श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ ३० ऑगस्ट – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
वि. ग. कानिटकर
वि. ग. कानिटकर हे मराठीत इतिहास, चरित्र, कथा, कादंबरी आणि अनुवादित साहित्य निर्मिती करणारे विचारवंत लेखक होते. त्यांचा जागतिक राजकारणाचा चांगला अभ्यास होता. अनेक जागतिक व्यक्तीमत्वांची चरित्रे त्यांनी लिहीली आहेत.
बी. ए. व बी. एस.सी. शिक्षण पूर्ण केल्यावर त्यानी अकौंटंट जनरल च्या ऑफिसमधे नोकरी केली व त्याच वेळी लेखनही चालू ठेवले. त्यांच्या लेखनाची सुरूवात नियतकालिकांमधून झाली. माणूस या साप्ताहिकात मुक्ताफळे या नावाचे सदर व ललित मासिकातून गप्पांगण हे सदर त्यांनी लिहिले होते. अनेक कन्नड, हिंदी, इंग्रजी साहित्याचा त्यांनी मराठी अनुवाद केला आहे. ग्यानबा आणि रा. म. शास्त्री या टोपणनावाने त्यांनी बरेच लेखन केले आहे.
उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी त्यांना राज्य शासनाचा तीन वेळा पुरस्कार मिळाला आहे. शिवाय अनेक खाजगी पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.
‘मनातले चांदणे’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यांचे अन्य साहित्य असे:
कथासंग्रह: आणखी पूर्वज, आसमंत, कळावे लोभ असावा, जोगवा, पूर्वज, लाटा, सुखाची लिपी.
कादंबरी: होरपळ, शहरचे दीवे, खोला धावे पाणी, कालखुणा.
अनुवाद: अकथित कहाणी, अयोध्या आणि हिंदु समाजापुढील प्रश्न, एका रात्रीची पाहुणी
अन्य: ॲडाॅल्फ हिटलरची प्रेमकहाणी, अब्राहम लिंकन-फाळणी टाळणारा महापुरूष, इस्रायल-युद्ध युद्ध आणि युद्धच, नाझी भस्मासूरचा उदयास्त, श्री नामदेव चरित्र, फाळणी-युगांतापूर्वीचा काळोख, महाभारत-पहिला इतिहास, माओ क्रांतिचे चित्र आणि चरित्र. . . इत्यादी.
30ऑगस्ट2016 लि श्री. कानिटकर यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीस नम्र अभिवादन!.
☆☆☆☆☆
शंकर गोपाळ तुळपुळे
शं. गो. तुळपुळे हे मराठी भाषा व संत वाड़्मयाचे अभ्यासक व संशोधक होते. सोलापूर येथील दयानंद महविद्यालयात ते मराठी विभाग प्रमुख होते. नंतर ते पुणे विद्यापीठातही मराठी विभाग प्रमुख होते.
साहित्यनिर्मिती:
मराठी ग्रंथ निर्मितीची वाटचाल, गुरू देव रा. द. रानडे चरित्र व तत्वज्ञान
सहलेखन– रमण महर्षि
संपादन व लेखन-
प्राचीन मराठी कोरीव लेख, मराठी वाड़्मयाचा इतिहास: इ. स. 1350 पर्यंत.
संतवाणीतील पंथराज, श्रीकृष्ण चरित्र, पाच संतकवी, महानुभाव गद्य, दृष्टांत पाठ, प्राचीन मराठी गद्य, यादवकालीन मराठी भाषा, मराठी निबंधाची वाटचाल, स्मृतिस्थळ,
मराठी भाषेचा तंजावरी कोश.
श्री. तुळपुळे यांचे वयाच्या 80 व्या वर्षी 1994 मध्ये निधन झाले. आज त्यांच्या स्मृती दिनी त्यांना अभिविदन !
☆☆☆☆☆
कवी बी अर्थात नारायण मुरलीधर गुप्ते
संख्यात्मक दृष्ट्या अत्यंत कमी पण दर्जात्मक दृष्ट्या अत्यंत उत्तम कविता लेखन करणारे कवी नारायण मुरलीधर गुप्ते यांनी ‘बी ‘ या टोपणनावाने कविता लेखन केले. प्रेम, कौटुंबिक, सामाजिक आशयाच्या त्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत. त्यांनी काही भाषांतरेही केली आहेत.
1891 मध्ये ‘प्रणय पत्रिका’ ही त्यांची पहिली कविता ‘करमणूक’ मध्ये प्रसिद्ध झाली. ‘फुलांची ओंजळ’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह तर ‘पिकलं पान’ हा दुसरा काव्यसंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला. या दोन्ही संग्रहात मिळून त्यांनी फक्त 49 कविता लिहील्या. पण त्यांच्या काव्यचाफ्याचा गंध रसिकांच्या मनात अजूनही दरवळत आहे.
माझी कन्या(गायी पाण्यावर काय म्हणूनी आल्या ), चाफा बोलेना, बकुल, दीपज्योती, बंडवाला, कविवंदन, वेडगाणे या त्यांच्या गाजलेल्या कविता.
आज त्यांच्या पंचाहत्तर वा स्मृतीदिन. ! काव्यज्योती निमाली असली तरी चाफा, बकुल मागे सोडून जाणा-या व माझी कन्या मधून बापाच्या भावनांना शब्दरूप देणा -या या कवीस शतशः प्रणाम !
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈