श्रीमती उज्ज्वला केळकर
२५ फेब्रुवारी – संपादकीय
स्त्रीया जेव्हा लिहू लागल्या, तेव्हा सुरुवातीच्या आघाडीच्या फळीतील लेखिका म्हणजे गिरिजाबाई केळकर. त्या पहिल्या स्त्री नाटककार. त्यांचा जन्म १८८६ चा. त्या पूर्वाश्रमीच्या द्रौपदी श्रीनिवास बर्वे. वडील गुजरातमध्ये स्थायिक असल्याने त्यांचे ५ वी पर्यंतचे शिक्षण गुजराथीत झाले. ६वीत बर्टन फिमेल ट्रेनिंग कॉलेजच्या शाळेत त्या गेल्या. लहानपणी शेजारच्या आजीबाईंना हरीविजय, रमविजय, पांडव प्रताप, या पोथ्या त्या वाचून दाखवत.
१५ व्या वर्षी लग्न झाल्यावर गिरिजाबाई पुण्यात आल्या. वाचनाच्या आवडीतून त्यांनी उत्तम भाषा अवगत केली. दर शुक्रवारी हळदी कुंकवाच्या निमित्ताने त्या आसपासच्या स्त्रियांना घरी बोलवत आणि वाचायला शिकवत. मासिके, वर्तमानपत्रे वाचून दाखवत. ‘केसरी’ त्या नियमित वाचत. नंतर त्यांनी लेखनाला सुरुवात केली. एक लेख ‘ज्ञानप्रकाश’ला पाठवला. तो छापून आल्यावर त्यांनी नियमित लेखन केले. ‘‘ज्ञानप्रकाश’ आणि ‘आनंद’ मध्ये त्यांचे लेख छापून येत. ‘ज्ञानप्रकाश’ मधील लेखांचे ‘गृहिणी भूषण’ नावाचे पुस्तक पुढे प्रकाशित झाले. त्याला वा. गो. आपटे यांची प्रस्तावना आहे.
त्यांनी ‘पुरूषांचे बंड’ नावाचे नाटक लिहिले. खाडीलकरांनी लिहिलेल्या ‘बायकांचे बंड’ या नाटकाला सडेतोड उत्तर म्हणून त्यांनी हे नाटक लिहिले. य. ना. टिपणीस यांनी हे नाटक रंगभूमीवर आणले. १९१३ साली हे पुस्तक प्रकाशित झाले.
गिरिजाबाई यांची प्रकाशित पुस्तके – १. मांदोदरी, २.राजकुंवर, ३.हीच मुलीची आई, ४.वरपरीक्षा, ५. सावित्री. ६. आयेषा ही सर्व नाटके आहेत. ‘गृहिणी भूषण’ हा २ भागातला लेखसंग्रह आहे. द्रौपदीची थाळी हे आत्मचरित्र, तर संसारसोपान हे वैचारिक पुस्तक आहे. तसेच स्त्रियांचा वर्ग हे अनुवादीत पुस्तक आहे. स्त्रियानु वर्ग या गुजराती पुस्तकाचा हा अनुवाद आहे.
१९२८मधे मुंबईत भरलेल्या २३ व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. आज त्यांचा स्मृतिदिन ( २५ फेब्रु. ८० ). त्यांच्या साहित्यिक – नाट्य विषयक कार्याला शतश: प्रणाम ?
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈