प्रकाश, पाणी, पक्षी झाडे
कष्टकरी अन शेती वाडे
धनतेरसला या धनासह
आदर ठेऊन पुजू चला रे
– नीलांबरी शिर्के
|| शुभ दीपावली ||
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
२ नोव्हेंबर – संपादकीय
राधाधर मधुमिलिंद, वद जाऊ कुणाला शरण, बहुत दिन नच भेटलो सुंदरीला, प्रिये पहा, नभ मेघांनी आक्रमिले…
सगळी पद ओळखीची.अगदी कालपरवाची वाटावीत अशी. पण या नाट्यगीताना शंभर वर्षे होऊन गेलीत असं सांगितलं तर? या गीतांचे जनक बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा आज स्मृतीदिन. त्यांचे निधन झाले 1885 मध्ये. त्यापूर्वीच्या या रचना. पण पदांचा ताजेपणा अजूनही टिकून आहे.
अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म कर्नाटकातील. त्यामुळे त्यांना कन्नड व मराठी अशा दोन्ही भाषा लहानपणापासून अवगत होत्या. त्यांचे शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे झाले. तरूण वयातच त्यानी पदरचनेला सुरूवात केली. ते पौराणिक नाटकांसाठी पदे, किर्तनकारांसाठी आख्याने लिहीत असत. श्रीशंकर दिग्विजय हे पहिले नाटक त्यांनी 1873 मध्ये लिहिले. नंतर काही वर्षांनी म्हणजे 1880 मध्ये कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलाचे त्यांनी मराठीत भाषांतर करून शाकुंतल हे नाटक लिहिले. ते लोकप्रिय व व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी झाले. त्यामुळे काही मित्रमंडळींच्या सहकार्याने त्यांनी ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’ ची स्थापना केली.संगीत सौभद्र हे त्यांचे प्रचंड लोकप्रियता लाभलेले नाटक. पौराणिक कथानकातून उलगडत जाणारी प्रेमकथा आजही सर्वांना भुरळ घालते. राम राज्य वियोग हे त्यांचे शेवटचे नाटक.
अण्णासाहेब हे उत्तम नाटककार व गीतकार तर होतेच ,पण ते उत्तम नट, दिग्दर्शक व संगीत तज्ञही होते. छ. शिवाजी महाराजांवर पाचशे आर्यांचे दीर्घकाव्यही त्यांनी लिहिले आहे. समाजातील विविध समुदायांशी त्यानी संपर्क ठेवल्याने नाट्य क्षेत्राकडे पाहण्याची समाजाची दृष्टीही बदलली व या क्षेत्रात काम करणा-यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली.
या श्रेष्ठ मराठी संगीत नाट्य लेखक निर्मात्याला मानाचा मुजरा !!
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
साभार: विश्वकोश मराठी, विकीपीडिया
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈