श्रीमती उज्ज्वला केळकर
२२ फेब्रुवारी – संपादकीय
लक्ष्मणराव देशपांडे
लक्ष्मणराव देशपांडे मराठीतील एक बहुरंगी, बहुआयामी लेखक, नाटककार. नाट्यदिग्दर्शक व अभिनेते होते. त्यांनी लिहिलेया, दिग्दर्शित केलेल्या आणि सादर केलेल्या ‘वर्हाड चाललंय लंडनला’ या त्यांच्या एकपात्री प्रयोगासाठी त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डमधे नोंदवलं गेलं आहे. त्यांचा जन्म ५ डिसेंबर१९४३ मधला. लहानपणी गणेशोत्सवात होणार्या मेळ्यातून ते काम करायचे. इथेच त्यांच्या कलावंताची जडण-घडण झाली. घराची प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी एम.ए. एम.एड. (मास्टर ऑफ ड्रॅमॅटिक्स) ही पदवी घेतली. मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विद्यापीठात काम केले. १९८०च्या सुमाराला ते या विभागाचे प्रमुख झाले. याच दरम्यान त्यांनी ‘वर्हाड चाललंय लंडनला’ ची निर्मिती केली.या नाटकाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. हजारांच्या संख्येने लोक कार्यक्रमाला उपस्थित रहात. या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी १९७९ मधे केला. तेव्हापासून या नाटकाचे १९६०पेक्षा जास्त प्रयोग झाले आहेत. ३ तासाच्या या एकपात्री नाटकात ते ५२ रुपे सादर करत. त्यामुळे लोक त्यांना वर्हाडकर म्हणू लागले. त्यांच्या या एकपात्री नाटकाचे प्रयोग अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, मस्कत, ऑस्ट्रेलिया, कतार, कुवेत, सिंगापूर, थायलंड, नायजेरिया इ. ठिकाणी झाले.
त्यांनी ‘रेशीमगाठी’ आंणि ‘पैंजण’ या चित्रपटातूनही कामे केली. पर्भणी इथे झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.
लक्ष्मणराव देशपांडे यांचे प्रकाशित साहित्य –
- ‘वर्हाड चाललंय लंडनला’ या नाटकाचे पुस्तक निघाले.
- प्रतिकार हे एकांकिकांचे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले.
- मौलाना आझाद – पुंनर्मूल्यांकन याचे त्यांनी संपादन केले.
- महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘अक्षरनाद’चे त्यांनी संपादन केले.
लक्ष्मणराव देशपांडे यांना मिळालेले पुरस्कार
- महाराष्ट्र शासनाचा कलावंत पुरस्कार
- .विष्णुदास भावे पुरस्कार
- अखिल भरातीय नाट्यपरिषदेतर्फे साहित्यसम्राट आचार्य अत्रे पुरस्कार
आज त्यांचा स्मृतीदिन (२२ फेब्रुवारी २००९) . या निमित्त त्यांच्या बहुरंगी प्रतिभेला मानाचा मुजरा.
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈