श्री सुहास रघुनाथ पंडित
२६ फेब्रुवारी – संपादकीय
विनायक दामोदर सावरकर
ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वीच ज्याच्यावर बंदी घालण्यात आली असा ग्रंथ निर्माण करणारा एक लेखक मराठीत होऊन गेला हे आपल्याला माहित आहे का?.विनायक दामोदर सावरकर हे त्या लेखकाचे नाव.सावरकर म्हटल्याबरोबर आपोआप स्वातंत्र्यवीर हा शब्द ओठी येतो हे साहजिकच आहे.पण त्याच वेळेला ते एक विज्ञानवादी समाजसुधारक, इतिहासकार, हिंदू धर्माचे डोळस अभ्यासक, लेखक आणि कवी होते हेही तितकेच महत्त्वाचे !इथे इतिहासकार हा शब्द वापरताना दोन अर्थांनी वापरावा लागतो. एक म्हणजे त्यांनी इतिहासाचे लेखन केले आणि दुसरा अर्थ म्हणजे त्यांनी इतिहास निर्माणही केला.मराठीत असा दुसरा साहित्यिक नसेल असे वाटते.राष्ट्रभक्ती ही त्यांच्या रक्तातच असल्यामुळे राष्ट्राचा इतिहास, भविष्यकाळाविषयी चिंतन,सामाजिक सुधारणांचा आग्रह हे सर्व त्यांच्या लेखनात प्रतित होणे अगदी साहजिक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून केलेले हिंदू धर्म चिंतन आणि त्याच वेळेला भावनाशील कवीचे दर्शनही त्यांच्या काव्यातून दिसून येते.या शिवाय ज्या भाषेतून आपण लिहीतो त्या भाषेच्या शुद्धीसाठीही ते प्रयत्नशील होते. मातृभाषेचे संवर्धन करत मातृभाषेतील साहित्यात मोलाची भर घालणारा असा मातृभूमीभक्त साहित्यिक अद्वितीयच म्हणावा लागेल.
सावरकरांनी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाचा जो संशोधनपूर्ण इतिहास लिहिला त्याचा त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने एवढा धसका घेतला होता की या ग्रंथावर प्रकाशनपूर्वच बंदी घालण्यात आली होती. पण तरीही त्याच्या इंग्रजी प्रती प्रकाशित झाल्याच, गनिमी काव्याने!. मराठी आवृत्ती स्वातंत्र्यप्राप्ती नंतर प्रकाशित झाली. सावरकरांची देशभक्तीने ओथंबलेली गीते, शिवरायांची आरती, स्वतंत्रतेचे स्तोत्र,सागराला केलेले आवाहन आणि आव्हानही आपल्याला माहित आहेच. पण अंदमानच्या कोठडीत अकरा वर्षे अनन्वीत छळ सोसत असतानाही त्यांची काव्यप्रतिभा फुलत होती आणि महाकाव्य निर्माण होत होते हे साहित्य जगतातले आश्चर्यच नव्हे काय ?
सावरकरांचे साहित्यिक म्हणून असलेले योगदान एका छोट्या लेखात सांगणे अशक्यच आहे. त्यामुळे थोडक्यात सांगायचे तर त्यांची ग्रंथनिर्मिती अशी:
10,000 पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत आणि 1500पेक्षा जास्त पाने इंग्रजी भाषेत मौलिक लेखन.
एकंदर 41पुस्तकांची निर्मिती–
1857चे स्वातंत्र्यसमर
अखंड सावधान असावे
अंदमानच्या अंधेरीतून
अंधश्रद्धा भाग 1 व 2
काळे पाणी
माझी जन्मठेप
मोपल्यांचे बंड
संगीत उत्तरक्रिया नाटक
संगीत उःशाप नाटक
महाकाव्य कमला
महाकाव्य गोमांतक
भाषा शुद्धी
नागरी लिपीशुद्धीचे आंदोलन
जोसेफ मॅझिनी….इ.इ.इ .
सावरकर यांचे जीवनावर आधारित अनेक ग्रंथांची, नाटक, चित्रपट यांची निर्मिती झाली आहे.अनेक ठिकाणी स्मारके उभी आहेत. त्यांच्या नावे अनेक पुरस्कारही दिले जातात.अशा या बहुआयामी साहित्यिकाने 26 फेब्रुवारी 1966 रोजी देहत्याग केला.आज त्यांचा स्मृतीदिन!
त्यांच्या कार्यकर्तृत्वास शतशः प्रणाम !?!
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: विकिपीडिया.