श्री सुहास रघुनाथ पंडित
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १९ जून – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
रमेश राजाराम मंत्री
रमेश मंत्री हे प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे लेखक म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांनी कादंबरी, प्रवासवर्णन अशा विविध प्रकारचे लेखनही केले आहे. कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात एम.ए.पूर्ण करत असतानाच त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांतून लेखन करण्यास सुरूवात केली होती. पुढे काही दिवस त्यांनी दैनिक पुढारीचे सहसंपादक म्हणूनही काम केले होते.
इंग्लंडला जाऊन त्यांनी वृत्तपत्र व्यवसाय शिक्षण पूर्ण केले.1958 ते 1978 या प्रदीर्घ काळात अमेरिकेच्या माहिती खात्यात त्यांनी सेवा केली. त्यानिमीत्ताने त्यांचे जगभर हिंडणे झाले. अनुभव समृद्ध झाले. त्याचा उपयोग त्यांना लेखनासाठी झाला. अनुभव आणि प्रतिभा यांची साथ लाभल्यामुळे अनेक प्रवास वर्णने त्यांच्याकडून लिहून झाली. थंडीचे दिवस, सुखाचे दिवस, नवरंग ही प्रवासवर्णने वैशिष्ट्यपूर्ण ठरली.
मराठी साहित्यात भर घालणारी काही वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी श्री.रमेश मंत्री यांनी केली आहे.मराठीत विनोदी फॅटसी रूढ करण्याचे श्रेय त्यांना जाते.जेम्स बाॅड च्या धर्तीवर जनू बांडे ही विडंबनात्मक व्यक्तिरेखा त्यांनीच जन्माला घातली.मुंबई मराठी साहित्य संघात ‘साहित्यिक गप्पा’ त्यांनीच सुरू केल्या.कोल्हापूर येथील 1992 साली भरलेल्या अ.भा. साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे अनेक ठिकाणी पुस्तक प्रदर्शने भरवली व वाचन चळवळीस हातभार लावला.उत्साह,उत्सवप्रियता, विनोदबुद्धी, कठोर शिस्त व सततची कार्यमग्नता ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये होती. त्यामुळेच तर त्यांनी 130 हून अधिक पुस्तके प्रकाशित केली.एवढेच नव्हे तर 1979 या एका वर्षात त्यांनी 34पुस्तके प्रकाशित केली.
त्यांची काही पुस्तके:
हसण्याचा तास- पहिला, दुसरा, तिसरा, कागदी सिंह, ओठ सलामत तो,मावशी हरवली, हास्यधारा,बोल बोल म्हणता,अति झाले अन् हसू आले.
तरंगणारे शहर, थंडीचे दिवस, सुखाच्या रात्री, सुखाचे दिवस, सूर्यपुत्रांचा देश जपान.
उत्तरकाळ, हुलकावणी इत्यादी.
अशा या विक्रमी लेखकाचा 19/06/1998 ला अंत झाला.
हसण्याचे तास घेऊन जगणं सुसह्य करणा-या रमेश मंत्री यांना आज स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : महाराष्ट्र नायक, मराठी सृष्टी, विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈