श्रीमती उज्ज्वला केळकर
२९ ऑक्टोबर – संपादकीय
प्रभाकर तामणे (२९ ऑक्टोबर १९३१)
प्रभाकर तामणे हे गरवारे कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. विनोदी कथाकार म्हणून ते लोकप्रिय होते. त्यांनी अनेक कथा- कादंबर्या लिहिल्या.
‘अशीच एक रात्र येते’ हे त्यांनी फ्लॅश बॅक तंत्राने लिहिलेले नाटक खूप गाजले. या नाटकाचे पुढे हिन्दी, गुजराती, पंजाबी, कोकणी इ. भाषात अनुवाद झाले. एक धागा सुखाचा, मधुचंद्र, रात्र वादळाची इ. त्यांनी लिहीलेल्या कथांवरील चित्रपट गाजले. त्यांच्या एका कथेवर , राजकपूरने हिन्दी भाषेत काढलेला ‘बीवी ओ बीवी’ हा चित्रपटही गाजला.
अनामिक नाते, छक्केपंजे, एक काली उमळताना. हिमफुलांच्या देशात इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
रा.ना. चव्हाण – (१९१३-१९९३ )
रा.ना. चव्हाण हे दलित चळवळ आणि सत्यशोधक चळवळ यातील खंदे कार्यकर्ते. त्यांनी वैचारिक लेखन केले. त्यांचे ८०० च्या वर वैचारिक लेख आहेत. त्यांचे ८ ग्रंथ आहेत. प्रत्यक्ष रा. नांवरही, रानांच्या आठवणी . निवडक लेख, त्यांचे धर्मचिंतनपर लेख इ. पुस्तके लिहिली गेली आहेत. अक्षरवेध ( साहित्य समीक्षा) , ग्रामीण भागातील शिक्षण परंपरा, जनजागरण, परिवर्तनाची क्षितिजे, भारतीय संस्कृती व तिची वाटचाल इ. रा. नां॰ची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
रा.ना. चव्हाण यांना महाराष्ट्र शासनाचा ‘दलित मित्र’ हा पुरस्कार १९८३ साली मिळाला.
महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृत्ती आणि मानपत्र १९८९ साली मिळाले. सातारा येथे झालेल्या, मराठी साहित्य संमेलनात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
वसंत पळशीकर – (१८ फेब्रुवारी १९३६ – २९ ऑक्टोबर २०१६ )
वसंत पळशीकर हे मूलगामी आणि सर्वंकष लेखनासाठी प्रसिद्ध आसलेले विचारवंत होते. सामाजिक आणि राजकीय प्रश्न, चालवली, धर्म, विज्ञान, पर्यावरण इ. क्षेत्रातील विषयांवर त्यांनी लेखन केले. ‘नवभारत’ आणि ‘समाज प्रबोधन पत्रिका’ यांचे ते संपादक होते. ज्ञात महितीचा खजिना म्हणून त्यांच्याकडे बघितले जाई. त्यांनी विविध नियतकालिकातून केलेले लेखन १००० पृष्ठांपेक्षा जास्त आहे. त्यांच्या कार्याची माहिती देणारा लघुपटही आहे. चौकटीबाहेरचे चिंतन , परिवर्तन चिंतन आणि चिकित्सा , परांपरिक आणि आधुनिक शेती इ. त्यांची पुस्तके आहेत.
त्यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार देण्यात आला होता. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मीना वांगीकर (१९५०- २०१५ )
मीना वांगीकर या अनुवादिका म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी उत्तम कन्नड पुस्तकांचा मराठीत व मराठी पुस्तकांचा कन्नडमध्ये अनुवाद केला आहे. ‘ययाती’ (वि. स. खांडेकर}) आणि ‘मी जेनी’ (आनंत कुलकर्णी) या पुस्तकांचा मराठीतून कन्नडमध्ये अनुवाद केला आहे तर मुक्क्ज्जी, धूम्रकेतू, प्र प्रवासाचा आणि फ फजितीचा, ब्रम्हांड इ. कन्नड कादंबर्यांचा अनुवाद मराठीत केला आहे.
त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा स. ह. मोडक पुरस्कार मिळाला आहे. आज त्यांनाही स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली.
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈