श्री सुहास रघुनाथ पंडित

? ३० नोव्हेंबर –  संपादकीय  ?

श्री.बाळकृष्ण भगवंत बोरकर(बाकीबाब) :

हिरवळ आणिक पाणी पाहिल्यावर ज्यांना गाणे सुचते,ज्यांच्या काव्यातून निसर्ग बरसत असतो,फुलपाखरू उडू लागता ज्यांचं मनही उडू लागतं,लाटांच्या तालात जे खर्जातिल गायन ऐकतात,उदयास्तांची रंगलिपी जे सहजपणे वाचू शकतात,ज्यांनी कधी पुण्याची मोजणी केली नाही,ज्यांना कधी पापाची टोचणी लागली नाही आणि ‘असेच आहे धुंदपणाने,वयास चकवित फुलावयाचे’ हा ज्यांच्या जगण्याचा मूलमंत्र आहे ; अशा बा.भ.बोरकर म्हणजेच बाकीबाब यांचा आज जन्मदिवस!

गोमंतकाच्या निसर्गरम्य भूमीतील बोरी या स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या छोट्याश्या खेडेगावात 30/11/1910 ला त्यांचा जन्म झाला.आज त्यांच्या जन्म दिनी त्यांच्या साहित्य उद्यानात हा एक फेरफटका!

बोरकरांच्या साहित्याविषयी बोलायचे,लिहायचे म्हणजे साक्षात निसर्गाविषयी लिहायचे.आवाक्यात न येणारा हा निसर्ग आणि तसंच त्यांचं साहित्य.आनंद असो,दुःख असो,प्रेम असो किंवा अन्य काही,निसर्गापासून दूर जाणे ज्यांना कधी जमलेच नाही असा हा गोमंतकाला भूषण असणारा साहित्यिक! त्यांनी कथा,कादंब-या लिहील्या असल्या तरी बा.भ.बोरकर म्हटल्याबरोबर डोळ्यासमोर येते ती स्वतःच्या कविता गाऊन दाखवणारी ,डोक्यावरील केस उडत आहेत,हाताचे आणि चेह-यावरील भाव मुक्तपणे उधळत आहेत अशी त्यांची मूर्ती! वयाच्या 23 व्या वर्षी ‘प्रतिभा ‘हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह मडगाव येथील साहित्य संमेलनात प्रकाशित झाला.1934 साली बडोदा येथील वाङ्मय परिषदेत त्यांनी,’दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती’ ही त्यांची रचना गाऊन सादर केली आणि कवी म्हणून त्यांची  ख्याती झाली.सुरूवातीच्या काळात त्यांनी चौदा वर्षे  शिक्षक म्हणून नोकरी केली.पण नंतर 1955 ते 1970 या काळात त्यांनी आकाशवाणी पुणे आणि गोवा येथे वाङ्मय विभागाचे संचालक या पदावर काम केले व निवृत्त झाले.

ललित,कथा कादंबरी,चरित्रात्मक प्रबंध असे अनेक प्रकारचे लेखन त्यांनी केले.काही पुस्तकांचे अनुवादही केलेत.पण एक आनंदयात्री कवी म्हणून त्यांनी रसिकांच्या ह्रदयात स्थान मिळवले ते त्यांच्या आशयघन,तालबद्ध,वृत्तबद्ध,निसर्गसौंदर्याने ओथंबलेल्या कवितांमुळेच!समृद्ध शब्द भांडार,जीवनातील तृप्ततेचे दर्शन,आध्यात्मिक विचारांची बैठक आणि ओळीओळीतून ठिबकणारा निसर्ग हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

प्रतिभा,जीवन संगीत , दूधसागर,आनंदभैरवी,चित्रवीणा,गितार,चैत्रपूनव, चांदणवेल, कांचनसंध्या,अनुरागिणी,चिन्मयी हे त्यांचे काही काव्यसंग्रह.याशिवाय त्यांनी चार कादंब-या,दोन कथासंग्रह,दोन चरित्रात्मक प्रबंध,चार ललित लेख संग्रह,कुसुमाग्रज कवितांचा संपादित काव्य संग्रह आणि सहा पुस्तकांचा अनुवाद असे विपुल लेखन केले आहे.याशिवाय कोकणी भाषेतील त्यांची दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

सासाय या त्यांच्या कोकणी भाषेतील पुस्तकास एकोणीसशे एक्सायाऐशीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन गौरविले आहे.

निसर्गाच्या सोबतीला आपली कविता ठेवून  बाकीबाब आठ जुलै एकोणीसशे चौ-याऐशीला  त्याच निसर्गात विलीन झाले. 

☆☆☆☆☆

श्री.विजय देवधर :

विजय देवधर हे पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्राॅपिकल मीटिऑराॅलाॅजी येथे वरिष्ठ  तांत्रिक अधिकारी या पदावर कार्यरत होते.त्यांनी लेखनाचे तंत्रही उत्तम आत्मसात केले होते.नवल,विचित्र विश्व अशा मासिकातून त्यांच्या लेखनाला प्रारंभ झाला.रहस्यकथा,साहसकथा,शौर्यकथा,गुप्तहेरकथा हे त्यांच्या लेखनाचे विषय होते.अनेक इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद त्यानी केले आहेत.सुमारे पन्नास पुस्तके त्यांच्याकडून लिहीली गेली आहेत.

त्यातील काही पुस्तके अशी :

कथा साहसवीरांच्या,कावा,गियानाहून पलायन,गोष्टी साहसांच्या,प्राणीमात्रांच्या जगात,रोमहर्षक शिकारकथा,साहसांच्या जगात, हेरांच्या अजब जगात, प्राण्यांचा डाॅक्टर,(बालसाहित्य),मोटारसायकलिस्ट चिपांझी(बालसाहित्य)…इत्यादी

अनुवादित साहित्य : 

अस्वलांचा शेजार,डाॅ.नो, डेझर्टर,डेडली गेम,नो कम बॅक्स,बर्म्युडा ट्रॅगल,मृत्यूलेख,द सेव्हन्थ सिक्रेट इत्यादी.

पुणे येथे 30/11/2012 ला त्यांचे निधन झाले.त्यांच्या स्मृतीस अभिवादन. ?

☆☆☆☆☆

श्री.आनंद यादव :

ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचा आज जन्मदिन.आपण त्यांच्या साहित्याविषयी दि.27/11 च्या अंकात म्हणजे त्यांच्या स्मृतीदिनी जाणून घेतले आहे.म्हणून येथे पुनरावृत्ती टाळत आहोत. 

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकीपीडिया,मराठी विश्वकोश.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments