सौ. गौरी गाडेकर
२२ फेब्रुवारी – संपादकीय
विनायक सदाशिव वाळिंबे (वि. स. वाळिंबे) (11ऑगस्ट 1928 – 22 फेब्रुवारी 2000)
वि. स. वाळिंबे या लेखक व पत्रकारांचे शिक्षण पुण्यात झाले. इ. स.1948साली गांधीहत्येनंतर रा. स्व. संघावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधातील सत्याग्रहात सहभागी झाल्यामुळे त्यांना तीन महिने येरवडा कारागृहात ठेवण्यात आले. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला.
1962-63मध्ये ते ‘केसरी’ वृत्तपत्रात वृत्तसंपादक म्हणून काम करू लागले. पत्रकारितेच्या प्रशिक्षणासाठी ते कार्डिफ येथे गेले होते.
त्यांनी विशेषकरून ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. ‘1857ची संग्रामगाथा’, ‘गरुडझेप’, ‘मध्यरात्रीचा स्वातंत्र्यसूर्य ‘, ‘वॉर्सा ते हिरोशिमा ‘, ‘व्होल्गा जेव्हा लाल होते ‘, ‘श्री शिवराय ‘, ‘सावरकर’, ‘हिटलर’ यासारख्या अनेक ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.
त्याचप्रमाणे ‘अरुण शोरी : निवडक लेख’, ‘इंदिराजी ‘, ‘इन जेल’, ‘भारत विकणे आहे ‘वगैरे बऱ्याच पुस्तकांचे मराठीत अनुवाद केले.
इतिहास वा तो घडवणारी माणसे यांचे त्यांना आकर्षण होते. तीच त्यांची प्रेरणा होती. इतिहासाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण असूनही त्यांचे लिखाण क्लिष्ट, कोरडे झाले नाही की इतिहासाला जिवंत करण्याच्या नादात भावाविवशही झालं नाही.
अभ्यास आणि कष्ट करून त्यांनी निवडून -पारखून घेतलेला तपशील, ते वाचनीयता व रसवत्ता राखून उत्तम रीतीने मांडत असत.
त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या साहित्यामध्ये ‘उमदा लेखक, उमदा माणूस ‘ या अरुणा ढेरे संपादित लेखसंग्रहाचा समावेश आहे.
ओघवत्या वा चित्रदर्शी निवेदनशैलीने ऐतिहासिक लेखन करणाऱ्या वि. स.वाळिंबेंना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त ई -अभिव्यक्ती परिवाराकडून नम्र आदरांजली. ????
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : शिक्षण मंडळ कऱ्हाड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈