सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३० सप्टेंबर – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर, ई–अभिव्यक्ती (मराठी)
गंगाधर देवराव खानोलकर
गंगाधर देवराव खानोलकर (19 ऑगस्ट 1903 – 30 सप्टेंबर 1992) हे लेखक, चरित्रकार व पत्रकार होते.
त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील खानोली गावात झाला.
खानोलकरांचे वडील ज्ञानपिपासू, ग्रंथप्रेमी व माणुसकी हा एकच धर्म मानणारे आणि आई स्वाभिमानी, स्वावलंबी व त्यागी होती. त्यांचे दृढ संस्कार खानोलकरांवर झाले.
त्यांचे प्राथमिक शिक्षण प्रथम घरीच, नंतर सावंतवाडी व मालवण येथे टोपीवाला हायस्कूलमध्ये झाले. असहकार चळवळीत सहभागी झाल्याने ते मॅट्रिकच्या परीक्षेला बसले नाहीत.
यानंतर खानोलकर रवींद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतमध्ये वाङ्मयाचा विद्यार्थी म्हणून दाखल झाले.तेथे त्यांना थोर विद्वानांचे व रवींद्रनाथांचेही मार्गदर्शन लाभले. भरपूर वाचन, चिंतन, मनन वगैरे शैक्षणिक संस्कार त्यांना आयुष्यभर साहित्यसेवेची प्रेरणा देत राहिले.
त्यानंतर अंमळनेर तत्त्वज्ञान मंदिरात शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी दोन वर्षे तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला.
काही काळ त्यांनी तळेगावच्या राष्ट्रीय विचाराच्या समर्थ विद्यालयात अध्यापन केले.
पुढे ते मुंबईत ‘लोकहित’, ‘विविधवृत्त’, ‘प्रगती’, ‘रणगर्जना साप्ताहिक’, ‘वैनतेय साप्ताहिक’ इत्यादी वृत्तपत्रांचे संपादक झाले.
खानोलकरांनी एकूण 22ग्रंथ लिहिले. अर्वाचीन वाङ्मय (खंड 1 ते 9), श्रीपाद कृष्ण कोल्हटकर चरित्र, वालचंद हिराचंद चरित्र, माधव ज्यूलियन चरित्र,के. बी.ढवळे चरित्र इत्यादी ग्रंथांचा त्यात समावेश होतो.
स्वामी विवेकानंद समग्र वाङ्मय (खंड 1-21), पुणे शहराचे वर्णन, कोल्हटकर लेखसंग्रह, डॉ. केतकरांचे वाङ्मयविषयक लेख, शेजवलकर लेखसंग्रह, धनंजय कीर :व्यक्ती आणि चरित्रकार, सोन्याचे दिवस :बा. ग. ढवळे स्मृतिग्रंथ इत्यादी ग्रंथांचे त्यांनी संपादन केले.
आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली!
☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, आपलं महानगर, विकीपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈