सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २२ एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
लक्ष्मण बळवंत भोपटकर
लक्ष्मण बळवंत ऊर्फ आप्पासाहेब भोपटकर (1880 – 24 एप्रिल 1960) हे पत्रकार, हिंदुत्ववादी राजकारणी वं वकील होते. ते केसरी वृत्तपत्राचे संपादक, महाराष्ट्र मंडळ शिक्षण संस्थेचे संस्थापक, हिंदू महासभेचे अध्यक्ष, एवढेच नव्हे, तर व्यायामशास्त्रतज्ज्ञही होते.
ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वकील होते.गांधी खून खटल्यातील सर्व आरोपींचे खटले त्यांनी एक पैसाही न घेता चालवले.
स्वातंत्र्यलढ्याच्या काळात 6 एप्रिल 1930 रोजी त्यांनी सोलापूर नगरपरिषदेवर राष्ट्रीय झेंडा फडकवला.1937च्या हैद्राबाद सत्याग्रहात ते सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांना तुरुंगावास भोगावा लागला.
त्यांनी विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. ‘ऐतिहासिक कथापंचक’, ‘नवरत्नांचा हार’आदी ऐतिहासिक पुस्तके, ‘कुस्ती’, ‘माझी व्यायाम पद्धती’, ‘स्त्रियांचे व्यायाम’ इत्यादी व्यायामविषयक पुस्तके, ‘काँग्रेस व कायदेमंडळ’, ‘स्वराज्याची मीमांसा’, ‘हिंदू समाज दर्शन’ इत्यादी राजकीय व सामाजिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
‘केसरी प्रबोध’, ‘केळकर’, ‘पुणे सार्वजनिक सभा ज्युबिली अंक वगैरेचे त्यांनी संपादन केले.
☆☆☆☆☆
रघुनाथ पांडुरंग करंदीकर
रघुनाथ पांडुरंग करंदीकर (21 ऑगस्ट 1857 – 24 एप्रिल 1935) हे पेशाने वकील होते. ते मराठी भाषेतील पत्रांच्या व दैनंदिनींच्या संग्रहासाठी प्रसिद्ध होते. ते मराठी भाषा व संस्कृती यांचे कडवे अभिमानी होते.
ते जेथे जात, तेथून ऐतिहासिक साधने गोळा करून आणीत.1918मध्ये ते इंग्लंडला गेले. तेथून त्यांनी सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचा भारताच्या रेसिडेन्टबरोबर झालेला पत्रव्यवहार नकलून आणला. मेणवली येथील नाना फडणवीस यांचे दप्तर त्यांच्या वंशजांकडून मिळवून त्यांनी ते दत्तात्रय बळवंत पारसनीस यांच्याकरवी प्रसिद्ध करविले.
त्यांची पुस्तके :केदारखंड -यात्रा हे 1936मधील पत्ररूपी प्रवासवर्णन. विलायतेहून धाडलेली पत्रे. र. पां. करंदीकर यांची दैनंदिनी.
ते 1905 साली साताऱ्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
☆☆☆☆☆
पुरुषोत्तम नारायण फडके
पुरुषोत्तम नारायण फडके ऊर्फ फडकेशास्त्री (1 मे 1915 – 24 एप्रिल 2015) हे रत्नागिरीतील संस्कृतचे गाढे अभ्यासक होते.
फडकेंनी अत्यंत कठीण अशा परीक्षा उत्तीर्ण करून पुण्याच्या वेदशास्त्रोत्तेजक सभेची व्याकरण चूडामणी व काशीच्या संस्कृत विद्यापीठाची व्याकरणाचार्य अशा दोन पदव्या मिळवल्या. त्याशिवाय बडोदे व म्हैसूर संस्थांनाच्या व्याकरण परीक्षेत त्यांनी उच्च श्रेणी मिळवली.
फडकेशास्त्रींनी संस्कृत व प्राकृत (अर्धमागधी) या भाषांचे अध्यापन केले. पुढे संस्कृतपाठशाळेत प्रधानाध्यापकपदही भूषवले.
निवृत्तीनंतर त्यांनी आचरणास अत्यंत कठीण असे गायत्रीपुरश्चरण केले. रत्नागिरीसह अनेक ठिकाणी त्यांनी स्वाहाकार, वेदांचे घनपाठ, याग व होम पार पाडले.
फडकेशास्त्रींनी विविध विषयांवर दहा हजारांहून अधिक व्याख्याने दिली. सुबोध उपनिषत्सार आणि सुबोध योगवासिष्ठसार या प्रमुख ग्रंथांसह सहा पुस्तके त्यांनी लिहिली.
फडकेशास्त्रींनी शिक्षक कल्याण निधी, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी, रत्नागिरी संचय सहकारी सोसायटी अशा संस्था स्थापन करून त्यांना पुढील काळात स्थैर्य प्राप्त करून दिले.
शंभर वर्षे पुरी व्हायला फक्त सात दिवस बाकी असताना त्यांचे देहावसान झाले.
लक्ष्मण बळवंत भोपटकर, रघुनाथ पांडुरंग करंदीकर व पुरुषोत्तम नारायण फडके यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त सादर अभिवादन. 🙏
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈