सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३० जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
बाळ कोल्हटकर
बाळकृष्ण हरी ऊर्फ बाळ कोल्हटकर (25 सप्टेंबर 1926 – 30 जून 1994)हे नाटककार, कवी, अभिनेते व नाट्यदिग्दर्शक होते.
त्यांचा जन्म साताऱ्याला झाला. आर्थिक ओढाताणीमुळे त्यांचे शिक्षण सातव्या इयत्तेपर्यंतच झाले होते.
सुरुवातीला काही वर्षे त्यांनी रेल्वेत नोकरी केली. पेशाच्या बाबतीत त्यांच्या आयुष्यात बरेच चढउतार आले.
वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी ‘जोहार’ हे पहिले नाटक लिहिले.
तीन दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत त्यांनी 30हून अधिक नाटके लिहिली.
त्यापैकी ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘मुंबईची माणसे’, ‘एखाद्याचे नशीब’इत्यादी नाटकांचे हजारांहून अधिक प्रयोग झाले.
‘देव दीनाघरी धावला’, ‘वेगळं व्हायचंय मला’ वगैरे नाटकेही खूप गाजली.
त्यांची नाटके भावनाप्रधान, कौटुंबिक व मूल्ये जपणारी असत.
त्यांचे संवाद चुरचुरीत व त्यांच्या शब्दप्रभुत्वाची साक्ष देणारे असत.
त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘एखाद्याचं नशीब’ व ‘आकाशगंगा’ यासारखी काही नाटके सोडली, तर त्यांच्या बहुतेक नाटकांची शीर्षके नऊ अक्षरी होती.
कोल्हटकर उत्तम कवीही होते.’आई, तुझी आठवण येते’, ‘निघाले आज तिकडच्या घरी’, ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’, ‘उठी उठी गोपाळा ‘ व अशी त्यांनी लिहिलेली बरीच गीते अजूनही लोकप्रिय आहेत.
अशा या भाषाप्रभूला त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈