श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ २९ मे -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

गणेश प्रभाकर प्रधान – ( २६ ऑगस्ट १९२२ – २९ मे २०१० )

ग. प्र. प्रधान हे समाजवादी विचारवंत, राजकरणी, मराठी भाषेचे लेखक होते. ते १८ वर्षे आमदार होते. २ वर्षे विरोधी पक्षनेते होते. महाराष्ट्र विधानसभेचे ते सभापतीही होते. त्यांनी मराठी व इंग्रजीत विपुल लेखन केले आहे.

साधना साप्ताहिकाचे ते मानद संपादक होते. सानेगुरुजींचे ते वारसदार समजले जातात. विविध सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग आसे.

त्यांनी एकूण १४ पुस्तके लिहिली. त्यापैकी मराठीत खालील पुस्तके लिहिली आहेत.

१. आगरकर लेखसंग्रह, २. डॉ. आंबेडकर त्यांच्याच शब्दात, ३. महाराष्ट्राचे शिल्पकार – ना.ग. गोरे ४. माझी वाटचाल, ५. सत्याग्रही गांधीजी, ६. साता उत्तराची कहाणी ७ ओकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक

याव्यतिरिक्त लेटर टू टॉलस्टॉय, लो. टिळक ए बायोग्राफी इ. इंग्रजीतूनही पुस्तके लिहिली.

‘साता उत्तराची कहाणी’ हे त्यांचे पुस्तक खूप गाजले. ‘डॉ. आंबेडकर त्यांच्याच शब्दात’ या पुस्तकाचे स्वरूप वेगळे आहे. एक तरुण पत्रकार डॉ. आंबेडकरांची मुलाखत घेतो, अशी कल्पना करून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

पुरस्कार – राज्यशासनाचा वाङ्मय पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

समीर शिपूरकर यांनी ग. प्र. प्रधानांच्या जीवनकार्याचा आणि आणि समाजसेवेचा परिचय करून देणार्याश लघुपटाची निर्मिती केली आहे.

☆ ☆ ☆ ☆ ☆

संजय व्यंकटेश संगवई  (२३ डिसेंबर १९५९ – २९ मे २००७ )

संजय संगवई  हे मराठी लेखक, पत्रकार, संपादक, माध्यम तज्ज्ञ , माध्यम चिकित्सक होते. ’अभिव्यक्ती’ या नाशिक इथून प्रकाशित होणार्यार माध्यंविषयक त्रैमासिकाचे ते संपादक होते. ‘माणूस’ साप्ताहिकात त्यांनी विविध सामाजिक, राजकीय विषयांवर तसेच शास्त्रीय संगितावर विपुल लेखन केले आहे. पर्यायी पत्रकारिता ही विकासाभिमुख पत्रकारिता असते, ही संकल्पना, संगवई यांनी आपल्या लेखनातून रुजवली. त्यांच्या मृत्यूनंतर काढलेल्या ‘अभिव्यक्ती’च्या अंकात, ‘सान्यासी माध्यमकर्मी’ असा त्यांचा गौरवास्प्द उल्लेख करण्यात आला आहे.

’नर्मदा बचाव आंदोलनाचे ते पूर्णवेळ कार्यकर्ते होते. त्यांना ह्रदयविकाराचा त्रास होता. त्यावरील उपचारासाठी ते केरळयेथील कोचीला गेले असता तिथेच त्यांचा अंत झाला. 

संजय संगवई यांची पुस्तके –

१. अस्मिता आणि अस्तित्व ( वैचारिक लेख ) २. उद्गार ( वैचारिक लेख ) ३. नद्या आणि जनजीवन – नर्मदा खोर्याैतील लोकांच्या संघर्षाचा ऐतिहासिक दस्तावेज ४. माध्यमवेध ५. कलंदर सुरांच्या स्मृतीची मैफल ( संगीतविषयक )       

संजय संगवई यांना मिळालेले पुरस्कार –

१.    राम आपटे प्रतिष्ठानचा सामाजिक कृतज्ञता निधी पुरस्कार

२.    महाराष्ट्र फाऊंडेशनचा सामाजिक कार्यासाठी पुरस्कार

३.    पर्यायी पत्रकारितेसाठी महानगर पुरस्कार

४.    ४. श्री. ग. माजगावकर कृतीशीलता पुरस्कार

५.    समाज विज्ञान शिक्षण मंडल न्यास – मुंबई तर्फे अस्मिता आणि अस्तित्व या पुस्तकासाठी पुरस्कार

बालवाडी तालुका खानापूर, जि. सांगली येथे त्यांच्या स्मरणार्थ ‘संजय संगवई मंच’

हे चर्चापीठ स्थापन करण्यात आले आहे.

☆ ☆ ☆ ☆ ☆

चारुता सागर. – (२१ नोहेंबर १९३०)

मोजक्याच कथा लिहूनही, मराठी कथाविश्व समृद्ध करणारे ग्रामीण लेखक म्हणून ज्यांच्याविषयी आदराने म्हंटलं जातं, ते चारुता सागर म्हणजे दिनकर दत्तात्रय भोसले. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील, कवठे महांकाळ तालुक्यातील मळणगाव इथे झाला. त्यांनी चारुता सागर या नावाने कथा लेखन केले, तर धोंडूबुवा या नावाने कीर्तने केली.

बंगालमध्ये भ्रमंती करताना त्यांनी शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबर्या् वाचल्या, त्यातील एका कादंबरीतील एका पात्राचे नाव होते, चारुता सागर. त्यांना हे नाव खूपच आवडले म्हणून त्यांनी कथालेखनासाठी हे नाव घेतले. 

१२व्या वर्षी आईच्या दु:खद निधनामुळे व्यथित होऊन त्यांनी घर सोडले. साधू, बैरागी, संन्यासी बनून, रामेश्वर, हरिद्वार, काशी असे फिरत राहिले. वयाच्या २६व्या वर्षी ते पुन्हा गावी परतले. लोणारवाडी या गावात कोंबड्या, बकर्यां च्या मागे फिरणार्याा मुलांसाठी त्यांनी शाळा काढली. पण ती शाळा बेकायदेशीर ठरवून सरकारने ताब्यात घेतली. पुढे त्यांनी लोणारवाडी हे गाव सोडले. नंतर त्यांनी मळणगावला प्राथमिक शिक्षकाची नोकरी केली.

लोणारवाडी या गावात कृष्णा नावाचा मुलगा होता. धुतला तर शर्ट फाटेल म्हणून त्याने अंगातला शर्ट कधी धुतलाच नाही. त्याच्यावर ‘न लिहिलेले पत्र’ ही कथा चारुता सागर यांनी लिहिली. त्यांनी लिहिलेली ती पहिलीच कथा सत्यकथा मासिकात छापून आली. पुढे त्यांच्या बहुतेक सगळ्या कथा सत्यकथेने छापल्या. जी. ए. कुलकर्णी, पु. ल. देशपांडे, हातकणंगलेकर अशी दिग्गज मंडळी त्यांच्या कथांची चाहती होती.  

चारुता सागर यांची पुस्तके –

१. नदीपार, २. नागीण – यात १६ कथा आहेत , ३. मामाचा वाडा – यात १४ कथा आहेत.

पुरस्कार –

१.    चारुता सागर यांच्या ‘नागीण’ या कथेला कॅ. गो.गं लिमये पुरस्कार १९७१ साली मिळाला.

२.    सर्वोत्कृष्ट लघुकथाकाराचा पुरस्कार त्यांना १९७७ साली मिळाला.

जोगवा या राष्ट्रीय विजेत्या चित्रपटाची कथा चारुता सागर यांच्या ’दर्शन’ या कथेवर आधारलेली आहे.

चारुता सागर यांच्या ‘नागीन’, ‘म्हस’ , ‘न लिहिलेले पत्र’, ‘मामाचा वाडा’, ‘पुंगी’, ‘पूल’, ‘दर्शन’, ‘वाट’, ‘नदीपार इ. अनेक कथांचा, श्री. चंद्रकांत पोकळे यांनी कन्नडमध्ये अनुवाद केला आहे.

सध्या ‘चारुता सागर प्रतिष्ठानतर्फे’ दरवर्षी कथास्पर्धा घेतली जाते आणि एका उत्कृष्ट कथेला परितोषिक दिले जाते.

आज, ग. प्र. प्रधान, संजय सांगवई, चारुता सागर यांचा स्मृतिदिन आहे. त्या निमित्ताने या तीनही प्रतिभावंतांना विनम्र श्रद्धांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments