सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? २० डिसेंबर –  संपादकीय  ?

आज २० डिसेंबर —श्री अरुण कृष्णाजी कांबळे यांचा स्मृतिदिन. (१४/३/१९५३ – २०/१२/२००९). 

दलित चळवळीचे अग्रणी नेते, आणि “ दलित पँथर्स “ संघटनेचे संस्थापक सदस्य आणि अध्यक्ष म्हणून परिचित असणारे श्री. कांबळे यांची “ मराठी साहित्यातील चिकित्सक लेखक, संशोधक, आणि साहित्याचे गाढे अभ्यासक “ अशीही ठळक ओळख होती. समाजातील विषमता नष्ट होऊन समाज एकजिनसी व्हावा यासाठी कणखर नेतृत्व करत आयुष्य खर्ची घालतांना , त्यांच्यातला  प्रभावी वक्तृत्व गुणही, त्यांच्या प्रभावी लेखनाइतकाच महत्वाचा भाग ठरला होता. अर्थात या लक्षवेधी समाजकार्यात त्यांचा ‘ दुर्दम्य आशावाद ‘ हाही एक महत्वाचा भाग होता. त्यांचे साहित्य याकामी खूप मोलाचे ठरले होते, असे नक्कीच म्हणता येईल. 

सांस्कृतिक संशोधन म्हणावे अशा “ रामायणातील संस्कृतीसंघर्ष “ या त्यांच्या प्रबंधासारख्या पुस्तकामुळे त्यांचे विचार महाराष्ट्रभर पोहोचले, आणि विशेष म्हणजे, या लहानशा पुस्तकातून दिसून आलेल्या त्यांच्या व्यासंगाची मान्यवरांना नोंद घ्यावी लागली. “ या जेमतेम ७५ पानातून कांबळे यांनी आपली विद्वत्ता आणि संशोधनाची तळमळ सिद्ध करत, सत्याचा शोध घेतला आहे,” असे श्री विजय तेंडुलकर यांनी या पुस्तकाबद्दल गौरवाने म्हटलेले होते.

त्यांचे इतर प्रसिद्ध साहित्य म्हणजे —धर्मांतराची भीमगर्जना हे आणखी एक सांस्कृतिक संशोधन म्हणून गाजलेले पुस्तक, वाद-संवाद, आणि युगप्रवर्तक आंबेडकर या नावाने दोन वैचारिक पुस्तके, चिवर हा ललित लेख संग्रह, एक काव्यसंग्रह, आणि, चळवळीचे दिवस हे आत्मकथन. 

सांगलीतून प्रसिद्ध होणाऱ्या ‘ दक्षिण महाराष्ट्र ‘ या साप्ताहिकात ते स्तंभलेखन करत असत. त्यांनी ‘आंबेडकर भारत ‘ हे अनियतकालिक सुरु केले होते. तसेच बाबासाहेबांच्या ‘ जनता ‘ पात्रातील लेखांचे संपादनही कांबळेच करत असत. 

श्री. अरुण कांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

माहितीस्रोत :- इंटरनेट

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments