श्री सुहास रघुनाथ पंडित
१८ नोव्हेंबर – संपादकीय
काही महिन्यांपूर्वीच म्हणजे 28/8/2021 ला ज्यांचे निधन झाले त्या आनंद अंतरकर यांचा आज जन्मदिन.(1941)
हंस, मोहिनी आणि नवल ही मासिके मराठी वाचकांत अत्यंत लोकप्रिय.या मासिकांचे संपादक अनंत अंतरकर.त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव आनंद अंतरकर यांनी या मासिकांचे संपादन केले.या मासिकांतून त्यांनी गूढ,विज्ञान,संदेह,रहस्य अशा वेगळ्या वाटेवरील साहित्याला प्राधान्य दिले.हंस चे अनेक अंक हे अनुवाद विशेषांक होते तर मोहिनीने रसाळ विनोदाची मोहिनी घातली.
श्री.आनंद अंतरकर यांनी संपादकीय जबाबदारी बरोबरच साहित्य निर्मितीत ही यश संपादन केले.घूमर,झुंजूरवेळ,रत्नकीळ,सेपिया,एक धारवाडी कहाणी ही त्यांची साहित्य संपदा.सेपिया ही व्यक्तीचित्रे आहेत तर एक धारवाडी कहाणी हे पुस्तक अनंत अंतरकर आणि सुप्रसिद्ध कथा लेखक जी.ए.कुलकर्णी यांच्यात झालेल्या पत्रव्यवहारावर आधारीत आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे.
हणमंत नरहर जोशी, अर्थात “काव्यतीर्थ” कवी सुधांशु
इथेच आणि या बांधांवर, भुलविलेस साजणी, या धुंद चांदण्यात तू यासारखी भावनांनी ओथंबलेली भावगीते आणि गुरूदत्त पाहिले कृष्णातिरी, दत्त दिगंबर दैवत माझे, देव माझा विठू सावळा, या मुरलीने कौतुक केले, स्मरा स्मरा हो दत्तगुरू ही भक्तीरसपूर्ण अवीट गीते ज्यांच्या एकाच लेखणीतून पाझरली असा शब्दांचा पुजारी म्हणजे काव्यतीर्थ सुधांशु !
हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचा आज स्मृतीदिन. (1917). तरूण वयातच त्यांनी काव्यलेखनाला प्रारंभ केला.गीत दत्तात्रेय या त्यांच्या गीतांचा कार्यक्रम लोकप्रिय झाला होता. आपल्या मित्राच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी त्यांच्या गावी औदुंबर येथे साहित्य संमेलन भरवण्यास प्रारंभ केला. पहिले संमेलन 1939 ला मकर संक्रांतीला आयोजित करण्यात आले होते. तेव्हापासून आजतागायत दरवर्षी संक्रांतीला हे संमेलन भरत आले आहे.पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष होते महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार.अशाच नामवंतांची परंपरा पुढे चालू राहिली आहे. साहित्य क्षेत्रातील या कार्याव्यतिरिक्त सुधांशु यांनी स्वातंत्र्य लढ्यातही भाग घेतला होता. खादीचे कपडे व खांद्यावर एक शाल असा त्यांचा साधा पेहराव होता. आपल्या परिसरात त्यांनी ग्रामसुधारणेचे अनेक प्रयोग यशस्वी केले.
कवी कुंजविहारी यांनी त्यांना सुधांशु हे नाव बहाल केले. श्री शंकराचार्यानी त्यांना ‘काव्यतीर्थ’ ही उपाधी दिली. 1974मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ ने गौरविले. वाराणसी विद्यापीठाने त्यांना डी.लीट्. पदवी प्रदान केली. मराठी साहित्य परिषदेने त्यांना कवी यशवंत पुरस्कार दिला. तर समस्त सांगलीकरांच्या वतीने त्यांना ‘सांगलीभूषण’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.
सुधांशु यांचे पद्य लेखन:
कौमुदी, गीतदत्तात्रय, गीत सुगंध, गीतसुधा, जलवंती, झोपाळा, भावसुधा, यात्री, विजयिनी, स्वर इ.
त्यांचे गद्य लेखन:
खडकातील झरे(कथा), दत्तजन्म(एकांकिका), चतुरादेवी, सुभाष कथा(बालसाहित्य) इ.इ.
या भावुक सत्वशील कवीस सादर वंदन! ?
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: विकीपीडिया, मराठी विश्वकोश, मराठी सृष्टी, बाइटस्ऑफइंडिया
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈