श्रीमती उज्ज्वला केळकर
२७ जानेवारी – संपादकीय
पू. वा. बहरे ऊर्फ राजाभाऊ बेहरे
पू. वा. बहरे ऊर्फ राजाभाऊ बेहरे यांचा जन्म ११ जून १९३९मध्ये झाला. त्यांनी मराठी नियतकालिक काढायचे ठरवले, तेव्हा त्यांना निश्चित उत्पन्न देणारी सरकारी नोकरी सोडावी लागली. त्यावेळी विलक्षण जिद्द, आणि आपल्याला काय करायचे आहे, याचे नक्की भान या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काही नव्हते. या काळात त्यांची पत्नी सुमनताईंनी त्यांना मोलाची साथ दिली.
१९५९ साली मुंबईहून मेनका मासिक प्रसिद्ध झाले. मेनकाच्या पाहिल्याच अंकावर आचार्य अत्रे यांनी टीका केली. नावावरून हे मासिक काही तरी भयंकर असणार असे वाटे. कृष्णराव मराठे यांनीही त्यांच्यावर खटला भरला. त्याचा भरपूर मनस्ताप बेहरे दांपत्याला झाला. पण या खटल्याचा फायदाही झाला. त्यामुळे मासिकावर चर्चा खूप झाली. आणि त्यामुळे मासिकाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. पहिल्या अंकापासून वाचकांनी हात दिला.
मेनका प्रकाशित झाल्यावर राजाभाऊ पुण्याला आले. मग मेनकाच्या जोडीने माहेर इ .सन १९६३ व जत्रा इ. सन १९६५ ही नियतकालिके त्यांनी प्रकाशित केली. पु. भा. भावे, ग.दी. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर , जयवंत दळवी, श्री. ज. जोशी वसुंधरा पटवर्धन, ज्योत्स्ना, देवधर अशा अनेक दर्जेदार लेखन करणार्या लेखकांची भक्कम फळी त्यांनी उभारली.
बेहरे मोठे कल्पक होते. एकाच कादंबरीची विविध प्रकरणे विविध लेखकांना लिहायला सांगून कादंबरी पूर्ण करायाची, एकाच कथा देऊन चार पाच लेखक लेखिकांची नावे द्यायची व कथा कुणाची हे वाचकांना सांगायला सांगायचं, अशा अनेक कल्पना आपल्या मासिकाचा खप वाढवण्यासाठी त्यांनी राबवल्या. त्यामुळे वाचकांचा सहभाग मिळत गेला. पुढे राजाभाऊंनी ‘मेनका प्रकाशन’ ही प्रकाशन संस्था सुरू केली. या संस्थेद्वारे व. पु. काळे, मालती कारवारकर, प्रवीण दवणे, मंगला गोडबोले यांची पुस्तके प्रकाशित झाली.
पुरस्कार – १९८५ सालापासून ‘मेनका प्रकाशन ‘पु.भा. भावे’ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ५००० रु. चा पुरस्कार देते. राजाभाऊंच्या निधनानंतर म्हणजे २००० सालापसून सुमनताई बेहरे मासिकाच्या संपादिका होत्या. त्यांच्यानंतर आज ही मासिके अभय कुलकर्णी बघताहेत. त्यांच्या संपादकत्वाखाली मासिकांची लोकप्रीयता पहिल्यासारखीच टिकून आहे.
आज पु.वा. बहरे यांचा स्मृतीदिन. (२३ जानेवारी २०००) त्यानिमित्त या कल्पक प्रकाशकाला आदरांजली
☆☆☆☆☆
दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी
दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी हे आधुनिक मराठी साहित्याचे विख्यात समीक्षक आणि ललीत निबंधकार. त्यांचा जन्म २५ जुलै १९३४ चा. ते नागपूर विद्यापीठाचे पीएच. डी. होते, तसेच विदर्भ साहित्य संघाचे साहित्य वाचस्पती होते. डी. लिटच्या समकक्ष अशी ही पदवी आहे. नागपूर, पुणे, उस्मानाबाद विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या अनेक ग्रंथांचा संदर्भ ग्रंथ म्हणून समावेश आहे. त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध चर्चासत्रात आणि परिसंवादात भाग घेतला होता. काही वर्ष त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील मराठी साहित्य विषयाचे तज्ज्ञ म्हणूनही काम केले. त्यांनी १९६४ ते १९९४ पर्यन्त ३१ वर्षे मराठीचे अध्यापन केले. अनेक उत्तम विद्यार्थी त्यांनी घडवले. प्राचीन ते अर्वाचीन आशा दीर्घ पटावर पसरलेल्या वाङ्मय प्रवाहाचे मर्मज्ञ , विचारवंत, भाष्यकार, मराठीभाषा व साहित्याचे व्रतस्थ निष्ठावंत अध्यापक, वाङ्मय विश्वातील नवागतांचे मार्गदर्शक ,नितांत सुंदर वक्ते म्हणूनही ते विख्यात होते.
स्वामी, गारंबीचा बापू, चक्र यांच्या मर्यादा त्यांनी स्पष्ट केल्या. आचार्य अत्रे, आनंदीबाई शिर्के, माधवी देसाई यांच्या आत्मचरित्रावर लिहिताना, आत्मचरित्र या वाङ्मय प्रकाराचे नवे आकलन स्पष्ट केले.
द.भिंची अनेक पुस्तके आहेत. त्यापैकी निवडक पुस्तके
१.अनन्यता मर्ढेकरांची, २. अपार्थिवाचा यात्री, ३. अपार्थिवाचे चांदणे, ( आठवणी ) ४. जी. एंची महाकथा, ५. कादंबरी _ स्वरूप आणि समीक्षा ६. तिसर्यांदा रणांगण ७. जुने दिवे नवे दिवे ८. देवदास आणि कोसला , ९. पस्तुरी १० पोएट बोरकर ११. मराठी वाङ्मयाचा इतिहास ( ४खंड)
द. भिंना मिळालेले पुरस्कार – १. न्यूयॉर्क हेरॉल्ड ट्रीब्यूनचा उत्कृष्ट कथा पुरस्कार (१९५३) २. विदर्भ साहित्य संघातर्फे ‘साहित्य वाचस्पती’. ही पदवी डी.लिट.च्या समकक्ष आहे. ३. महाराष्ट राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार (१९९१ ) ४ कादंबरी स्वरूप आणि समीक्षा- म.सा. प. ज्येष्ठता ग्रंथ पुरस्कर ५. पु. भा. भावे पुरस्कार (२००७ ) ६ अंतरीक्ष फिरलो – महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार .
गौरव, सन्मान – मराठी प्राध्यापक परीषदेचे अध्यक्षपद
द. भिंना ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या विद्यार्थ्यांनी ‘समकालीन मराठी साहित्य प्रवृत्ती आणि प्रवाह’ हा अभिनंदनपर ग्रंथ संपादित केला.
श्यामला मुजूमदार यांनी ’समीक्षेची क्षितिजे’ नावाचा द. भी. कुलकर्णी गौरव ग्रंथ लिहिला.
द. भी. कुलकर्णी यांचा जन्म २५ जुलै १९३४ चा. स्मृतीदिन आज २७ जानेवारी २०१६ चा
द. भिं च्या विद्वत्तेला सादर ,विनम्र आदरांजली.
☆☆☆☆☆
सदाशिव अनंत शुक्ल
सदाशिव अनंत शुक्ल हे मराठीतील कवी, ध्येयवादी नाटककार, याशिवाय त्यांनी काही लघुकथा, चित्रपट कथा, गाणी, मुलांसाठी विविध प्रकारचे लेखन केले. केवळ लेखनावर उपजीविका करणार्या मोजक्या साहीत्यिकांमध्ये ते होते. त्यांनी कुमुदबांधव या नावानेही काही लेखन केले. जन्मतारीख – १९०२. ते १२०वर्षे जगले. आज त्यांचा स्मृतीदिन.
स. अ. शुक्ल यांच्या गाण्यांपैकी काही लोकप्रिय गाणी –
१. अति गोड गोड ललकारी, २.आला हा जणू चंद्रमा, ३. कुठला मधु झाकार, ४. जादूगर नयन तुझे ५. ,दे चरणी आसरा, ६. नाचती ओठांवरी हे गीत माझे ७. बोल सख्या मधुबोल, ८.रमला कुठे ग कान्हा
आपल्या गाण्यांनी एके काळी श्रोत्यांना वेध लावणार्या या प्रतिभावंताच्या प्रतिभेला सादर प्रणाम.
☆☆☆☆☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हाड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈