श्रीमती उज्ज्वला केळकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २४ मार्च -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी)
श्री.ना. पेंडसे
श्रीपाद नारायण पेंडसे यंचा जन्म ५ जानेवारी १९१३चा. मराठीतील श्रेष्ठ कथालेखक व कादंबरीकार म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांचा जन्म रत्नागिरीतील मोर्डी गावचा. १९३४ मध्ये ते मुंबईला स्थायिक झाले. वयाच्या ११ वर्षापर्यंत जे कोकण त्यांनी पाहीलं, अनुभवलं ते त्यांनी आयुष्यभर आपल्या कथा-कादंबर्या१तून मांडले. तो निसर्ग, तो परिसर त्यांच्या भावविश्वाचा भाग होता. त्यांना खाजगीत आणि नंतर व्यवहारातसुद्धा शिरूभाऊ म्हणत.
मुंबईच्या बेस्ट कंपनीत त्यांनी नोकरी केली. १९७२मध्ये ‘बेस्ट उपक्रमाची कथा’ हे पुस्तक त्यांनी लिहिले.
आपल्या कादंबर्याकतून त्यांनी कोकणातील विश्व आणि तेथील लोकजीवन यांचे प्राधान्याने वर्णन केले, पण पुढे महानगरीय अनुभवही तितक्याच ताकदीने व्यक्त केले.
त्यावेळी मराठी कादंबरी फडके, खांडेकर, यांच्या प्रभावाखाली होती, तेव्हा पेंडसे यांनी एक नवी वाट चोखाळली. मराठी प्रादेशिक कादंबरीची नवी शाखा निर्माण केली. कादंबरी, कथा, नाटक, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र आशा विविध प्रकारात त्यांनी लेखन केले. पण कादंबरीकार म्हणून ते अधीक मान्यता पावले.
‘जीवनकला’ ही त्यांची पहिली कादंबरी १९३८मध्ये प्रकाशित झाली. ‘जुम्मन’ हा कथासंग्रह १९६६मध्ये प्रकाशित झाला. हा त्यांचा एकमेव कथासंग्रह. ‘खडकातील हिरवळ’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे.
एल्गार ही त्यांची कादंबरी१९४९ साली प्रकाशित झाली. त्यानंतर हद्दपार व पुढे गारंबीचा बापू या कादंबर्यार प्रकाशित झाल्या आणि प्रादेशिक कादंबरीकार म्हणून पेंडसे यांना मराठीत वेगळे स्थान मिळाले. या ३ कादंबर्या् डोळ्यापुढे ठेवून गंगाधर गाडगीळ यांनी ‘हर्णैचा दीपस्तंभ ‘ हा लेख लिहून पेंडसे यांचे कादंबरीकार म्हणून मूल्यमापन केले. सातत्य आणि प्रयोगशीलता हे पेंडसे यांच्या कादंबरीचे वैशिष्ट्य. १९८८मध्ये त्यांची ‘तुंबडाचे खोत’ ही १३५८ पृष्ठांची द्विखंडात्मक कादंबरी प्रकाशित झाली.
कादंबरी लेखनासोबत त्यांनी नाट्यलेखनही केले. त्यांनी ११ नाटके लिहिली. त्यातील राजे मास्तर, यशोदा, गरांबीचा बापू, असं झालं आणि उजाडलं, रथचक्र ही त्यांच्या कादंबर्यां वर आधारलेली नाटके. महापूर, संभूसच्या चाळीत, चक्रव्यूह, शोनार बंगला, पंडीत आता तरी शहाणे व्हा, ही वेगळ्या पिढीतील नाटके. सहज, सुंदर, प्रभावी संवाद, एखाद्या समस्येच्या खोल मुळाशी जाणं हे त्यांच्या नाट्यलेखनाचे विशेष.
– श्री.ना. पेंडसे यांच्या कादंबर्यास
एल्गार, हद्दपार गारंबीचा बापू, हत्या, यशोदा, कलंदर, , लव्हाळी, आकांत, तुंबडाचे खोत, रथचक्र एक होती आजी, कामेरू, घागर रिकामी रे , लो. टिळकांच्या जीवनावरची ‘हाक आभाळाची’
– श्री.ना. पेंडसे यांना मिळालेले पुरस्कार
१. हद्दपार, हत्या, कलंदर, संभूसच्या चाळीत, चक्रव्यूह, यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.
२. रथचक्रला साहित्य अॅंकॅदमी पुरस्कार
३. प्रियदर्शनी पुरस्कार
४. महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार
५. लाभसेटवार साहित्य सन्मान
६ .कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार
श्री.ना. पेंडसे यांचे अन्य भाषेत अनुवादीत झालेले साहित्य
गुजराती – हद्दपार, गारंबीचा बापू, हत्या, कलंदर, रथचक्र
हिन्दी – गारंबीचा बापू, रथचक्र
तेलगू – जुम्मन, रामशरणची गोष्ट
इंग्रजी – गारंबीचा बापू
या महान प्रतिभावंताचा आज स्मृतिदिन (२४ मार्च २००७ ) त्या निमित्त या महान प्रतिभवंत लेखकाला शतश: दंडवत.
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
किती साली लाभसेटवार पुरस्कार मिळाला श्री ना पेंडसे ह्यांना