत्यादी जवळजवळ 1200 कथा व 50हून अधिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. ते अर्थशास्त्रविषयक नियतकालिकाचे संपादक होते.
आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर त्यांनी अनेक कथांचे वाचन केले.
काळे यांच्या ‘पिसाट वारा’ या कादंबरीला राज्य पुरस्कार मिळाला. कोमसापने पावसमध्ये त्यांचा भव्य सत्कार केला. त्या कादंबरीची गुजराती, कानडी व हिंदीत भाषांतरे झाली. लोकमान्य टिळक साहित्य पुरस्कार, कविता माधव पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.
विविध साहित्य संमेलनांतून प्रमुख साहित्यिक म्हणून त्यांची उपस्थिती असे.
वाडा लायब्ररीमध्ये अध्यक्ष म्हणून त्यांचे भरीव योगदान होते.
पत्नी इंदिरा काळे यांच्या नावे उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी त्यांनी ‘कोमसाप’लां आर्थिक देणगी दिली.
आज श्रीपाद काळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈