सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २० सप्टेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे– ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक म्हणून ओळखले जाणारे श्री.अशोक रामचंद्र केळकर यांचा आज स्मृतीदिन.  (२२ एप्रिल १९२९ – २० सप्टेंबर २०१४). 

श्री. केळकर यांचा जन्म पुण्यातला. शिक्षणही पुण्यातच झाले . इंग्रजी भाषा व वाङ्मय हा मुख्य विषय आणि फ्रेंच हा उपविषय घेऊन त्यांनी पुणे विद्यापीठातून एम्. ए. भाषाविज्ञानाच्या अभ्यासासाठी रॉकफेलर प्रतिष्ठानची अभ्यासवृत्ती मिळवली आणि अमेरिकेत कॉर्नेल विद्यापीठात संशोधन केले होते. १९५८ मध्ये याच विद्यापीठातून पीएच्.डी. पदवी प्राप्त केली होती. याच वेळी त्यांना लिली प्रतिष्ठानतर्फे ’तौलनिक साहित्य व समीक्षा’ यासाठी अभ्यासवृत्ती मिळाली.भारतात परत आल्यानंतर आग्रा येथील के. एम्. इन्स्टिट्यूट ऑफ हिंदी स्टडीज अँड लिंग्विस्टिक्स या संस्थेत ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून ४ वर्षे कार्यरत होते. त्यानंतर पुण्यात डेक्कन महाविद्यालयात प्रारंभी प्रपाठक व नंतर प्रोफेसर म्हणून त्यांनी अध्यापन केले. तेथील भाषाविज्ञानाच्या प्रगत अध्ययन केंद्राचे ७ वर्षे संचालक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. तेथूनच १९८९ मध्ये ते निवृत्त झाले. त्यांनी हिंदी, इंग्रजी व मराठी अशा तिन्ही भाषांमध्ये विपुल लेखन केले.भाषाविज्ञानाबरोबरच आस्वाद, समीक्षा आणि मीमांसा या तिन्ही दृष्टीने साहित्याचा सखोल विचार त्यांनी त्यांच्या लेखन – संशोधनातून केला आहे.

 ‘मराठी व्याकरणाची नवी दिशा’ हा त्यांचा मराठीतील पहिला लेख सत्यकथा मासिकात छापून आला (१९६५). मराठी भाषेत त्यांची पुढील पुस्तके प्रसिद्ध आहेत: मराठी भाषेचा आर्थिक संसार (१९७८), प्राचीन भारतीय साहित्य मीमांसा (१९७९),भेदविलोपन: एक आकलन (१९९५), वैखरी : भाषा आणि भाषाव्यवहार (१९९६) आणि रुजुवात. त्यांचा पीएच्.डी. साठी लिहिलेला मराठी भाषेसंबंधीचा ‘लँग्वेज इन सिमॅओटिक पर्स्पेक्टिव्ह: द आर्किटेक्चर ऑफ अ मराठी सेन्टेन्स’ हा प्रबंध इंग्रजीत प्रकाशित झाला आहे. त्यांच्या प्राचीन भारतीय साहित्य मीमांसा या ग्रंथाचे हिंदी व गुजराती अनुवादही प्रकाशित झाले आहेत. स्टडीज इन हिंदी-उर्दू: इंट्रोडक्शन अँड वर्ड फोनोलॉजी (१९६८) हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे तसेच त्यांच्या हिंदीत लिहिलेल्या लेखांचा संग्रह त्रिवेणी: भाषा-साहित्य-संस्कृती (२००४) या नावाने प्रसिद्ध आहे. 

त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरील भाषाविषयक अनेक चर्चासत्रे, परिषदा यांत शोधनिबंधांचे वाचन तसेच त्यासाठीच्या समित्यांवर राहून मार्गदर्शन केले आहे. म्हैसूरच्या भारतीय भाषा संस्थान या संस्थेने त्यांचे सर्व लेखन इ-बुकच्या स्वरुपात प्रकाशित केले आहे. भारतीय भाषा संस्थान ही संस्था आणि महाराष्ट्रातील राज्य मराठी विकास संस्था यांच्या रूपरेखाही केळकरांनीच तयार केल्या होत्या. भाषा आणि जीवन  या मराठीत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार मिळालेल्या त्रैमासिकाचे स्वरूप व धोरणे त्यांच्याच मार्गदर्शनातून आकाराला आलेली आहेत.त्यांनी या मासिकाचे संपादनही केले आहे.

त्यांच्या रुजुवात या ग्रंथालाही २०१० या वर्षीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.

त्यांच्या भाषाविज्ञान व साहित्य अनुवाद, कलासमीक्षा, तत्त्वज्ञान अशा क्षेत्रांमधील मौलिक कामगिरीबद्दल भारत सरकारने २००२ मध्ये पद्मश्री हा किताब बहाल करून त्यांचा गौरव केला आहे.  

श्री. अशोक केळकर यांना विनम्र आदरांजली.🙏

☆☆☆☆☆

श्री.शंकर पुरुषोत्तम जोशी (९ मार्च, इ.स. १८९४- २० सप्टेंबर, इ.स. १९४३) 

मराठी इतिहास संशोधक श्री.शंकर पुरुषोत्तम जोशी यांचा आज स्मृतिदिन.  श्री. जोशी यांचा जन्म पाली, जि.रायगड, इथे झाला होता. त्यांचे  प्राथमिक शिक्षण पाली व महाड येथे झाले. नंतर औंध सातारा येथे ते इंग्रजी शाळेत शिकले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी त्यांनी पुरवठा खात्यात नोकरी केली. त्या निमित्ताने त्यांना क्वेट्टा, अरबस्तान, इराण येथे जायला मिळाले. अरबी, पुश्तू, रशियन आदी भाषा ते शिकले. ती नोकरी संपल्यावर त्यांनी शिक्षकाची नोकरी केली.

मराठ्यांनी महाराष्ट्राबाहेर जाऊन जे कर्तृत्व गाजवले त्याची फारशी चिकित्सा झालेली नाही, हे ध्यानात घेऊन जोशींनी आपल्या साहित्यातून महाराष्ट्राबाहेरील राजकारणावर विशेष लक्ष दिले.

श्री. शंकर पु. जोशी यांची प्रकाशित पुस्तके :-

–पंजाबातील नामदेव (१९३९) : महाराष्ट्रातील नामदेव आणि पंजाबातील नामदेव एकच आहेत हे सिद्ध करणारा (पहिला) ग्रंथ

–भक्तराज – श्री नामदेव जी (हिंदी)

–भाऊंच्या वीरकथा (१९३४)

–मराठ्यांच्या सत्तेचा उत्तरेकडील विस्तार (१९३६)

–राजस्थान-महाराष्ट्र संघर्ष (१९४३) : या पुस्तकात उत्तरेकडे मुलुखगिरी करणारे मराठा सरदार आणि फुटीर वृत्तीचे राजस्थानी राजे यांच्यामधील संबंधांची चिकित्सा केली आहे.

–शीखांचा स्फूर्तिदायक इतिहास (१९३९) : शीखांचा इतिहास सांगणारा मराठीतील पहिला ग्रंथ. 

आजच्या स्मृतिदिनी श्री. शंकर जोशी यांना सादर प्रणाम.🙏

☆☆☆☆☆

महाराष्ट्रात होऊन गेलेले एक संत व मराठी लेखक श्री गुलाबराव महाराज यांचाही आज स्मृतिदिन. 

( ६ जुलै १८८१; – २० सप्टेंबर १९१५ ).

श्री गुलाबराव महाराज हे विसाव्या शतकातील एक असामान्य अलौकिक संत होते. त्यांना वयाच्या आठव्या महिन्यात अंधत्व आले होते. त्यांचा जन्म तथाकथित निम्नजातीत झाला होता. त्यांचे सगळे आयुष्य ग्रामीण भागात गेले. गुलाबराव महाराज यांनी बालपणीच ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला होता. ” भगवद्देह अनध्यस्त-विवर्त आहे, म्हणजे ज्ञानानंतर नाश पावत नाही “– हा भक्तिसिद्धान्त शांकरतत्त्वज्ञानाच्या आधारावर मांडून त्यांनी मधुराद्वैत दर्शनाचा पुरस्कार केला. सांख्य-योगादी षड्दर्शने परस्परविरोधी नसून पूरक आहेत, असे त्यांनी वेळोवेळी सांगितले. ‘भारतातील नानाविध धार्मिक संप्रदाय, हिंदू, बौद्ध, जैनादी भारतीय धर्म, आणि ख्रिस्ती, मुसलमानादी सर्व अभारतीय धर्म, वैदिक धर्माच्याच एकेका अंशावर स्थित आहेत’ अस एक वेगळाच पण महत्वाचा  विचार ते मांडत असत. डार्विनचा उत्क्रांतिवाद, स्पेन्सरचे तत्त्वज्ञान इ. पाश्चात्त्य विचारसरणी त्यांना मान्य नव्हती. 

आर्य हा वंश असून तो बाहेरून भारतात आला, हे मॅक्समुल्लरचे व लोकमान्य टिळकांचे मत गुलाबराव महाराजांना मान्य नव्हते. प्राचीन ग्रंथांतील गणित, रेडियम, ध्वनी, ईथर, इलेक्ट्रॉन्स, उष्णता-गति-प्रकाश, विमानविद्या, अणुविज्ञान वगैरेंचे अनेक मौलिक संदर्भ त्यांनी दाखविले. वेदान्त, उपनिषदे, आत्मज्ञान, प्राचीन संत साहित्य, ध्यान-योग-मधुराभक्ती, आयुर्वेद, डार्विन-स्पेन्सर आदी शास्त्रज्ञांचे सिद्धान्त – हे त्यांच्या अभ्यासाचे, चिंतनाचे व लेखनाचे विषय होत.

त्यांना जेमतेम फक्त चौतीस वर्षांचे आयुष्य लाभले होते, पण या अल्प काळात आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत, शंकराचार्य, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व रामदास या संतांच्या ग्रंथांचे सार एकत्रित करून त्यांनी तब्बल १३४ ग्रंथ लिहिले ही एक अपवादात्मक गोष्टच म्हटली जाते. मराठी, हिंदी व संस्कृत भाषेवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते, आणि या तिन्ही भाषांमध्ये मिळून त्यांनी काव्यशास्त्र, आयुर्वेद, संगीत इत्यादी अनेक विषयांवर लेखन केले. सूत्रग्रंथ, भाष्य, प्रकरण, निबंध, प्रश्नोत्तरे, पत्रे, आत्मचरित्र, आख्याने, नाटक, लोकगीते, स्तोत्रे, व्याकरण, कोश वगैरे अनेक वाङ्‌मयप्रकार हाताळत त्यांनी २७,००० ओव्या, २,५०० अभंग, २,५०० पदे, ३,००० श्लोक अशा अनेक रचना केल्या . ‘मधुराद्वैत’ (मधुरा भक्ती व अद्वैत विचार यांचा समन्वय) हा नवा विचार त्यांनी भक्तांना दिला.

आठव्या महिन्यातच आजाराने डोळे गेले म्हणून आंधळेपणा आलेला. अशा स्थितीत महाराजांनी सर्व ज्ञान कसे प्राप्त केले, हा प्रश्‍न सामान्य माणसाला निश्‍चित पडतो. इंग्रजीतील आधुनिक विज्ञानावरचे, धर्म आणि अध्यात्म शास्त्र, संस्कृतातील गायनशास्त्रावरचे, वैद्यक शास्त्रावरचे, विविध कला विषयांचे, वेद-उपनिषदांसह सर्व ग्रंथांचे वाचन त्यांनी वयाच्या १२ ते १६ वर्षांच्या काळातच करून घेतले. प्रपंच किंवा परमार्थ यातला एकही विषय राहिला नाही की ज्यावर गुलाबराव महाराजांनी आपले स्वतंत्र विचार प्रगट केले नाहीत. 

 मधुराद्वैताचार्य प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज एकदा मुंबईच्या प्रसिद्ध एशियाटिक सोसायटीच्या लायब्ररीत गेले. ग्रंथालयात विशिष्ट विषयांवरील कुठले ग्रंथ आहेत, याबाबत त्यांनी ग्रंथपालांना विचारणा केली. ग्रंथपाल महाराजांना ओळखत नव्हता. एक अंध व्यक्ती ग्रंथांची विचारपूस करते म्हणून त्या सर्वच लोकांना कुतूहल वाटले. ग्रंथपालाच्या सहकाऱ्याने महाराजांना ग्रंथांची नावे सांगणे सुरू केले. बहुतांश ग्रंथ महाराजांना माहीत होते. या ग्रंथांचा क्रम कसा लावावयास हवा, हे महाराज त्या-त्या ग्रंथातील सारांशाच्या आधारे त्या ग्रंथालयकर्मीला सांगत होते. ग्रंथपाल व आजूबाजूचे लोक महाराजांचे ज्ञान पाहून थक्क झाले. चौकशीअंती त्यांना समजले की अत्यंत सामान्य दिसणारी ही अंध व्यक्ती म्हणजे मधुराद्वैताचार्य प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज आहेत…

गुलामगिरीच्या काळात सुशिक्षित भारतीयांना पाश्‍चात्त्य विचारांनी जखडले होते. भारतातील शास्त्रे, कला, साहित्य, जीवनपद्धती अशा सर्वच बाबी अशा लोकांना अर्थहीन वाटत होत्या. भारतीय संस्कृतीविषयी त्यांच्यात न्यूनगंड निर्माण झाला होता. याच काळात पाश्‍चात्त्य विचारसरणीतील उथळपणा आणि भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व केवळ बुद्धिवादाच्या आधारे विचारवंतांना पटवून देण्याचे आत्यंतिक मोलाचे कार्य गुलाबराव महाराजांनी केले.

मानभाव मत, डार्विन मत, स्पेन्सर, मायर्स यांच्या मतांवर आणि ग्रंथांवर महाराजांनी समीक्षा केली. जगदीशचंद्र बोसांच्या ग्रंथांची समीक्षा केली. मराठी, हिंदी, ब्रज, संस्कृत भाषेत लेखन केले. काव्य, योग, संगीत, धर्म, सांख्यशास्त्र, वेदान्त, छंदशास्त्र असे सर्व विषय हाताळले. हे अगाध ज्ञान महाराजांनी केव्हा व कसे प्राप्‍त केले असेल हा विषय आजही आपल्या विचारक्षमतेच्या बाहेरचाच आहे. महाराज जवळच्या लोकांकडून पुस्तके वाचून घेत असत. अगाध स्मरणशक्तीच्या आधारे एकदा ऐकताच त्यांच्या स्मरणात राहत असे. त्यांच्यासाठी पुस्तक वाचणारा कधीच रिकाम्या हाताने परत गेला नाही. प्रत्येकाला दक्षिणा द्यायचे……  ज्वारी, गहू, हातातील चांदीचे कडे, घरातील मौल्यवान वस्तू…. महाराजांनी आपल्या आयुष्यात केवळ ज्ञानलालसेचा, अर्थातच ग्रंथांचा आणि पुस्तकांचा मोह बाळगला. !. जवळच्या मंडळींकडे त्यांनी कशाचा आग्रह धरला असेल तर तो म्हणजे फक्त पुस्तकांचा. गुलाबराव महाराजांनी दोन हजारहून अधिक ग्रंथ जवळ बाळगले. पुस्तकांच्या पेट्या डोक्यावर घेऊन कितीही मैलांचा प्रवास ते पती-पत्‍नी करीत.. ती दुर्मिळ अशी ग्रंथसंपदा आजही अमरावतीत सुरक्षित आहे.

छोट्या-मोठ्या प्रतिकूलतेमुळे आत्महत्येचा विचार मनात आणणाऱ्या तरुणांसाठी गुलाबराव महाराजांचे जीवन आणि त्यांची ग्रंथसंपदा अत्यंत प्रेरणादायी आहे. डॉ. राम पंडित यांनी पुढाकार घेऊन स्कंददास स्मारक न्यास व पंचलतिका ग्रंथ न्यास या प्रकाशन संस्था स्थापन करून सातत्याने गुलाबराव महाराजांचे ग्रंथ प्रकाशित केले. महाराजांच्या अनेक ग्रंथांचे त्यांनी हिंदी भाषेत अनुवाद करून प्रकाशन केले..

गुलाबराव महाराजांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तके अशी —-

—अलौकिक व्याख्याने (इ.स. १९१२)

—धर्म समन्वय

—प्रेमनिकुंज (इ.स. १९१८)

—योगप्रभाव

—संप्रदाय सुरतरु (इ.स. १९१९)

—-साधुबोध (इ.स. १९१५)

गुलाबराव महाराज यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके – 

प्रज्ञाचक्षू दीपस्तंभ (बाळ राणे) / संत गुलाबराव महाराज (सुनीति आफळे) / संत श्री गुलाबराव महाराज (प्रा. विजय यंगलवार) / ज्ञानेश्वर कन्या-गुलाबराव महाराज (चरित्र, डॉ. सच्चिदानंद शेवडे) / आणि अगदी अलीकडे त्यांच्या भक्ती-संकल्पनेवर शुभदा मुळे यांनी लिहिलेले “ पंचलतिका  “ हे पुस्तक.   

महाराजांच्या ग्रंथसंपदेचे जतन करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या डॉ. राम पंडित यांच्या कवितेच्या पुढील ओळी यासाठीच फार समर्पक वाटतात——

एक चक्षुहीन अनेक चक्षुहीन लोकांना चक्षु देऊन चक्षुंच्या पलीकडे गेला……

नंतर कळले तो तर चक्षुहीन नव्हता……. 

खरे म्हणजे मोठ्या डोळ्याचे, साक्षर, आम्हीच आंधळे होतो…… 

आता आमच्यासारख्यांचे डोळे त्या चक्षुहीनाची वाट बघतात……. 

त्यांच्या मार्गाने जाताजाता आम्ही पडतो, उठतो, परत चालतो… काय करावे… आम्हीच तर आंधळे!

आमच्या नेत्रात अश्रू आहेत …. नजर कदाचित धोका खाईल, पण हृदय नव्हे….. 

गीता, वेद, पुराणांच्याप्रमाणे त्यांच्या त्या वाक्यावर आमचा अटळ विश्‍वास आहे जे त्यांनी आपले जीर्ण वस्त्र त्यागताना उच्चारले ….; 

माझे ग्रंथ सांभाळून ठेवा, मी पुन्हा येईन’.… होळीनंतर…

गुलाबराव स्वतःला संत ज्ञानेश्वरांची मुलगी , आणि कृष्णाची पत्नी मानत असत, आणि काही स्त्रीचिन्हेही धारण करत असत. महाराजांच्या नंतर त्यांचा संप्रदाय बाबाजी महाराज पंडित यांनी इ.स. १९६४ पर्यंत चालविला. खरे तर या अलौकिक संतांवर जितके लिहावे तितके कमीच आहे. 

त्यांच्या आजच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना भक्तिपूर्वक शतशः वंदन.🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments