सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २७ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी)
“महाराष्ट्र भाषाभूषण“ हा गौरव प्राप्त केलेले श्री.जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचा आज स्मृतिदिन. (१६-८-१८७९ ते २७-८-१९५५)
श्री आजगावकर हे संपादक, प्रभावी वक्ते व संशोधक-लेखक म्हणून प्रसिद्ध होते. लहानपणापासूनच त्यांचा मराठी साहित्याकडे ओढा होता. अखंड वाचन व लेखन करणे हा त्यांचा मनापासून जपलेला छंद होता. त्यांची भाषा अतिशय प्रासादिक, रसाळ, अर्थपूर्ण, आणि मधुर होती. जे लिहायचे ते सुटसुटीत वाक्ये वापरून लिहायचे, ही त्यांची खासियत होती. त्यामुळेच शि.म.परांजपे यांच्या शिफारशीवरून डॉ. कूर्तकोटी शंकराचार्य यांनी त्यांना ‘महाराष्ट्र भाषाभूषण’ ही सार्थ पदवी दिली होती.
तसेच ‘ संत कवींचे चरित्रकार ‘ अशीही त्यांची विशेष ओळख होती. त्यांनी २०० पेक्षा अधिक प्राचीन मराठी संत कवींच्या चरित्रांची व काव्यांची ओळख मराठी वाचकांना करून दिली होती … २४ पेक्षाही जास्त ग्रंथ लिहिले होते.
‘ महाराष्ट्रातील कवींचे चरित्रकार म्हणजे महाराष्ट्र भाषाभूषण आजगावकर ‘ असे समीकरणच तेव्हा झाले होते. असा कवींच्या चरित्रांचे व काव्यांचे मार्मिक व संकलित रितीने समालोचन करण्याचा पहिला प्रयत्न त्यांनी केला होता.
१९४७ सालाच्या आधी मुंबई नभोवाणीवरून त्यांनी ‘ नाटक आणि नाटक मंडळ्या ’ या विषयावर उद्बोधक व रोचक अशी सहा भाषणे केली होती. वडील लवकर गेल्याने त्यांच्या शिक्षणाची लौकिकार्थाने परवडच झाली होती. तरीही, स्वत: पदवीधर नसतांनाही, नागपूर आणि मुंबई विद्यापिठांच्या बी.ए., एम्.ए. या परिक्षांचे परीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती हे आवर्जून सांगायला हवे. स्वतःच्या लेखनाबरोबरच त्यांनी अनेक ग्रंथांना प्रस्तावना लिहिल्या होत्या. ‘इंदुप्रकाश’, ‘संदेश’, ‘रणगर्जना’ या मासिकांचे संपादक म्हणून कार्यरत असतांना त्यांनी ‘ज्ञानांजन’ हे स्वत:चे मासिकही सुरु केले होते.
श्री. आजगावकर हे वादकुशल व कठोर टीकाकार होते. त्यांनी ‘रामशास्त्री’ बाण्याने, आपल्या लिखाणातून कायम सत्याची बाजू मांडली. पुण्याच्या ‘सुधारक’ या पत्रात श्री.भारदे यांनी ‘आळंदीचा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीचा कर्ता नव्हे’ अशी लेखमाला लिहून खळबळ उडवून दिली होती. आजगावकरांनी जुन्या कवितांच्या आधारे त्या लेखमालेला लिहिलेले अतिशय समर्पक उत्तर ‘केसरी’ मध्ये अग्रलेखाच्या शेजारी छापले गेले आणि तेव्हापासून लो.टिळकांशी त्यांचा अगदी अकृत्रिम असा स्नेह कायमचा जडला.
“तुम्हा महाराष्ट्रीयांचे माझ्याविषयी काय मत आहे? “ असे म.गांधींनी त्यांना जेव्हा विचारले होते, तेव्हा आजगावकरांनी त्यांना तोंडावर असे उत्तर दिले होते की – ‘‘ एक थोर सत्पुरूष या नात्याने आपल्याविषयी आम्हा सर्वांच्या मनात आदरच आहे. पण आपले राजकारण आमच्या लोकांना तितकेसे आवडत नाही… आम्हा महाराष्ट्रीयांना आक्रमक राजकारणाची सवय… त्यामुळे आपले राजकारण आम्हाला थोडे मिळमिळीत वाटते.” – आजगावकरांच्या अंगभूत निर्भिडपणामुळे त्यांनी सहज असे उत्तर दिले होते हे निर्विवाद सत्य आहे.
‘अतिशय नम्र साहित्यिक ‘ ही त्यांची आणखी एक ठळक ओळख होती. त्यांना यशाचा अहंकार नव्हता. त्यांची रसिकता जिवंत व जातिवंत होती. तेव्हाच्या कित्येक अप्रसिद्ध आणि उपेक्षित कवींना त्यांनी उजेडात आणले. स्वत:च्या मराठी साहित्याच्या आवडीला त्यांनी संशोधनाची व चर्चेची जोड दिली होती. म्हणूनच त्यांचे लेखन हे मराठी भाषेच्या अध्यापकांना मार्गदर्शक ठरणारे लेखन आहे, असे गौरवाने म्हटले जात असे.
त्यांची “ महाराष्ट्र कवी चरित्रमाला “ ची निर्मिती ही त्यांना फार मोठी ओळख मिळवून देणारी गोष्ट. १९०८ साली त्याचा पहिला खंड प्रकाशित झाला, आणि नंतर असे एकूण अकरा खंड प्रकाशित झाले. त्यांच्या कविचरित्रांच्या पहिल्या भागावर टिळकांनी स्वत: केसरीत एक स्फुट लिहिले होते. १९३९ साली त्यांनी ”‘महाराष्ट्र संत कवयित्री “ हा चरित्रपर ग्रंथ लिहिला. त्यांच्या सगळ्याच ग्रंथांसाठी त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक माहिती गोळा केली, हे ही तेव्हा आवर्जून सांगितले जात असे.
श्री. आजगावकर यांचे प्रकाशित साहित्य —
इसापनीती / कवनकुतूहल — दीर्घकाव्य / चिमुकल्या गोष्टी – बालसाहित्य / नित्यपाठ भजनमाला
प्रणयविकसन – नाटक / प्रणयानंद – नाटक / भरतपूरचा वेढा / भूतविद्येचे चमत्कार / महाराष्ट्र संत-कवयित्री
वीरशैव संगीत भजन / श्री हरिभजनामृत / नेपाळवर्णन .
४५ संतकवींच्या चरित्रांचे पुनर्लेखन / मराठी आद्यकवी श्री ज्ञानेश्वर / श्री समर्थ चरित्र —- हे महत्वाचे अन्य ग्रंथ.
महाराष्ट्र कवी चरित्रमाला : पहिला खंड — पुढे ३००० पानांच्या एकूण अकरा खंडात प्रसिद्ध — यात अप्रसिद्ध अशा जवळजवळ १२५ जुन्या मराठी कवींची चरित्रे आणि त्यांच्या काव्यांचे रसग्रहण प्रसिद्ध केले गेले आहे.
अद्ययावत संशोधनाच्या आधारे त्यांनी लिहिलेला “ प्राचीन मराठी संतकवी “ हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूपश्चात प्रकाशित झालेला आहे.
असे अतिशय अभ्यासू आणि संशोधक वृत्तीचे, इतरांना मार्गदर्शक ठरलेले,आणि वैविध्यपूर्ण लेखन केलेले व्यासंगी लेखक श्री. जगन्नाथ आजगावकर यांना मनःपूर्वक आदरांजली.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈