श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २६ ऑगस्ट – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर
कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे मूळचे सांगलीचे. मराठीतील प्रख्यात पत्रकार व नाटककार. त्यांनी तत्वज्ञान या विषयात बी.ए. करून नंतर कायद्याची पदवीही प्राप्त केली. सांगली येथील सांगली हायस्कूल मध्ये त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली. ‘विविधज्ञान विस्तार’ मधून त्यांचे लिखाण प्रसिद्ध होऊ लागले. त्या निमित्ताने त्यांचा लोकमान्य टिळकांशी संबंध आला व ते ‘केसरी’ परिवाराशी जोडले गेले. 1897 मध्ये ते केसरीत दाखल झाले. लोकमान्यांच्या जहाल राजकीय भूमिकेचे ते आपल्या लेखनातून समर्थन करत असत. लोकमान्य तुरुंगात असताना 1908 ते 1910 या काळात ते केसरीचे संपादक होते. त्यानंतर पुन्हा 1918 मध्ये त्यांनी केसरीचे संपादक पद स्विकारले. 1920मध्ये लोकमान्यांच्या निधनानंतर मात्र त्यांचा व केसरी चा संबंध सुटला. 1921मध्ये ते ‘लोकमान्य’ या दैनिकाचे संपादक झाले. नंतर ‘नवाकाळ’ हे स्वतःचे दैनिक सुरू केले व पुढे ते साप्ताहिक म्हणून प्रकाशित होऊ लागले. 1929 मध्ये त्यांच्या जहाल लिखाणामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला व त्यांना एक वर्षाची शिक्षाही झाली. याशिवाय त्यांनी गनिमी काव्याचे युद्ध बाल्कनचे युद्ध, पहिले महायुद्ध यांवर लेखमालाही लिहील्या.
त्यांचे नाट्यलेखन मात्र पत्रकारीतेच्या आधी सुरू झाले होते. 1893 ला त्यांनी सवाई माधवरावांचा मृत्यू हे पहिले नाटक लिहिले.त्यानंतर त्यांनी एकूण पंधरा नाटके लिहिली. यात प्रामुख्याने संगीत नाटके होती. मनोरंजन आणि पारतंत्र्यातमध्ये राजकीय जागृती करणे हा नाट्यलेखनाचा उद्देश होता. लाॅर्ड कर्झन च्या कारकिर्दीत त्यांनी कीचकवध हे पौराणिका नाटक लिहिले. पण त्याचे कथानक, संवाद हे जनजागृती करणारे असल्यामुळे त्यावेळच्या सरकारने त्याच्यावर बंदी घातली.यावरून त्यांच्या लेखनाची कल्पना येऊ शकते.
1907 साली भरलेल्या तिस-या मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. गांधर्व महाविद्यालयाने आयोजित केलेल्या संगीत परिषदेचेही ते अध्यक्ष होते. तसेच 1933 साली नागपूर येथे भरलेल्या अठराव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. काही काळ त्यांनी सांगली येथे योगविषयक प्रवचनेही दिली. तसेच अध्यात्म ग्रंथमालेतील पुस्तकांचे लेखनही केले.
खाडीलकर यांची प्रमुख नाटके: सवाई माधवरांवाचा मृत्यू, कांचनगडची मोहना
संगीत नाटके: कीचकवध,मानापमान, विद्याहरण,स्वयंवर,सत्वपरीक्षा,सवतीमत्सर,भाऊबंदकी, बायकांचे बंड,त्रिदंडी संन्यास,द्रौपदी,प्रेमध्वज,मेनका,सावित्री.
अध्यात्मपर लेखन: ऐतरेय आणि ईशावास्योपनिषद,अँ काराची उपासना,याज्ञवल्क्यमैत्रेयी संवाद.इ.
26ऑगस्ट 1948 रोजी कृ.प्र.खाडीलकर यांचे दुःखद निधन झाले.नाट्यपंढरीच्या या वारक-याला विनम्र अभिवादन.!
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈