सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? २८ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

आज २८ नोहेंबर :- 

आपल्या कादंबरी-लेखनातून इतिहासाचे जणू पुनर्दर्शन घडवणारे नामांकित लेखक श्री. विश्वास पाटील यांचा आज जन्मदिन. भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी असणारे श्री पाटील यांनी ऐतिहासिक विषयांबरोबरच इतर वेगवेगळ्या विषयांवरही दर्जेदार लेखन केलेले आहे. पानिपत, महानायक, संभाजी, या त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या, आणि रणांगण हे नाटक प्रचंड लोकप्रिय झाले आहे. याचबरोबर, चंद्रमुखी, झाडाझडती, पांगिरा, लस्ट फॉर लालबाग, अशा त्यांच्या कादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत. नॉट गॉन विथ द विंड हा त्यांचा लेखसंग्रह, आणि ‘  फ्रेडरिक नित्शे– जीवन आणि तत्वज्ञान ‘ हा अभ्यासपूर्ण चरित्रग्रंथ, या पुस्तकांनाही रसिक वाचकांची  पसंतीची पावती मिळालेली आहे. 

श्री. पाटील यांच्या चंद्रमुखी, पांगिरा आणि महानायक या कादंबऱ्या हिंदीत अनुवादित केल्या गेल्या आहेत, हेही विशेषकरून माहिती असायला हवे. 

त्यांच्या अतिशय गाजलेल्या ‘ पानिपत ‘ या कादंबरीला ‘ प्रियदर्शिनी पुरस्कार ’, गोव्याचा ‘ नाथमाधव पुरस्कार ‘, कलकत्त्याच्या ‘ भाषा परिषदेचा पुरस्कार ‘, यासह इतर पस्तीसपेक्षाही जास्त पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच “ झाडाझडती “ या कादंबरीला लोकप्रियतेबरोबरच, अतिशय मानाचा समजला जाणारा ‘ साहित्य अकादमी पुरस्कार ‘ देऊन गौरविले गेले आहे ( सन १९९२ )

श्री. विश्वास पाटील यांच्याकडून यापुढेही अशीच उत्तमोत्तम आणि रसिकमान्य साहित्य-निर्मिती होवोया आजच्या त्यांच्या जन्मदिनी त्यांना हार्दिक शुभेच्छा.?

☆☆☆☆☆

चित्रपट अभ्यासक आणि अनेक मराठी संगीत-दिग्दर्शकांचे चरित्र-लेखक अशी खास ओळख असणारे श्री. मधू पोतदार यांचाही आज जन्मदिन. ( २८/११/१९४४ — ८/१०/२०२०). 

लोकप्रिय संगीतकारांबद्दल, त्यांच्या जीवनाबद्दल आणि कारकीर्दीबद्दल साद्यन्त माहिती देणारी त्यांची पुढील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. —-

जनकवी पी. सावळाराम, मानसीचा चित्रकार तो ( वसंत प्रभू ), संगीतकार राम कदम, वसंतलावण्य ( वसंत पवार ), वसंतवीणा ( वसंत देसाई ).

याव्यतिरिक्त,  विनोदवृक्ष ( वसंत शिंदे), कुबेर ( मास्टर अविनाश ), देवकीनंदन गोपाळा ( गाडगे महाराज ), अशी त्यांनी लिहिलेली चरित्रेही प्रसिद्ध झालेली आहेत. 

त्यांची इतर काही प्रसिद्ध पुस्तके अशी —– ‘ मराठी चित्रपट संगीतकार कोश  ‘, ‘ इतिहासातील वेचक आणि वेधक ‘, धर्मपथ ‘, तसेच ‘ शिक्कामोर्तब ‘ हा कथासंग्रह. 

“ छिन्नी हातोड्याचा घाव “ या संगीतकार राम कदम यांच्या आत्मचरित्राचे उत्तम शब्दांकन श्री पोतदार यांनीच केलेले आहे. 

एक अतिशय अभ्यासू, हसतमुख आणि उत्साही व्यक्तिमत्व ‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. मधू पोतदार यांना मनःपूर्वक आदरांजली. ?

☆☆☆☆☆

महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतिदिन. ( ११/४/१८२७ — २८/११/१८९० ). 

महान विचारवंत, समाजसुधारक, शेतकरी, अस्पृश्य तसेच बहुजन समाजाच्या समस्यांना प्राधान्य देत पुरोगामी विचारांचा फक्त पुरस्कारच नाही, तर प्रत्यक्ष आचरणातून त्या विचारांचा सातत्याने पाठपुरावा करणारे खऱ्या अर्थाने समाजसेवक ठरलेले ज्योतिबा. — त्यांच्या या अद्वितीय कामाला त्यांच्या लेखनकार्याचीही भक्कम जोड होती. 

त्यांनी लिहिलेला ‘ सार्वजनिक सत्यधर्म ‘ हा त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला महत्वाचा ग्रंथ, सत्यशोधक समाजाचा प्रमाणग्रंथ मानला जातो. फुले यांच्यातला उपजत थोर तत्वज्ञ या ग्रंथात ठळकपणे दिसून येतो. ‘ सत्यमेव जयते ‘ हे या ग्रंथाचे मूळ सूत्र होते, असे म्हणता येईल. नव्या सर्वसमावेशक धर्माचे तत्वज्ञान यात विशद केलेले आहे. हा ग्रंथ म्हणजे सत्यशोधकांचा आचारधर्म, जो माणसाला सुखाकडे नेणारा, विचारशक्तीला प्राधान्य देणारा, स्वातंत्र्य-समता-बंधुभाव या मूल्यांना मध्यवर्ती स्थान देणारा आहे, आणि म्हणूनच, त्यातले हे पायाभूत मौलिक विचार म्हणजे ज्योतिबांचे संपूर्ण व्यक्तिमत्व हुबेहूब साकारणारे चित्र आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

 संत तुकारामांच्या अभंगांचा सखोल अभ्यास असल्याने त्यांनी त्या धर्तीवर अनेक रचना केल्या होत्या. जागतिक स्तरावरच्या सामाजिक विषमतेचे भान असल्याने, ‘ गुलामगिरी ‘ हा त्यांचा ग्रंथ त्यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केला होता. त्याकाळच्या उपेक्षित बहुजन समाजाच्या उपेक्षित प्रश्नांकडे सरकारचे, आणि त्याहीपेक्षा एकूणच समाजाचे लक्ष वेधणे या हेतूने त्यांनी वृत्तपत्रातून लिखाणही केले होते. शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी, यासारख्या ग्रंथांमधून तेव्हाची चिंताजनक सामाजिक स्थिती आणि त्यातून बाहेर पाडण्याचे मार्ग यावर भाष्य करत, या क्रांतिकारी आणि सुधारणावादी लेखकाने तेव्हाचा उपेक्षित पण निद्रिस्त समाज, आणि त्या समाजाची शोषणाविरुद्ध बंड करण्याची ताकद, या दोहोंना जागृत करण्याचा जणू विडाच उचलला होता. या पुस्तकांव्यतिरिक्त त्यांनी नाटक, पोवाडे, निबंध, पत्रे, जाहीर प्रकटने, काव्यरचना, निवेदने, अशा विविध प्रकारच्या साहित्याचा जनजागृतीसाठीचे माध्यम म्हणून उपयोग करून घेतला होता. यापैकी ‘ नाटक ‘ हे माध्यम, परिवर्तनवादी चळवळ जास्त सशक्त आणि परिणामकारक व्हावी या हेतूने, त्यांनी एखाद्या शस्त्रासारखे वापरले होते. ‘ तृतीय नेत्र ‘ हे त्यांनी १८५५ साली लिहिलेले नाटक हे पहिले लिखित मराठी नाटक होते, आणि ज्योतिबा फुले हे पहिले मराठी नाटककार होते असे म्हटले जाते. पण या नाटकाचे प्रत्यक्ष किती प्रयोग झाले, त्याला कसा प्रतिसाद मिळाला, याची ठोस माहिती मात्र उपलब्ध नाही. १८५५ मध्ये लिहिलेल्या या नाटकाच्या हस्तलिखित प्रती  १९७९ साली प्रा. सीताराम रायकर यांना मिळाल्या ही एक नाट्यपूर्ण घटनाच म्हटली पाहिजे. 

फुले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत १८८८ मध्ये त्यांना ‘ महात्मा ‘ ही उपाधी दिली गेली. 

महात्मा फुले यांच्यावरही असंख्य पुस्तके लिहिली गेली आहेत. तसेच त्यांचे एकूण व्यक्तिमत्व, अफाट समाजकार्य यावर बरीच नाटके आणि चित्रपटांचीही निमिर्ती केली गेली आहे. 

महात्मा फुले आणि पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या नावाने अनेक संस्था उभारलेल्या आहेत. त्यांच्या नावाने बरीच साहित्य संमेलने नियमित भरवली जातात. त्यांच्यावर काढलेल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या जीवनावर आधारित दूरदर्शन मालिकाही निर्मिलेल्या आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे पुतळे स्थापन केले गेले आहेत.

भारतीय समाजक्रांतीचे जनक ‘ अशीच ज्यांची ख्याती मानली जाते, त्या महात्मा ज्योतिबा फुले यांना अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली. ?

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

माहितीस्रोत :- इंटरनेट

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments