सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २० जून – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी)
“आलो तुझ्या दुनियेत, नव्हतो चोर वा डाकू आम्ही , एकही ना चीज इथली, घेऊनी गेलो आम्ही
ते ही असो, आमुच्यासवे आणिला ज्याला इथे , भगवन, अरे तो देहही मी टाकुनी गेलो इथे—“
— अशा शब्दात देवालाच सत्याची जाणीव करून देणारे सुप्रसिद्ध गझलकार , शायर व कवी श्री. वासुदेव वामन तथा भाऊसाहेब पाटणकर यांचा आज स्मृतीदिन. ( २९/१२/१९०८ – २०/६/१९९७ )
मराठीतले जिंदादिल शायर अशी ओळख असणारे भाऊसाहेब हे खरे तर “ मराठी शायरीचे जनक “ . शायरी हा अधिकतर उर्दू – हिन्दी भाषेत रूढ असणारा काव्यप्रकार त्यांनी मराठी भाषेत रुजवला, देशभर पोहोचवला, आणि त्याला जणू “ चिरतरुण “ करून ठेवलं.
वेद , तत्वज्ञान , आणि इतर शास्त्रांचा अभ्यास असणारे भाऊसाहेब पेशाने वकील होते. यवतमाळ जिल्हा न्यायालयातील फौजदारी खटले कायम जिंकणारे वकील अशी त्यांची ख्याती झाली होती. शिवाय ` सहा पट्टेरी वाघांना लोळवणारे शिकारी `म्हणूनही ते ओळखले जात . शिकारीवर कायद्याने बंदी आल्याने त्यांना तो नाद सोडावा लागला. पुढे दृष्टिदोष झाल्याने त्यांना वकिली सोडावी लागली, पण काव्यरसिकांसाठी ती पर्वणी ठरली असे म्हणावेसे वाटते. कारण त्यानंतर ते कविता या साहित्यप्रकाराकडे वळले, आणि मराठी शायरी या नव्या प्रांताची त्यांनी लोकांना अगदी जवळून ओळख करून दिली. हळूहळू त्यांच्या रचना इतक्या लोकप्रिय झाल्या की महाराष्ट्रभर आणि इतर राज्यांमध्येही त्यांच्या शायरीचे कार्यक्रम होऊ लागले, आणि त्यांना रसिकांची प्रचंड दाद मिळू लागली . विनोद आणि प्रणय यांची रेलचेल असणारी, इतकी प्रसिद्ध झालेली शायरी लिहायची सुरुवात त्यांनी वयाच्या ५२ व्या वर्षी केली होती, हे सांगितले तर खरे वाटणार नाही. याचवेळी एकीकडे त्यांनी शायरी ह्या काव्यप्रकाराचा खोलात जाऊन अभ्यास केला. आणि मग तत्वज्ञान आणि जीवन या अनुषंगाने विविध विषयांवर त्यांनी शायरी लिहिली. वर सुरुवातीला उद्धृत केलेल्या त्यांच्या दोन ओळींवरून हेच दिसून येते. उर्दू शायरीपेक्षा अगदी वेगळी आणि स्वतंत्र अशी त्यांची मराठी शायरी खूपच लोकप्रिय झाली असली, तरीही ते विनम्रपणे असे व्यक्त व्हायचे की —
सांगेल काही भव्य ऐसी , शायरी माझी नव्हे —
तो कवींचा मान , तितुकी पायरी माझी नव्हे —
“जिंदादिल“ , “ दोस्तहो “ हे अतिशय गाजलेले काव्यसंग्रह, तसेच “ मराठी मुशायरा “ , “ मराठी शायरी “ ,
“ मैफिल“ असे त्यांचे प्रकाशित साहित्य आहे. भाऊसाहेबांच्या “ दोस्तहो “ या गजल संग्रहातल्या चारोळ्यांची भाषा तर इतकी सोपी आहे की चारोळी नुसती वाचली की त्यात काय सांगायचे आहे हे वाचकाला पूर्णपणे लक्षात येतं— म्हणजे त्याचे वेगळेपणाने रसग्रहण करायची गरजच उरत नाही – आणि ही त्यांच्या लेखणीची ताकद होती.- याच्या उदाहरणादाखल या पुढच्या काही ओळी —–
“आहो असे बेधुंद आमची धुंदही साधी नव्हे…. मेलो तरी वाटेल मेला दुसरा कुणी आम्ही नव्हे .. “
किंवा —
“जातो तिथे उपदेश आम्हा, सांगतो कोणीतरी– कीर्तने सारीकडे, चोहीकडे ज्ञानेश्वरी …
काळजी आमुच्या हिताची एवढी वाहू नका– जाऊ सुखे नरकात आम्ही , तेथे तरी येऊ नका …
मराठी कवितेत शायरीची अशी नवी आणि वेगळीच वाट निर्माण करणाऱ्या श्री. भाऊसाहेब पाटणकर यांना भावपूर्ण आदरांजली.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈