सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३० जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

श्रीकृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर 

( ३१ ऑक्टोबर १९२६ —- ३० जुलै २०१३ )

श्रीकृष्ण अर्जुनवाडकर हे संस्कृतचे आणि मराठी व्याकरणाचे व्यासंगी अध्यापक, अभ्यासक आणि संशोधक होते. त्यांनी वेदांत, योग, तत्वज्ञान, संस्कृत साहित्यशास्त्र, मराठी व्याकरण इ. विषयांवर, इंग्रजी, मराठी आणि संस्कृत भाषेत ग्रंथस्वरूप व स्फुटलेखन स्वरूपात विपुल लेखन केले आहे. त्यांनी आपले वडील अण्णाशास्त्री यांच्याकडे पारंपारिक पद्धतीने संस्कृतचे अध्ययन केले. त्यानंतर  विष्णुशास्त्री बापट यांनी सुरू केलेल्या ‘आचार्य कुला’त तीन वर्षे राहून शांकर वेदांताचा अभ्यास केला. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी ‘वेदान्त – कोविद’ ही बी. ए. च्या समकक्ष पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी नेहमीचे औपचारिक शिक्षण घेतले. १९४६ मध्ये ते मॅट्रिक झाले. त्यांना जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती मिळाली. पुढे त्यांनी बी.ए. व एम.ए या पदव्या मिळवल्या.

त्यांनी पुण्यातील नू.म.विद्यालय , नवरोसजी वाडिया, स.प. महाविद्यालय, कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ इ. ठिकाणी संस्कृत, अर्धमागधी आणि मराठीचे अध्यापन केले. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीपासून केंब्रीज विद्यापीठापर्यंत  अनेक ठिकाणी संस्कृत, योग, वेदान्त, उपनिषदे, भगवद्गीता, रससिद्धांत इ. वर व्याख्याने दिली.  

श्रीकृष्ण अर्जुनवाडकर यांचे प्रकाशित साहित्य –  

१.  सुबोध भारती – अरविंद मंगरूळकर आणि  केशव जिवाजी दीक्षित यांच्या मदतीने इ. ८वी, ९वी, १०वी साठी पाठ्यपुस्तके तयार केली.

२. अर्धमागधी शालांत दीपिका

३. मराठी: घटना, रचना, परंपरा यावरील पुस्तके अरविन्द मंगरूळकर यांच्या सहयोगाने तयार केली.

४.   प्रीत गौरी गिरीशम् – ही संगीतिका कालिदासाच्या ५व्या सर्गाच्या कथानकावर आधारलेली आहे. संस्कृतमधे दुर्मीळ असा अन्त्य यमकाचा यात विपुल वापर आहे. यात गेयता आहे. या संगीतिकेचा प्रयोग १९६० मधे वाडिया कॉलेज इथे झाला.

५.  संस्कृत भाषा आणि साहित्य- महादेवशास्त्री जोशी यांनी संपादित केलेल्या भारतीय सांस्कृतिक कोशाच्या ९व्या खंडात त्यांनी या विषयाचा विस्तृत निबंध लिहिला आहे. 

६. शास्त्रीय मराठी व्याकरण

७.  ग-म-भ-न या ललित मासिकात ‘पंतोजी’ या नावाने मराठी शुद्धलेखनाच्या संदर्भात अनेक प्रश्नांचा ऊहापोह करणारी ३१ लेखांची लेखमाला लिहिली

८. मराठी व्याकरण वाद आणि प्रवाद

९. मराठी व्याकरणाचा इतिहास

१०.  विविध नियतकालिकातून वेळोवेळी त्यांचे ३००च्या वर लेख प्रकाशित झाले आहेत.

११.   संस्कृत भाषा आधुनिक जीवनाच्या अधिक जवळ नेण्याच्या दृष्टीने, त्यांनी इंग्रजीतील आधुनिक पद्धतीची अभिवादने सोप्या, समर्पक संस्कृतातून उपलब्ध करून दिली आहेत. उदा. गुडमॉर्निंग- सुप्रभातम्, गुड डे – सुदिनम् , गुड बाय – स्वस्ती , विश यू बेस्ट लक – सुभाग्यमस्तु इ.

श्री. श्रीकृष्ण अर्जुनवाडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏

☆☆☆☆☆

सुधाकर प्रभू  (निधन ३० जुलै २००७ )

सुधाकर प्रभू यांचा बालकुमार साहित्यिक म्हणून लौकिक आहे. त्यांचा जन्म गोव्यातील पेडणे या गावी झाला. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी मुंबईत घेतले. पदवी मिळवल्यावर त्यांनी अध्यापनाचा व्यवसाय सुरू केला. पुण्यातील हिंद हायस्कूलचे ते मुख्याध्यापक होते.

वयाच्या १८व्या वर्षीपासून त्यांच्या कथा ‘आनंद’ आणि बालमित्र या मुलांच्या मासिकामधून प्रसिद्ध होऊ लागल्या. याखेरीज ‘सा. स्वराज्य, रविवार सकाळ, सा.हिंदू, साधना यासारख्या नियतकालिकातून देखील त्यांनी लेखन केले. त्यांची २००च्यावर पुस्तके आहेत. त्यांची राजू प्रधान ही व्यक्तिरेखा, भा. रा. भागवत यांच्या फास्टर फेणे याच्याप्रमाणेच  लोकप्रिय झाली.

 सुधाकर प्रभू यांची काही निवडक पुस्तके– 

१.  मी सातववाडीचा लहान्या, २. लग्नघरात राजू प्रधान, ३. एका रात्रीची गंमत,           ४. कोणार्कचे कलाकार, ५. प्राणी स्वतंत्र झाले, ६. अशी जिंकली खिंड हाजीपीर,       ७. धिटुकली, ८. हिरवी हिरवी गार, ९. चला झाडे लावू चार, १० अमोल अमोल

बालसाहित्यातील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना गोवा कला अकादमी, गोवा सरकार, भारत सरकारचे पुरस्कार लाभले आहेत. कोल्हापूरमधे १९९१ साली झालेल्या बाल कुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

श्री. सुधाकर प्रभू यांना त्यांच्या आजच्या स्मृतीदिनी विनम्र श्रद्धांजली. 🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments