श्री सुहास रघुनाथ पंडित

? २१ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

शंकर नारायण तथा शं. ना. नवरे.

आपल्या लेखनातून मध्यमवर्गीय जीवनाचे दर्शन घडवणारे लेखक शं. ना. नवरे यांचा आज जन्मदिन. (1927). कथा, पटकथा, कादंबरी, नाटक, स्तंभलेखन एकांकिका, व्यक्तीचित्रण, आठवणी, विनोदी असे सर्व प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले आहे. याबरोबरच नाट्य क्षेत्रातील रंगकर्मींना आर्थिक मदत करून सामाजिक कार्यातही आपला वाटा उचलला आहे. डोंबिवली येथे

2003 मध्ये भरलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

त्यांची काही साहित्यसंपदा:

कथासंग्रह– अनावर, इंद्रायणी, एकमेक, कस्तुरी, कोवळी वर्षे, खलिफ जत्रा, तिळा दार उघड, परिमिता, बिलोरी, सखी इ.

कादंबरी– अट्टाहास, आनंदाचे झाड, कौल, दिनमान, दिवसेंदिवस, सुरूंग इ.

पटकथा– कळत नकळत, कैवारी, घरकुल, तू तिथं मी, निवडुंग, बाजीरावाचा बेटा.

नाटक– खेळीमेळी, गहिरे रंग, गुंतता ह्रदय हे, गुलाम, देवदास, दोघांमधले अंतर, धुक्यात हरवली वाट, मन पाखरू पाखरू, सूर राहू दे  इ.

प्राप्त पुरस्कार– पु. भा. भावे पुरस्कार, सु. ल. गद्रे मातोश्री पुरस्कार, नाट्यभूषण पुरस्कार, अ. भा. नाट्य परिषदेचा गडकरी पुरस्कार, मराठी साहित्य परिषदेचा कमलाकर सारंग पुरस्कार, लो. टिळक पुरस्कार, वि. वा. शिरवाडकर, गदिमा, प्रज्ञागौरव पुरस्कार आणि विष्णूदास भावे पुरस्कार.

प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या या चतुरस्त्र लेखकाचे  25/09/2013 ला दुःखद निधन झाले. ?

☆☆☆☆☆

राजन गवस 

अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, जातीयता, देवदासी, दारिद्र्य अशा सामाजिक प्रश्नांना आपल्या साहित्यातून समाजासमोर हिरहिरीने मांडणारे डॉडा. राजन गवस यांचा आज जन्मदिवस. (1959).

कथा, कविता, ललित, समीक्षा, संपादन असे त्यांचे विपुल लेखन आहे. भाऊ पाध्ये यांच्या साहित्यावर त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. गवस यांचे साहित्य कन्नड, गुजराथी, असामिया, हिंदी, इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. त्यांनी देवदासी निर्मुलन चळवळीत महत्वाचे योगदान दिले आहे.

श्री. गवस  यांच्या साहित्याचा विचार करताना प्रामुख्याने चौंडक, भंडारभोग, धिंगाणा, तणकट आणि ब–बळीचा या पुस्तकांचा उल्लेख करावा लागेल. तणकट या त्यांच्या कादंबरी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

याशिवाय हुंदका हा कवितासंग्रह, आपण माणसांत जमा नाही हा कथासंग्रह, काचाकवड्या, कैफियत, लोकल ते ग्लोबल ही पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. समीक्षा व संपादित साहित्याचे दहा ग्रंथ व इंग्रजीतील लेखनही त्यांनी केले आहे. या साहित्य सेवेचा विविध पुरस्कारांनी गौरव केला आहे.

त्यातील काही पुरस्कार. . . .

ह. ना. आपटे राज्य पुरस्कार 1985, वि. स. खांडेकर पुरस्कार 1989, भंडारभोग कादंबरीस संस्कृती प्रतिष्ठान, दिल्ली चा संस्कृती पुरस्कार1992 व राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरी लेखन पुरस्कार 1994, भैरूरतन दामाणी पुरस्कार 1999, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार 2000 व वर उल्लेख केल्याप्रमाणे तणकट या कादंबरीस 2001 चा साहित्य अकादमी पुरस्कार!

अशा या दमदार साहित्ययात्रीस त्यांच्या जन्मदिनी पुढील लेखनासाठी शुभेच्छा. ?

☆☆☆☆☆

चारूता  सागर

दिनकर दत्तात्रय भोसले यांना आपण ओळखतो का? दि. द. भोसले म्हणजेच आपले कथाकार  चारूता सागर! आज त्यांचा जन्मदिवस. (1930).

प्राथमिक शिक्षक म्हणून दीर्घकाळ सेवा केली असली तरी त्यांनी लष्करात ही सेवा बजावली होती.  तरूण वयात बिहार, बंगाल अशा दूरच्या प्रांताची भ्रमंती केली. शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या साहित्याने प्रभावित झाले. त्यांच्याच एका कादंबरीतील पात्राचे नाव त्यांना खूप आवडले व तेच नाव ‘चारूता सागर’ त्यांनी स्वतःच्या लेखनासाठी वापरले. धोंडू बुवा किर्तनकार या नावाने ते काही काळ किर्तनही करत असत.

चारूता सागर यांच्या काही कथा कन्नड भाषेत भाषांतरीत झाल्या आहेत. ‘दर्शन’या त्यांच्या कथेवर आधारीत ‘जोगवा’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. नदीपार, नागीण, मामाचा वाडा हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘नागीण’या कथासंग्रहास 1971 चा कॅ. गो. ग. लिमये पुरस्कार प्राप्त झाला आहे. 1977 ला सर्वोत्कृष्ट लघुकथाकार म्हणून ते सन्मानित झाले आहेत.

सांगली जिल्ह्यातील मळणगाव हे त्यांचे मूळ गाव. त्यांच्या मृत्यूनंतर (2011) येथे दरवर्षी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ ग्रामीण साहित्य संमेलन भरवले जाते. ?

☆☆☆☆☆

मंजुश्री गोखले  

लघुकथा, कादंबरी, कविता, पाककला, प्रवासवर्णन असे विविध विषय हाताळणा-या मंजुश्री गोखले यांचा आज जन्मदिवस. त्या प्रथम इचलकरंजीच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या. नंतर कोल्हापूर येथील महाराष्ट्र महाविद्यालातून उपप्राचार्य या पदावरून निवृत्त झाल्या. त्यांचे काही साहित्य असे:

कथा– ओंजळीतले मोती, स्वस्तिकाची फुले, बुफे आणि फेफे.

कादंबरी– ओंकाराची रेख जना, जोहार मायबाप जोहार, तुक्याची आवली, ज्ञानसूर्याची सावली.

रहस्यकथा– अग्निलाघव, अधाराच्या सावल्या.

अध्यात्मिक– अमृतसंदेश महात्म्य

कविता– रानगंध, शिशिरसांज.

पाककला– फास्ट-ब्रेकफास्ट

प्रवासवर्णन–  रंगपश्चिमा

चारोळीसंग्रह– आकृतीगंध, फुलपाखरांचा गाव

प्राप्त पुरस्कार:-

‘जोहार मायबाप जोहार ‘ला वरणगावकर स्मृती पुरस्कार

‘तुक्याची आवली’ ला तुका म्हणे पुरस्कार व प्रतिभा पाटील पुरस्कार.

वाचनवेध पुरस्कार.

त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ?

☆☆☆☆☆

चिं. वि. जोशी आणि शरदचंद्र मुक्तिबोध यांचा आज स्मृतीदिन.

चिंतामणी विनायक जोशी हे चिं.  वि. जोशी या नावाने विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा पाली भाषेचाही चांगला अभ्यास होता. बडोदा येथील महाविद्यालयात ते प्राध्यापक होते.

त्यांचे विनोदी साहित्य—-

आणखी चिमणराव, चिमणचारा, चिमणरावांचे, च-हाट, आमचा पण गाव, एरंडाचे गु-हाळ, ओसाडवाडीचे देव, घरबसे पळपुटे, वायफळाचा मळा इ.

त्यांच्या एका कथेवर ‘सरकारी पाहुणे’हा मराठी चित्रपट 1942 ला चित्रित झाला होता. तसेच मुंबई दूरदर्शनवरील गाजलेली  ‘चिमणराव गुंड्याभाऊ’ ही मालिकाही त्यांच्या साहित्यावर आधारीत होती.

21/11/1963 ला त्यांचे निधन झाले. त्यांचे स्मृतीस वंदन. ?

☆☆☆☆☆

शरदचंद्र मुक्तिबोध 

मार्क्सवादाचा प्रभाव असणारे आणि सामाजिक दृष्टी लाभलेले नागपूर येथील शरदचंद्र मुक्तिबोध यांचे निधन 21/11/1984 ला झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठात एम्. ए.  व एल. एल्. बी. केले . शिक्षक व वकिली  व्यवसाय केला. नंतर राज्य शासनाच्या भाषा संचालनालयाचे उपसंचालक म्हणून काम केले. त्यानंतर नागपूर महाविद्यालयात प्राध्यापक पदावरून निवृत्त झाले.

नव्या जाणीवा व्यक्त करण्याचा ध्यास हे त्यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या कविताही आशावादी असत.

जन हे वोळतू जेथे, सरहद्द, क्षिप्रा या त्यांच्या कादंब-या. नवी मळवाट, सत्याची जात, यात्रिक, हे त्यांचे कविता संग्रह. सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य या त्यांच्या समीक्षा ग्रंथास 1979चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे.

त्यांच्या स्मृतीस अभिवादन! ?

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ:   विकीपीडिया, मराठी विश्वकोश, मराठी सृष्टी, बाइटस्ऑफइंडिया

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments